सुनील शेट्टी: बॉलिवूडचा ॲक्शन हिरो ज्याला सलमानही मानतो…
सुनील शेट्टी! त्याला बघून तो कोणाचा क्रश, आवडता हिरो वगैरे असेल असं काही वाटत नाही. तो बॉलिवूडमध्ये आला तेव्हा बॉलिवूडमध्ये ऋषी कपूर, आमिर, सलमान, अनिल कपूर या नायकांची चलती होती. त्याच दरम्यान अक्षय कुमार नावाचा देखण्या चेहऱ्याचा ॲक्शन हिरो बॉलिवूडमध्ये दाखल झाला होता, तर अजय देवगण बऱ्यापैकी स्थिरस्थावर होत होता. अर्थात अजयही काही ‘चॉकलेट बॉय’ नव्हता शिवाय त्याचा अभिनय आत्ताइतका बहरलाही नव्हता. पण, सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) तुलनेत बरा म्हणावा असा होता.
देखणा चेहरा नाही, आवाजात जरब नाही, नृत्याचं अंग नाही आणि अभिनयही यथातथाच. अशा परिस्थितीत त्याचा बॉलिवूडमध्ये टिकाव लागणं तसं अवघडच होतं पण तो टिकला. पहिल्याच चित्रपटात नायिका म्हणून लाभली ती गोड चेहऱ्याची दिव्या भारती. तेव्हा सोशल मीडिया असता तर, या विजोड जोडीवरून कित्येक मिम्स तयार झाली असती. असो. तर, शेट्टी अण्णांचे बॉलिवूडमध्ये आगमन झालं ते १९९२ साली ‘बलवान’ या चित्रपटातून. हा चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर टिकाव धरू शकला नाही. पण तरीही कसा कोण जाणे पण सुनील शेट्टी लोकांच्या लक्षात राहिला.
बलवान नंतर त्याचा ‘वक्त हमारा है’ हा चित्रपट आला. हा चित्रपट मल्टीस्टारर होता. त्यामुळे चित्रपट हिट होऊनही त्याचा सुनीलला तसा फारसा फायदा झाला नाही, पण या चित्रपटातली त्याची आणि अक्षय कुमारची ‘केमिस्ट्री’ लोकांना प्रचंड आवडली. आणि ती पुढे अनेक चित्रपटांत बघायला मिळाली. बॉलिवूडमध्ये काही नायकांच्या जोड्या हिट झाल्या त्यापैकीच एक म्हणजे अक्षय कुमार – सुनील शेट्टी (Suniel Shetty) ही जोडी.
यानंतर मात्र त्याच्या अभिनयात जरा सुधारणा झाली आणि १९९४ साली आलेल्या ‘दिलवाले’ आणि ‘मोहरा’ या चित्रपटांमधून त्याने आपल्याला अभिनय करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. पण हे दोन्ही चित्रपट मल्टीस्टारर होते. त्याच वर्षी आलेल्या गोपी किशन चित्रपटात त्याने चक्क ‘डबल रोल’ केला होता, पण दुर्दैवाने हा चित्रपट अयशस्वी ठरला.
पुढे त्याचे अनेक फ्लॉप चित्रपट येत – जात राहिले, पण सुनील शेट्टी (Suniel Shetty) मात्र बॉलिवूडमध्ये तग धरून राहिला. तरुणींचा तो आवडता ‘हिरो’ कधीच नव्हता. त्यामुळे सुनील शेट्टी आवडतो म्हणून कुठलीही मुलगी त्याचा चित्रपट बघायला गेली नसेल, पण अनेक तरुणांना त्याची फायटिंग आवडायची. त्यामुळे तरुणांमध्ये तो तसा बऱ्यापैकी लोकप्रिय होता. पण तरीही त्याला सुंदर अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स करताना बघून हेच तरुण डोक्यावर हात मारून घेत असत. ‘टक्कर’ चित्रपटात खास करून त्यामधल्या ‘आँखो मे बसे हो तुम…’ या गाण्यात सोनाली बेंद्रेसोबत रोमान्स करताना बघून हे तरुण हळहळले होते.
काही म्हणा पण, त्याला नेहमीच करिष्मा, रविना, सोनाली बेंद्रे, शिल्पा शेट्टी यासारख्या देखण्या नायिका लाभल्या आणि या नायिकांसोबतच त्याला लक्षात राहण्यासारखी उडत्या चालीची गाणीही मिळाली. क्या अदा क्या जलवे तेरे पारो, शहर कि लडकी, हॅलो हॅलो बोलके.. मेरे आजूबाजू डोलके.., देख मेरे भाई, झान्झरिया उनकी झनक गयी.., सुंदरा सुंदरा..अशी उडत्या चालीची त्याची अनेक गाणी लोकप्रिय झाली, तर आँखो मे बसे हो तुम, ना कजरे कि धार, तुम दिल कि धडकन मे अशी रोमँटिक गाणीही त्याच्या वाट्याला आली.
बॉर्डर, भाई, हुतूतू या चित्रपटांमधलाही त्याचा अभिनय लक्षात राहिला. पण त्याच्या अभिनयाची चुणूक बघायला मिळाली ती ‘हेराफेरी’ या चित्रपटातून. अर्थात हा चित्रपटही मल्टीस्टारर चित्रपट होता. पण हरकत नाही त्याने यामध्ये चांगलं काम केलं होतं. जंगल, रिफ्युजी या चित्रपटांमध्येही त्याने चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. पण त्याला एक चांगला हिट मिळाला तो ‘धडकन’ हा चित्रपट. खूप वर्ष रखडलेला हा चित्रपट एवढा सुपरहिट होईल अशी अपेक्षा खुद्द निर्मात्यांनीही केली नव्हती. पण हा चित्रपट सुपरहिट झाला आणि सुनीलला (Suniel Shetty) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर अवॉर्डही मिळालं. विशेष म्हणजे त्या वर्षी रिफ्युजी मधील नकारात्मक भूमिकेसाठीही त्याला नामांकन मिळालं होतं.
ॲक्शन भूमिकांपेक्षा त्याचा अभिनय गंभीर आणि विनोदी भूमिकांमध्ये जास्त बहरला. हेरा फेरी २ मध्ये तो चक्क बिपाशा सोबत रोमान्स करताना दिसला. यामधल्या त्याच्या अभिनयाचंही कौतुक झालं. पुढे २००२ साली तो चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उतरला. यामधून त्याने ‘खेल’ चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये क्रिकेटर अजय जडेजानेही भूमिका केली होती. पण हा चित्रपट काही फारशी कमाल दाखवू शकला नाही. रखत (Rakht), भागम भाग, मिशन इस्तंबूल, EMI, लूट, इ चित्रपटांची निर्मिती केली.
=======
हे देखील वाचा – ‘तो’ चित्रपट सुरेश वाडकर यांच्या आयुष्यामधली खूप मोठी चूक होती
=======
सुनील शेट्टी प्रचंड श्रीमंत असल्याच्या चर्चाही रंगत असतात. पण तो कधीच कुठल्या ‘कॉंट्रोव्हर्सी’ मध्ये अडकला नाही. काही म्हणा, पण बॉलिवूडमध्ये आपल्या शेट्टी अण्णांचा जबरदस्त दबदबा आहे. सलमान खान सकट कित्येक मोठ मोठे स्टार्स त्याला मानतात. यावर्षी तो आपला ६१ वा वाढदिवस साजरा करतोय.. त्यानिमित्त त्याला हार्दिक शुभेच्छा!