लाजवाब वहिदा…..
गुरुदत्त यांचा सीआयडी चित्रपट कोणाला आठवतोय… गुरुदत्त यांचं अप्रतिम दिग्दर्शन… आणि एकापेक्षा एक अशी श्रवणीय गाणी… याच चित्रपटातून एका सुंदर अभिनेत्रीचं हिंदी सिनेसृष्टीत आगमन झालं. ज्या अभिनेत्रीने आपला अभिनय, सौदर्य, नृत्य आणि मृदू स्वभाव यांच्या बळावर चित्रपट सृष्टीवर राज्य केलं. कोण आहे ही अभिनेत्री… सीआयडी चित्रपटात कामिनी म्हणून झळकलेली, कही पे निगाहे कही पे निशाना…. म्हणत सर्वांना आपल्या तालावर नाचवलं… अर्थात ही अभिनेत्री म्हणजे वहिदा रहेमान (Waheeda Rehman)…. कही पे निगाहे, या गाण्यावर वहिदाचं नृत्य कौशल्य, तिच्या डोळ्यांच्या अदा, बोलका चेहरा आणि निरागस हास्य यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत नवीन सुपरस्टारचं आगमन झाल्याची वर्दी मिळाली..
वहिदा रहेमान म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेलं गोड स्वप्न… या अभिनेत्रीनं एकापेक्षा एक असे चित्रपट दिले…. सोबत अजरामर अशी गाणी दिली. वहिदा यांना त्यांच्या प्रत्येक चित्रपटात एक खास गाणं मिळालं… या गाण्यातून वहिदा यांनी केलेला अभिनय आणि नृत्य आजही पुन्हापुन्हा पहावेसे वाटते. प्यासा मध्ये ‘जाने क्या तुने कही.. जाने क्या मैने कही, बात कुछ बन ही गयी’ म्हणत या गाण्यात वहिदा यांनी चेहरा आणि नजरेचा अभिनय काय असतो हे दाखवून दिले. तर ‘चौदहवी का चॉंद’ चित्रपटात ‘चौदहवी का चॉंद हो या आफताब हो’ या गाण्यातही तिचा शांत चेहरा सर्व बोलून गेला… ‘साहेब बीबी और गुलाम’ मध्ये ‘भवरॉं बडा नादान है… बगीयन का मेहमान है…’ म्हणत नटखट वहिदा पहायला मिळाली… ‘तिसरी कसम’ मध्ये ‘पान खाए सैया हमारो…’ म्हणत बागडणा-या वहिदाची आणखी एक अदा बघायला मिळाली…
हे देखील वाचा: चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…
वहिदा रहेमान या चित्रपटसृष्टीमध्ये आल्या त्या योगायोगानं… खरंतर एक डॉक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न होतं… एका उच्चविभूषीत मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील त्याकाळचे आयएएस अधिकारी. तमिळनाडू जिल्ह्यातील चेंगलपट्टू येथे त्यांचा जन्म झाला. चेंगलपट्टू येथे त्यांचे कुटुंब एक सुशिक्षित कुटुंब म्हणून ओळखले जायचे… वहिदा आणि त्यांच्या चार बहिणी, या सर्वांसाठी शिक्षण सत्कीचे होते. पण वहिदा या लहानपणी अशक्त प्रकृतीच्या होत्या. त्यामुळे शालेय शिक्षणातही बराच अडसर येत होता. त्यांना वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यायचा होता. पण नशिबानं तब्बेत आड आली… आणि डॉक्टर होणारी वहिदा अभिनेत्री झाली.
वहिदा या नऊ वर्षाच्या असतांना त्यांच्या वडीलांचे अचानक निधन झाले. त्यांच्यानंतर काही वर्षांनी आईही गेली. वहिदा यांची मोठी बहिण त्यांना आईसारखी होती. दरम्यान वहिदा यांनी तेलगू चित्रपट, रोजुलू मरई मध्ये बालकलाकर म्हणून काम केलं. यासोबत त्या त्यांच्या बहिणीसोबत भरतनाट्यम् शिकत होत्या. पुढे या नृत्याची त्यांना गोडी लागली. या नृत्यातूनच त्या चित्रपटसृष्टीत आल्या. त्यांचे नृत्यकौशल्य बघून तेलगू चित्रपट नरसिंहा मध्ये त्यांना भूमिका मिळाली. या चित्रपटातील भूमिका वहिदा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत घेऊन आली.
निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून प्रसिदध असलेल्या गुरुदत्त यांनी वहिदा रहेमान यांना हिंदीमध्ये ब्रेक दिला. सीआयडी या चित्रपटातून वहिदा यांचे आगमन झाले, तेही एका निगेटीव्ह रोलमध्ये. पण त्यांच्या खलनायिकेच्या भूमिकेपेक्षा, कही पे निगाहे कही पे निशाना म्हणणारी वहिदा प्रेक्षकांना अधिक भावली. सुपरहिट झालेल्या या चित्रपटातून वहिदा रहेमान यांचा यशस्वी प्रवास सुरु झाला. पुढे गुरुदत्त यांच्याबरोबर त्यांनी प्यासा, कागज के फूल, चौदहवी का चॉंद, साहिब, बीबी और गुलाम हे चित्रपट केले. गुरुदत्त बरोबर त्यांचे प्रेमप्रकरणही चर्चेत राहीले. मात्र गुरुदत्त यांच्या आत्महत्येनंतर त्यात टि्वस्ट आलं. या एका गंभीर वळनानंतर वहिदा यांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं.
हे वाचलंत का: ‘गाईड’ चित्रपटाने पूर्ण केली तब्बल पंचावन्न वर्षे
देवानंद आणि वहिदा रेहमान हे कॉम्बिनेशन तुफान लोकप्रिय ठरलं. देवानंदबरोबर वहिदा यांचे सीआयडी, सोलहवां साल, काला बाजार, बात एक रात की आणि गाईड हे चित्रपट झाले. सर्व सुरपहीट. गाईड ने तर सुपर-डुपरहीट अशी झेप घेतली. आजही वहिदा यांना आपला सर्वात आवडलेला चि्त्रपट कुठला हे विचारलं तर उत्तर गाईड हेच असतं… वास्तविक गाईडची नायिका ही बंडखोर… लग्नाची चौकट मोडणारी… पण वहिदाच्या सहज सुंदर अभिनयासमोर हा बंडखोरपणाही स्विकारण्यात आला. वहिदा यांनी अभिजान, बीस साल बाद, कोहरा, राम और श्याम, पत्थर के सनम, एक फूल चार कांटे, मुझे जीने दो, मेरी भाभी, दर्पण असे अनेक हिट चित्रपट दिले.
पण याबरोबरच रुप की रानी चोरों का राजा, प्रेम पुजारी, रेश्मा और शेरा या खूप अपेक्षा असलेल्या चित्रपटांनी त्यांना अपयशही दिले. यशाचे रंग ओसरु लागले होते. तेव्हाच वहिदा यांनी शशी रेखी यांच्याबरोबर लग्न करुन मुंबईला रामराम केला. त्या बंगलोरला स्थाईक झाल्या. काश्वी आणि सोहेलच्या आई झाल्या… बंगलोरला गेल्यावर काही मोजके चित्रपट केले. यातून त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीबरोबर नाते कायम होते. साधारण 2000 सालामध्ये त्यांचे पती आजारी असतांना ही सगळी मंडळी मुंबईत आली. वहिदा यांच्या पतीचे आजारपणात निधन झाले. मुलं आपापल्या मार्गाला लागली होती. त्यामुळे वहिदा यांनी पुन्हा चित्रपटाकडे मोहरा वळवला.
वहिदा या आज ८५ वयाच्या आहेत. त्यांच्या चेह-यावरून मात्र या वयाचा अंदाज आपल्याला येत नाही. मात्र त्यांना आहे. त्यामुळे पांढरे केस लपण्याचा प्रयत्न त्या कधीही करत नाहीत… की मेकअपचे थर देऊन चेह-यावरील सुरकुत्याही लपवत नाहीत… या त्यांच्या स्वभावामुळेच त्या नेहमी ख-या वाटल्या… जे आहे ते स्विकारलं आहे. हा त्यांचा रोखठोकपणा त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्येही डोकावला. त्यामुळेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत अदालत मध्ये त्या प्रेमिकेच्या रुपात होत्या. तर पुढे अमितजींबरोबर त्या त्रिशूलमध्ये आईच्या भूमिकेत होत्या.
प्रेमिका ते आई हा बदल स्विकारणे सोप्पे नव्हते. आणि ज्या अभिनेत्रीने अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत, तिला तर शक्यच नव्हते. पण वहिदा रेहमान हे रसायनच वेगळं आहे. फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण या मानाच्या पुरस्कारांसोबत अन्यही पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. पण या अभिनेत्रीने त्याचा कधीही बाऊ केला नाही. त्यामुळे जवळपास चार पिढ्यांसोबत या अभिनेत्रीने भूमिका केल्या आहेत. वहिदा म्हणजे लाजवाब असे म्हटलं जातं… ते खरंही आहे… त्यांच्या टॉपच्या काळात वहिदा या सर्वांत सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या… त्यांच्या चेह-यावरील हा सुंदरपणा आजही तसाच आहे…. कारण मंडळी सुंदरता ही रंगात किंवा मेकअपमध्ये नसते… तर ती असते चेह-यावरील समाधानात आणि हास्यात… याबाबतीत वहिदा या कायम पुढे आहेत..