गुरुदत्त यांनी ‘साहीब बीवी और गुलाम’ या चित्रपटाचा क्लायमॅक्स का बदलला?
भारतीय चित्रपट सृष्टीत दिग्दर्शक गुरुदत्त यांचे नाव मोठ्या आदराने आज देखील घेतले जाते. उणी पुरी दहा-बारा वर्षाची कारकीर्द असताना त्यांनी प्यासा, कागज के फूल, ‘साहेब बीवी और गुलाम’, चौदहवी का चांद असे क्लासिक सिनेमा बनवले. काळ जस जसा पुढे जातो आहे तस तसे गुरुदत्त यांच्या चित्रपटांचा पैस वाढत चालला आहे. जगातील अनेक विद्यापीठांमधून गुरुदत्तच्या चित्रपटांचा अभ्यास, चर्चासत्र आणि महोत्सव घडवून आणले जात आहेत. गुरुदत्त खरोखर काळाच्या पुढचे दिग्दर्शक होते. आज आपण त्यांच्या एका क्लासिक चित्रपटाबाबत म्हणजेच ‘साहीब बीवी और गुलाम’ च्या क्लायमॅक्स बद्दल (Climax change) बोलणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटाचा क्लायमॅक्स आधी वेगळा शूट केला होता. या चित्रपटाचा क्लायमॅक्स गुरुदत्त यांनी का बदलला? असे नेमके कोणते कारण होते, ज्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला? (Climax change)
चित्रपटाच्या प्रत्येक बाबींचा अतिशय अंतर्मुख होऊन विचार करणारा गुरुदत्त हा द्रष्टा दिग्दर्शक होता. त्यामुळे सिनेमातील प्रत्येक फ्रेम कशी परिपूर्ण होईल याकडे त्याचे कायम लक्ष असायचे. यासाठी तो आपला सिनेमा तयार झाल्यानंतर त्याचा ट्रायल शो ठेवायचा. या ट्रायल शोमध्ये कलाकारांसोबत या सिनेमाशी निगडित सर्व व्यक्तींना तो आमंत्रित करायचा. यात त्याची काही समीक्षक, मित्र देखील असायचे. सर्वांची चित्रपट झाल्यानंतर तो मोकळ्या मनाने चर्चा करायचा आणि त्यानुसार चित्रपटात गरज असेल तर बदल देखील करायचा. ‘साहीब बीवी और गुलाम’ या चित्रपटाच्या वेळी नेमकं असंच झालं. (Climax change)
या चित्रपटाच्या कलामॅक्समध्ये (Climax change) शेवटी छोटी बहू (मीनाकुमारी) आणि भूतनाथ (गुरुदत्त) एका सिद्धी पुरुषाला भेटायला एका मंदिरात टांग्यातून चाललेले असतात. दिग्दर्शक अब्रार अल्वी यांनी चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये या टांगा प्रवासामध्ये गुरुदत्त आपले डोके मीनाकुमारीच्या खांद्यावर ठेवतो आणि बोलत असतो असे शूट केले होते. त्याचवेळी अंधारात गुंड येऊन त्यांच्यावर हल्ला करतात असा शॉट होता. पण या ट्रायल शो नंतर गुरुदत्तला एकाने शंका उपस्थित केली. त्याचे म्हणणे असे होते की,” क्लायमॅक्सला (Climax change) जेव्हा भूतनाथ छोट्या बहुच्या खांद्यावर डोके ठेवून बोलत असतो त्यामुळे चित्रपटाचे सर्व लॉजिकच संपुष्टात येते. या दृश्यामुळे प्रेक्षकांचा गैरसमज होऊ शकतो. या दृश्यामुळे प्रेक्षकांना गुरुदत्त आणि मीनाकुमारी यांच्यात प्रेम आहे आणि ते दोघे एकमेकांचे प्रेमी आहेत असं वाटू शकतं आणि ते सर्वथा चुकीचे आहे. मीनाकुमारीने गुरुदत्तकडे कधीच अशा नजरेने पाहिलेलं नसतं. चित्रपटात संपूर्ण वेळ ती तिच्या पतीच्या (रहमान) च्या प्रेमात असते. पतीचे प्रेम मिळावे म्हणून ती चक्क त्याच्यासोबत मद्यदेखील घेत असते. अशा साध्वी स्त्रीच्या खांद्यावर कोणी परपुरुष कसे काय डोकं ठेवून बोलू शकतो?”
गुरुदत्तने चूक कबूल केली. ताबडतोब त्याने अब्रार अल्वी सोबत चर्चा केली आणि नव्याने शेवटचा क्लायमॅक्स चित्रित केला. या क्लायमॅक्समध्ये (Climax change) आता छोटी बहू भूतनाथला म्हणते,”माझे राहिलेले आयुष्य माझ्या पतीला मिळू दे. माझ्या मृत्यूनंतर मला खूप सजवा. मेरी मांग सिंदूरसे भर देना…” पुढे भूतनाथ (गुरुदत्त) ला असे म्हणते,” तू शादी क्यू नही करता मुझे मेरी बहू को देखना है…” या वाक्याने या दोघांमधील नात्याचा संदर्भ स्पष्ट होतो. भूतनाथकडे ती आपल्या पोटच्या मुलासारखे पाहत असते आणि हाच शेवट ठेवून चित्रपट बनवला. प्रेक्षकांना देखील हा शेवट खूप आवडला. (Climax change)
======
हे देखील वाचा : ‘या’मुळे अभिनेत्याचे नाव पडले जॉनी वॉकर
======
विमल मित्र यांच्या कादंबरीवरील या चित्रपटाने हिंदी सिनेमाच्या दुनियेत आपले स्वतःचे एक अढळस्थान निर्माण केले आहे. विमल मित्र यांच्या कलाकृतीवर आधारित ‘साहीब बीवी और गुलाम’ हा चित्रपट भारतीय चित्रपटातील एक माइल स्टोन सिनेमा आहे. या चित्रपटात मीना कुमारीने अप्रतिम अभिनय केला होता. यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये या चित्रपटाने आपली चांगली मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मीना कुमारी) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (अब्रार अल्वी) सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर (व्ही के मूर्ती) यांना पुरस्कार मिळाले. यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील ‘साहीब बीवी और गुलाम’ या चित्रपटाला मिळाला.