चिन्मय मांडलेकर: मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलावंत
“एकवेळ तो हिरावून घेऊ शकतो आमचा प्राण, पण कधीच हिरावून घेऊ शकत नाही आमच स्वराज्य” हे शब्द कानावर पडले की, अंगावर काटा उभा राहतो. फत्तेशिकस्त चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेले बोल प्रत्येक जण चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर तोंडातल्या तोंडात म्हणत होता. या चित्रपटात अभिनेता म्हणून असणाऱ्या दिग्दर्शक, लेखक अशा सर्वगुणसंपन्न असणाऱ्या चिन्मय मांडलेकर या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला सर्वार्थाने न्याय दिला आहे.
मराठी चाहत्यांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या काही मोजक्या कलाकारांपैकी एक म्हणजे चिन्मय मांडलेकर. चिन्मयला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले लोक संत तुकारामांच्या भूमिकेमुळे जास्त ओळखायला लागले. संध्याकाळच्या वेळी दमून भागून घरी आलेली गावाकडील मंडळी जेव्हा ‘संत तुकाराम’ मालिका पाहायची तेव्हा त्यांचा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. गावाकडची माणसे ‘तुकाराम’ या मालिकेसोबतच चिन्मयच्या अभिनयावरही प्रेम करू लागली आणि त्यालाच तुकाराम मानू लागली.
चिन्मयच्या कारकिर्दीचा प्रवास तसा साधा सरळ म्हणता येणार नाही. लहान असताना, पुढे जाऊन आपण सिनेसृष्टीत एवढं नाव मिळवू, असं काही त्याच्या ध्यानीमनी पण नव्हते. अर्थात असं असलं तरी, सध्याच्या घडीला सर्वगुणसंपन्न असणाऱ्या चिन्मयचा सिनेक्षेत्रातला प्रवास मात्र सोपा नव्हता.
चिन्मयचा जन्म २ फेब्रुवारी १९७९ रोजी कारंडे हॉस्पिटल, दादर येथे झाला. घरासमोरचे अरुंद रस्ते आणि गल्यांमध्ये खेळातच चिन्मय लहानचा मोठा झाला. चिन्मय अवघा ३ वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे लहान वयात त्याला आईचा सहवास लाभलाच नाही. त्यानंतर वडीलच त्याच्यासाठी सर्वस्व होते. आजोळ आणि वडिलांचे घर जवळ जवळ असल्यामुळे चिन्मयचे लहानपण तसे मजेत गेले. दोन्ही कुटुंबांनी विशेषतः आजी, मावशीने त्याला आईची कमी भासू दिली नाही.
चिन्मयचे शिक्षण सेंट सॅबिस्टीअन स्कुल येथे झाले. त्याचे बालपण आणि शिक्षण भावा-बहिणींसोबत मजेत चालले होते. शाळेतही त्याचे अनेक मित्र होते. त्यांच्यासोबत शाळेत गेल्यानंतर चिन्मय भरपूर दंगा-मस्ती करायचा. लहान असताना त्याने शिवा नावाचा चित्रपट पहिला होता. त्या चित्रपटातील नायक सायकलची चेन घेऊन फिरवत असायचा. त्याला पाहून चिन्मयही मित्रांसमोर सायकलची चेन फिरवून हवा करायला लागला.
चिन्मय जेव्हा पाचवीला गेला तेव्हा त्याला अभ्यासक्रमात मराठी विषय आला. त्या विषयाचा जेव्हा ३ तासांचा पेपर असायचा तेव्हा चिन्मय तन, मन धन लावून निबंध लिहिण्यासाठी दोन तास घालवायचा. जेव्हा त्याच्या लक्षात यायचे की, आपला बाकीचा पेपर लिहायचा राहिलाय तेव्हा मात्र त्याचा गोंधळ उडायचा. जेव्हा मराठी पेपरचे गुण मॅडम सांगत असायच्या तेव्हा चिन्मयला गुण जरी कमी पडलेले असले, तरी त्याच्या निबंधाचे देवकुळे मॅडम मात्र आवडीने कौतुक करत असायच्या.
तेव्हापासूनच त्याच्या मनात कुठंतरी मराठीची आवड निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र दिवसेंदिवस मराठीचे प्रेम मात्र वाढतच चालले होते. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात पण तो आवडीने सहभाग घ्यायला लागला होता. एकदा असाच एक प्रसंग घडला. शाळेच्या होणाऱ्या नाटकात चिन्मय भाग घ्यायला गेला मात्र त्याला नकार देण्यात आला. त्यानंतर मात्र त्याच्या मनावर दूरगामी परिणाम झाले.
व्यसन, सिनेमे यांच्यातच तो गुरफटू लागला. पण दहावीत असताना त्याला त्याच्या नंदा मावशीने तिच्याकडे बोलावले आणि त्याला समजावले. त्यांनतर मात्र चिन्मयने आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केले आणि दहावीला त्याला चक्क ८० तक्के मार्क्स मिळाले. त्यानंतर बाबांच्या आणि त्याच्या भांडणात त्याला कॉमर्सचा रस्ता धरावा लागला.
चिन्मयने डहाणूकर महाविद्यालयात कॉमर्सला प्रवेश घेतल्यानंतर त्याचे नाटकाचे विश्व पूर्णपणे बदलून गेले. एकदा कॉलेजमध्ये असताना जाणता राजा नाटकाची तालीम चालू होती आणि तेव्हा विश्वास आपटेने त्याला, “तू अभिनय करू नकोस, तुला जमत नाही.” अशी सक्त ताकीद दिली. ही घटना त्याच्या आयुष्याला किक देणारी ठरली .
एकदा विनय पेशवे सरांच्या वर्कशॉपमध्ये चिन्मयने सहभाग घेतला होता. पण त्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा ७ वाजताच्या वर्कशॉपसाठी असेल, तर चिन्मय ३ वाजताच घरून निघायला लागला. तो घरून चालत वर्कशॉपच्या ठिकाणी पोहोचायचा आणि खऱ्या अर्थाने इथूनच त्याच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने अनेक दिग्गज अभिनेत्यांचे वर्कशॉप अटेंड केले. हळूहळू त्याच्यातील अभिनेत्याने बाळसे धरायला सुरुवात केली. त्यानंतर ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’मधून त्याने शिक्षण पूर्ण केले.
हे ही वाचा: मराठी चित्रपटसृष्टी कात कधी टाकणार? ‘सिंडिकेट’ बनाना मंगता है!
मायबापा विठ्ठला: अजय- अतुलच्या शब्द -स्वरांनी पाणावले डोळे!
चिन्मयने कच्चा लिंबू, दुनियादारी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर आधारलेल्या झेंडा चित्रपटात त्याने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हिरकणी आणि फत्तेशीकस्त चित्रपटात त्याने केलेल्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘एक थी बेगम’ या वेबसिरीज मधली त्याची इन्स्पेक्टरची भूमिकाही विशेष लक्षवेधी होती. समुद्र या नाटकामधील, तर वादळवाट, तू तिथे मी अशा अनेक मालिकांमधील त्याच्या भूमिकांचेही कौतुक झाले.
चिन्मय मांडलेकर आता आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात सेटल झाला आहे. पत्नी नेहा मांडलेकर, जहांगीर आणि इरा ही दोन गोड मुले यांच्यासोबत त्याचा सुखी संसार चालू आहे. प्रेक्षकांसाठी चिन्मयचा चित्रपट पाहणे ही कायमच पर्वणी असते. अशा या अष्टपैलू चिन्मयला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्याच्याकडून सातत्याने दर्जेदार लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय होत राहील हीच सदिच्छा!
-विवेक पानमंद