दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
गुलजार स्टेजवरून राखीला म्हणाले, ”अजी सुनती हो…..”
सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री राखी (Rakhee Gulzar) यांच्या बाबत अलीकडे खूप उलट सुलट बातम्या ऐकायला मिळतात. चित्रपटापासून दूर झाल्यानंतर ती आता खऱ्या अर्थाने एकाकी झालेली आहे. भरपूर ग्लॅमरस आयुष्य जगल्यानंतर वाट्याला आलेले हे एकाकी जीवन खूप त्रासदायक असतं. सध्या सोशल मीडियाच्या काळात कलावंताच्या बाबतीतल्या बातम्या खूपच तिखट मीठ लावून आणि एकांगी पद्धतीने मांडल्या जातात.
अभिनेत्री राखी (Rakhee Gulzar) यांच्या बाबत अशाच बातम्या कायम समाज माध्यमावर फिरत असतात. यात तथ्य किती असते माहिती नाही. पण तिच्या चाहत्यांसाठी या बातम्या नक्कीच क्लेशदायक असतात. अभिनेत्री राखी यांनी गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांच्यासोबत १९७३ साली लग्न केले होते. हा तिचा दुसरा विवाह होता. त्या पूर्वी १९६३ साली तिने अजय विश्वास या पत्रकारासोबत लग्न केले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी केलेलं लग्न फारसं टिकू शकलं नाही. दोन वर्षात म्हणजे १९६५ साली तिचा घटस्फोट झाला.
यानंतर १९७३ साली तिने गीतकार गुलजार यांच्यासोबत लग्न केले. दोन अतिशय प्रतिभावान कलाकार फार काळ एकत्र राहू शकत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मेघनाच्या जन्मानंतर अवघ्या एका वर्षात हे दोघे विभक्त झाले पण त्यांनी ऑफिशियल डिव्होर्स घेतला नाही. दोघेही स्वतंत्रपणे आपले कला जीवन जगत राहिले. गुलजार यांनी लिहिलेल्या अनेक चित्रपटांमधून राखीनेनंतर देखील कामे केली. पण हे दोघे एकत्र येऊ शकले नाही. मेघना हाच त्यांच्यातील एकमेव दुवा.
आता ती देखील स्वतंत्र दिग्दर्शिका झालीय. राखी (Rakhee Gulzar) आणि गुलजार आणि आता पुन्हा एकत्र येण्याची सुतराम शक्यता देखील नाही. हे असं कां घडलं? याचा विचार करणे आता व्यर्थ आहे. त्या दोघांचा संसार जर सुखाचा झाला असता तर दोघांची कला कारकीर्द आणखी बहरली असती कां? या जर तर च्या प्रश्नांना आता काही अर्थ नसतो.
पण एक किस्सा खूप मनोरंजक आहे. कदाचित अभिनेत्री राखी (Rakhee Gulzar) हिला या किस्स्याची पुसटशी आठवण काही काळ तरी तिला आनंद देत असेल असे वाटते. हा किस्सा आहे १९९० साली झालेल्या फिल्म फेअर अवॉर्ड फंक्शनचा आहे. त्यावर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या पदासाठी राखीला नामांकन मिळाले होते. चित्रपट होता ‘राम लखन.’ तिच्यासोबत सहाय्यक अभिनेत्री नामांकन मिळालेल्या इतर अभिनेत्रीमध्ये अनिता कंवर (सलाम बॉम्बे), रीमा लागू (मैने प्यार किया), सुजाता मेहता (यतीम) या अभिनेत्री होत्या. या दिमाखदार सोहळ्यामध्ये हे पारितोषिक वितरण करण्यासाठी सेलेब्रिटी गेस्ट म्हणून गीतकार गुलजार यांना स्टेजवर बोलवण्यात आले आणि त्यांच्याकडे ज्या अभिनेत्रीला आहे पारितोषिक मिळाले आहे तिचे नाव असलेला लिफाफा देण्यात आला.
गुलजार यांनी तो एनवलप उघडला त्यावरील नाव पाहून मनोमन हसले. प्रेक्षकांना देखील समजले विनर कोण आहे. गुलजार म्हणाले, ”या पारितोषिकाची जी विनर आहे तिला मी वेगळ्या पद्धतीने स्टेजवर आमंत्रित करतो.” आणि ते चक्क म्हणाले, ”अजी सुनते हो….” प्रेक्षकांमध्ये प्रचंड हास्याचा कडेलोट झाला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. राखी देखील हसत हसत स्टेजवर आली आणि आपल्या पतीकडून तिने हा पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर मीडियात पुन्हा दोघांच्या पॅच अपची चर्चा सुरु झाली होती. पण तसं काही घडणार नव्हतं. फिल्मफेअर फंक्शनमधील प्रसंग राखीला आठवत असेल कां?
=========
हे देखील वाचा : संजीव कुमारमुळेच अनिल कपूरचा सिनेमा बनू शकला!
=========
आयुष्यात आलेले असे छोटे-मोठे सुख दुःखाचे प्रसंगच आयुष्याच्या संध्याकाळी मनाला उभारी देऊन जात असतात. आज राखी हिला हा प्रसंग आठवल्यानंतर नक्कीच काही काहीतरी आनंद वाटत असणार. या वयात चूक कुणाची आणि बरोबर कोण याचा हिशोब करायचा नसतो. पण इगो प्रॉब्लेम्स मोठे असतात, मनाचे पीळ घट्ट असतात आणि ते हार म्हणायला तयार नसतात नसतात. तसं नसतं तर गुलजार आणि राखी(Rakhee Gulzar)सारखे प्रतिभा संपन्न कलाकार इतके वर्ष घटस्फोट न घेता सेपरेट राहिलेच नसते.