दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘या’ कारणामुळे वहिदा रेहमान आणि राज खोसला पुन्हा कधीही एकत्र आले नाहीत
ज्यांची आठवण जरी झाली तरी मन प्रसन्न होतं अशीच भले कितीही वय झालं तरी त्यांचं दर्शन, भेट ही नेहमीच उत्साहदायी वाटते. यापैकी एक म्हणजे वाहिदा रेहमान! वहिदाचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 चा म्हणजे आज बाई चक्क 84 वर्षांच्या झाल्या की…!
एक आहे, जे कलावंत नृत्यप्रविण असतात त्यांच्या सगळ्याच हालचाली मोहक असतात. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे बीरजू महाराज. अगदी माधुरी दीक्षितच्या समोर उभे राहून ते हाव-भाव वर्णन करू लागतात तेव्हा त्यांची लय पाहून त्यापुढे माधुरी फिकी पडते. पण बीरजू महाराज गुरूंचे गुरू होते. पण वहिदाचं तसं नाही. त्या स्वत: फीट राहण्यासाठी अजूनही नृत्याचा सराव करतात. म्हणून तर कुठल्यातरी कार्यक्रमात त्यांनी शिल्पा शेट्टी बरोबर गाईड चित्रपटालं ‘कॉटोसे खिचके ये आचल’ हे गाणं सादर केलं. तेव्हा ते पाहून चवळीच्या शेंगेसारखी सडसडीत असलेल्या शिल्पा शेट्टीला अत्यानंदाने वहिदापुढे नम्र व्हावस वाटलं ते काय उगीच?
वहिदाने जागच्या जागी उभं राहून केलेल पदन्यास आणि मुद्राभिनय पाहून कुणाच्याही तोंडातून वा! अशी दाद जातेच. हे सोपं काम नाही, ही आयुष्यभराची मेहनत आहे आणि जिद्द आहे.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे तो मोठा किर्तीमान झाला तर सांगायची गोष्ट असते. वहिदा रेहमानच्या बाबतीत आता तर नक्कीच हे सांगता येईल. गुरुदत्तला आपल्या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याची अभिनेत्री हवी होती. काहीतरी कामासाठी तो हैद्राबादला गेला असताना कुणी तरी त्याला सांगितल की, ‘राजूल मलाई’ नावाचा तमिळ चित्रपट आला आहे. त्यात एक नृत्य आहे त्या नृत्यामधील अभिनेत्रीचा चेहरा मोहक आहे.
गोष्टी घडायच्या असल्या की झटपट घडतात गुरुदत्त आणि मंडळींनी ‘राजूल मलाई’ चा विशेष खेळ पाहिला. गुरुदत्तांना ती नृत्यागंना पसंत पडली. लगेचच दुसऱ्या दिवशी भेटीची वेळ देखील ठरवली गेली. विशेष म्हणजे ह्या नृत्यागनाने गुरुदत्तशी लेखी करार केला आणि त्या अटी पाळायला लावल्या.
=====
हे देखील वाचा: वहिदा रहेमान या चित्रपटसृष्टीमध्ये आल्या त्या योगायोगानं… खरंतर एक डॉक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न होतं…
=====
चित्रपटात सर्वसाधारणपणे तुमचं खरं नाव वेगवेगळी कारण सांगून बदलतात आणि नवं सोपं-आकर्षक नाव ठेवतात, असा प्रघात आहे. त्यामागे आम्ही तुम्हाला नवा जन्म दिला हे दर्शवण्याची अहंता देखील असते. पण ‘राजूल मलाई’ मधल्या त्या नृत्यांगनेने आपलं नाव बदलण्यास साफ नकार दिला. चित्रपटात झळकण्यासाठी काय काय तडजोडी करायल लागतात हे आपण पाहतोच. पण ह्या मुलीने कटाक्षाने त्याला विरोध केला आणि नाव बदलू दिलं नाही. अर्थात हे नाव म्हणजे वहिदा रेहमान, हे आता वेगळं सांगायला नकोच.
मात्र वहिदा रेहमानचा पहिला हिंदी चित्रपट होता सी.आय.डी. या चित्रपटाची नायिका होती शकिला. तर वहिदाचा रोल कल्ब डान्सरचा होता! या चित्रपटाचा दिग्दर्शक होता राज खोसला दिग्दर्शक म्हणून त्याचा हा दुसराच चित्रपट होता. ‘कहीं पे निगाहे कही पे निशाना, जीने दो, जालिम बनाओना निशाना’ हे गाणं वहिदावर चित्रित होत होतं. या गाण्यात तिचा पदर पडतो असे राज खोसलाने सांगितले. पण वहिदाने त्यास साफ नकार दिला. राज खोसलाने खूप आकांडतांडव केला तेव्हा वहिदाने काँट्रॅक्टची ढाल पुढे केली आणि दाखवलं, “भूमिकेची गरज नसल्यास अभिरुचीहीन दृष्य घेण्यात येणार नाहीत.”
राज खोसलाला आपला आग्रह मागे घ्यायला लागला. त्यावेळी खोसला- वहिदाचं जे बिनसलं ते बिनसलंच. वहिदाने खोसलाकडे कायमची पाठ फिरवली.
सी.आय.डी. नंतर वहिदा रेहमानला यशच यश मिळत गेलं. गुरुदत्त आणि वहिदा ही आख्यायिका होत गेली. अगदी राजेश खन्नाची नायिका होण्यापर्यंत ती एक एक पुढचे पाऊल टाकत गेली. हा चित्रपट म्हणजे खामोशी. त्यामुळे सगळ्याच नायकांना आपली नायिका वहिदा असावी असे वाटत असे. त्यातच एक होता शम्मी कपूर.
तो काळ असा होता की, शम्मी सांगे आणि प्रोड्युसर-डायरेक्टर डोले. मग नायिका तो सांगेल ती घ्यायची. पण शम्मी आणि वहिदा कधीच एकत्र येऊ शकले नाहीत. आणि याची रूखरूख शम्मी कपूरला लागून राहिली.
पुढे कित्येक वर्षांनी मनमोहन देसाईच्या चित्रपटात एका गाण्यात एकमेकांच्या गाजवलेल्या नायक नायिकांच्या जोड्या येतात असं दृष्य होतं. त्यासाठी शम्मी कपूरला देखील बोलवलं होतं. तेव्हा त्याने मनमोहन देसाईला म्हटलं, “अरे मन, माझ्यासाठी एक काम करतो मी वहिदा बरोबर कधीच काम केलेलं नाही. जमलंच नाही. पण आता वहिदा रेहमान पण आलेली आहे. निदान या गाण्यात तरी ती माझ्या हातात हात घालून येउदे. याला ती तयार आहे का, असे विचार ना?
=====
हे देखील वाचा: पहिला भारतीय क्राईम थ्रिलर चित्रपट असलेल्या सीआयडीनं प्रेक्षकांना अक्षरश मोहीनी घातली होती…
=====
अर्थात मनमोहन देसाई वहिदाकडे गेले आणि शम्मीची इच्छा सांगितली. वहिदा फक्त हसली आणि म्हणाली, “ओ.के. नो प्रॉब्लेम.” अर्थात गाण्याच चित्रिकरण झालं ते तुम्ही पहाचं – चित्रपट नसिब आणि गाणं अर्थातच “जॉन जानी जनार्दन तरारपपम् पम् पम…”
वहिदा कशी मनात राहते त्याचं अजून एकहे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे, व.पु. काळे यांनी लिहिलेली तूच माझी वहिदा ही कथा.
आज वहिदा ८४ वर्ष पार करत आहे तरी ह्या गोष्टी मोहक वाटतात ना? वहिदा रेहमानचं मोठेपण ह्यातच आहे!
– रविप्रकाश कुलकर्णी
(जेष्ठ लेखक/ पत्रकार)