प्रिय प्रिया…
‘याईरे याईरे जोर लगाके नाचे रे’ या रंगीला गाण्यावर ताल धरत घराघरात पोहोचलेली ‘बी. कला’ सगळ्यांना माहितीच आहे. अहो, बी. कला म्हणजेच शशिकला भोसले. सचिन खेडेकर यांची ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटातली मुलगी. आठवली वाटतं? ही साधी सोज्वळ मुलगी पुढे जाऊन एक हॉट एक्ट्रेस बनेल, असं कुणाला वाटलंही नसेल. तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी बोलतेय प्रिया बापट बद्दल! तिचा आज वाढदिवस आहे म्हटल्यावर शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. प्रियाला शुभेच्छा देण्याचा कलाकृती मीडियाचा हा आगळावेगळा आणि एकमेव मार्ग. चला तर जाणून घेऊया प्रियाचा अभिनय क्षेत्रातील प्रवास…
प्रियाने लहानपणापासूनच शालेय नाटकांतून अभिनयाची सुरुवात केली. शाळेत असताना शिक्षकांनी तिच्यातील अभिनय कौशल्य पारखून तिला पाठिंबा दिला. या पाठबळाच्या जोरावर तिनेही मेहनत घेतली. याचं फळ म्हणून बारावीत असताना तिला जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली. ‘सनसिल्क’, ‘मिल्क अँड रोझेस’, ‘तीन सुप्रीम’, ‘हिरो होंडा’, ‘सिनेमॅक्स’, ‘पास पास’ अशा फेमस ब्रँड्सच्या जाहिरातीतून तिने काम केले. अभिनयासोबत तिने शिक्षणाचीही साथ सोडली नाही. बी. ए. अर्थशास्त्र, मास कम्युनिकेशन, फिल्म मेकिंग कोर्स या विषयांत तिने शिक्षण घेतले. अभ्यास पूर्ण झाला आणि प्रियाने चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. २००० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात देखणी भूमिका साकारून तिने चित्रपट सृष्टीतील अभिनय प्रवासाचा श्रीगणेशा केला. मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांतदेखील तिने छोट्या; परंतु लक्षवेधी भूमिका केल्या. त्यानंतर २००८ साली प्रदर्शित झालेल्या महेश मांजरेकर यांच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातून शशिकला घराघरांत पोहोचली. चित्रपटातील बाबांना म्हणजेच सचिन खेडेकर यांना तिने मारलेली बाssबा अशी प्रेमळ हाक प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. २०१० साली ‘आनंदी आनंद’ आला, यात प्रियाची मुख्य भूमिका होती! चित्रपट सुरू असतानाच प्रियाने मालिकांकडे मोर्चा वळवला. आनंदी आनंद, शुभंकरोती, अधुरी एक कहाणी त्या मालिकांत तिने केलेला अभिनय प्रेक्षकांना भावला. टाइम प्लीज, आंधळी कोशिंबीर, हॅप्पी जर्नी, लोकमान्य – एक युगपुरुष, टाईमपास टू आणि काकस्पर्श या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांनी प्रियाच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला कलाटणी मिळाली.
प्रिया फक्त उत्तम अभिनेत्रीच नाही, तर ती एक उत्तम सूत्रसंचालक आणि गायिका आहे. छोट्या पडद्यावरील अनेक रियालिटी कार्यक्रमांत तिने सूत्रसंचालनाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. अल्फा फीचर्स, अल्फा पाणीपुरी, आपलं अल्फा अवॉर्ड, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, सारेगमप आणि आम्ही ट्रॅव्हलकर या कार्यक्रमांची अँकर म्हणूनही प्रिया प्रसिद्ध आहे. सारेगमपच्या माध्यमातून ती खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. प्रियाने शुभदा दादरकर यांच्याकडे दोन वर्षे नाट्यसंगीत, भावगीत आणि भक्ती गीताचे प्रशिक्षण घेतले आहे. पण वोकल कॉर्डच्या समस्येमुळे काही काळ तिने गाणे थांबवले होते. चित्रपट असो, मालिका असो, सूत्रसंचालन असो किंवा गायन असो.. सगळ्यातच ही तरबेज! अशी ही चतुरस्त्र अभिनेत्री! आता तर वेब सिरीजच्या नव्या युगात देखील तिने पदार्पण केले आहे. सिटी ऑफ ड्रीम्स ही तिची वेबसिरीज खूप गाजली. त्यानंतर आलेली ‘आणि काय हवं?’ ही तर सर्वार्थाने कमाल अशी वेबसिरीज होती.
प्रिया बापट आणि उमेश कामत ही सध्याची स्क्रीनवरची आणि खऱ्या आयुष्यातली देखील यशस्वी जोडी! ‘मोस्ट क्युट कपल’ असा अवॉर्ड द्यायचं म्हटलं तरी तो कमी पडेल इतकी कमाल आणि बहार जोडी आहे ही! यांची अप्रतिम केमिस्ट्री प्रेक्षकांना स्क्रीन वर जशीच्या तशी पाहायला मिळाली ती ‘आणि काय हवं’ या वेबसिरीजच्या माध्यमातून. ‘कमाल’ आणि ‘बहार’ अशी ही सिरीज लॉकडाऊनच्या काळात चक्क झी मराठीवर प्रदर्शित झाली. आणि काय हवं, नाही का? विविध शॉर्ट फिल्म, शॉर्ट सिरीज किंवा जाहिरातींच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. खरंय, कपल असावं तर असं!
अभिनय आणि आणि वैयक्तिक आयुष्याची अचूक सांगड घालत विविध व्यक्तिरेखांमध्ये सहज शिरणारी प्रिया आपल्या देहबोलीने अभिनयातला प्रामाणिकपणा दाखवून देते. कलाकृती मीडियातर्फे प्रिया बापट हिला वाढदिवसाच्या बहाSSSर शुभेच्छा! तुला आणि तुझ्या लक्षवेधी अभिनयाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
- सोनल सुर्वे