हॅपी बर्थ डे शक्ती कपूरजी !
“आऊ ललिता….”
“नंदू सबका बंधू”
“मैं नन्हासा छोटासा बच्चा हूँ !”
एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच कोणत्या खलनायकाचा आज वाढदिवस आहे. हो, बरोबर ओळखलंत. शक्ती कपूर यांचा आज 68 वा वाढदिवस. तुम्हाला शक्ती कपूर यांच्याबद्दल एक गोष्ट माहित आहे का ? शक्ती कपूर हे त्यांचं खरं नाव नसून सुनिल सिंकदरलाल कपूर आहे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदललं.
दिल्लीच्या एका सामान्य पंजाबी कुटुंबात 3 सप्टेंबर 1952 साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं कपड्यांचं दिल्लीत दुकान होतं. दुकानात शक्ती कपूर कपडे शिलाईचं काम करायचे.
पुणे फिल्म इन्स्टिट्युटमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत असताना त्यांना “खेल खिलाडी का’ या सिनेमाची ऑफर आली. हा त्यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यासोबत काम केलं. अभिनयाचा वारसा नसताना स्वत:च्या मेहनतीच्या जीवावर त्यांनी आपलं सिनेसृष्टीत नाव कमावलं. 700 हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केलंय. हिंदी सिनेसृष्टीप्रमाणे त्यांनी बंगाली भाषिक सिनेमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
शक्ती कपूर यांना बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. काहीजण त्यांना एक विनोदी कलाकार म्हणून ओळखतात तर काहीजण खलनायक. त्यांच्या जेवढ्या खलनायकाच्या भूमिका गाजल्या तेवढ्याच त्यांच्या विनोदी भूमिकाही. गोविंदा, कादर खानसोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली. आजही आपण मित्र-मैत्रिणींमध्ये गप्पा मारताना हमखास त्यांचे डायलॉग वापरतो.
खरंतर खूप कमी अभिनेते असे आहेत की त्यांना एकतर खलनायक म्हणून प्रसिद्धी मिळते किंवा एक कॉमेडियन म्हणून. पण शक्ती कपूर याला अपवाद आहेत. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘कॉमेडियन’ आणि ‘व्हिलन’ अशा दोन्ही भूमिकांसाठी प्रसिद्धी मिळवून दिली. सिनेमात पात्र कोणतंही असो शक्ती कपूर यांचा पात्राकडे बघण्याचा एक विशेष नजरिया आहे. प्रत्येक पात्र ते जगतात. त्यामुळे त्यांचा अभिनयही मनाला सहजरित्या भिडून जातो. त्यांच्या आवाजातला भारदस्तपणा, संवाद फेकची विशेष शैली यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला विशेष वजन प्राप्त होतं.
डेव्हिड धवन यांच्या ‘राजाबाबू’ सिनेमात ‘नंदू’ची भूमिका केली होती. त्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला आहे. अलिकडच्या काळात ‘हंगामा’, ‘चुपचुपके’, ‘मालामाल विकली’, ‘भागम भाग’ सिनेमात त्यांनी काम केलं. शक्ती कपूर यांची लव्हस्टोरीही एखाद्या सिनेमाला शोभेल अशीच आहे. त्यांनी 1900 च्या दशकातील अभिनेत्री शिंवागी कोल्हापूरेशी पळून जाऊन लग्न केलं.
‘किस्मत’ चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापूरे यांना साईन करण्यात आलं होतं. पण पद्मिनी कामात व्यस्त असल्यामुळे त्या सिनेमा करू शकल्या नाहीत आणि त्यांच्या जागी त्यांची बहिण शिंवागी कोल्हापूरे यांची सिनेमासाठी निवड करण्यात आली. या चित्रपटात शक्ती कपूर यांचीही भूमिका होती. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शक्ती कूपर आणि शिवांगी कोल्हापूरेचे सूर जुळून आले. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने दोघांनी पळून जाऊन कोर्ट मॅरेज केले. शक्ती कपूर आणि शिंवागी कोल्हापूरे-कपूरला दोन मुलं आहेत. सिध्दांत कपूर आणि सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर.
कलाकृती मिडीयाकडून बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांना वाढदिवसाच्या शूभेच्छा !