दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
हसवाफसवीला जेव्हा मिळाली नटसम्राटाची दाद
“हा कलाकार जर पाश्चात्य देशात जन्माला आला असता तर लोक डोक्यावर घेऊन नाचले असते” प्रत्यक्ष पु.ल.देशपांडे यांनी एका कलाकारासाठी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया खास आहे. हा कलाकार म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता दिलीप प्रभावळकर. नाटकासोबतच चित्रपट,मालिका, लेखन अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारं अत्यंत लोकप्रिय आणि सर्जनशील असे हे व्यक्तिमत्व. त्यांनी साकारलेल्या भूमिका पाहिल्या की वाटतं, इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका क्वचितच एखाद्या कलाकाराच्या वाट्याला आल्या असतील. या भूमिका जितक्या खास तितकीच त्यांना मिळालेली दादही विशेष!
बालरंगभूमीवरचं सदाबहार नाटक म्हणजे ‘अलबत्या गलबत्या’.या नाटकातील दिलीपजींची चिंची चेटकीण त्या काळात आबालवृद्धांना भावली. हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं तेव्हाची ही गोष्ट.नाटककार रत्नाकर मतकरींनी दिलीपजींना नाटकातील भूमिकेसाठी बोलावलं.पण स्त्रीपात्र असणारी चेटकीण आपल्याला साकारायची आहे ह्याची दिलीपजींना सुतराम कल्पना नव्हती.तिथे जमलेल्या महिला कलाकारांना आपल्याला ह्या भूमिकेसाठी निवडलं जाईल अशी खात्री होती.पण मतकरींनी ही भूमिका दिलीप प्रभावळकर करणार हे ठामपणे सांगितलं. वास्तविक स्वत: दिलीपजींसाठी हा एक धक्का होता.पण त्यांनी ती भूमिका कमाल साकारली.ती इतकी हुबेहूब होती की, अनेकदा प्रेक्षक मतकरींना विचारत की चेटकीणीसाठी इतकी उंच बाई कशी काय शोधली? प्रेक्षकांना एक पुरुष चेटकीणीचं स्त्री पात्र रंगवतोय ह्याची कल्पनाही आली नाही ही त्या कलाकाराला मिळालेली दादच.
एकीकडे दुष्ट चेटकीणीचे स्त्री पात्र तर दुसरीकडे ‘वासूची सासू’ नाटकातील देखणी सासू. स्त्री पात्र रंगवतानाही त्यात एक संयम , सभ्यता दिलीपजींनी नेहमीच पाळली. त्यात हिडीसपणाचा लवलेशही येऊ दिला नाही. या नाटकाची तालीम साहित्य संघ मंदिर गिरगाव इथे सुरू होती. सुप्रसिद्ध अभिनेता दाजी भाटवडेकर त्या वेळी नेमके साहित्य संघात आले होते.ते शेवटच्या सीटवर बसून तालीम बघत असताना दिलीप प्रभावळकर यांची एंट्री झाली आणि दाजींच्या तोंडून नकळत हाक आली,”सुहासssss”. दिलीप प्रभावळकर यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी तालमीनंतर दाजींना विचारल्यावर दाजींनी सांगितलं की स्त्रीवेशातील दिलीपजींना पाहून त्यांना दूरदर्शनवरील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व सुहासिनी मुळगावकरांची आठवण झाली. त्याकाळी दूरदर्शनवरील कार्यक्रमांमध्ये सुहासिनी मुळगावकर हे नाव लोकप्रिय होतं. एका सुसंस्कृत, सुंदर स्त्रीची आठवण दिलीपजींच्या स्त्रीरुपाला पाहून व्हावी ही पण त्यांच्या कामाला मिळालेली दादच म्हणता येईल.
या पलिकडे एका नटसम्राटाने एका लोकप्रिय खेळीयाला (दिलीप प्रभावळकर यांच्या पुस्तकाचे नाव- एका खेळीयाने) दिलेली दाद तर केवळ अविस्मरणीय. दिलीप प्रभावळकरांचं प्रचंड गाजलेलं नाटक म्हणजे “हसवाफसवी”. त्यातल्या बहुरंगी बहुढंगी भूमिका साकारणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. एका नाटकाच्या प्रयोगाला डॉ.श्रीराम लागू आले होते. दिलीप प्रभावळकरांना त्याचं प्रचंड दडपण आलं होतं. डॉ.लागूंना नाटक आवडेल वा नाही याची चिंता दिलीपजींना वाटत होती. पण प्रयोग संपल्यावर नाटकाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. लागू म्हणाले,” “हसवाफसवीचा प्रयोग पहाणं म्हणजे अभिनयाचा वर्षभराचा अभ्यासक्रम एका नाटकात पूर्ण करण्यासारखं आहे”. ही दाद दिलीप प्रभावळकर यांच्या कामाचं यथार्थ वर्णन करणारी ठरली . इतकंच नाही तर हसवाफसवीचे ७५० प्रयोग करुन हे नाटक थांबवायचा निर्णय दिलीपजींनी घेतल्यावर डॉ.लागू पुन्हा नाटक पहायला आले. आपल्या आवडत्या कलाकाराचं आत्मचरित्र दिलीप प्रभावळकर यांना कामाचं कौतुक म्हणून भेट दिलं आणि त्यावर संदेश लिहिला, “हसवाफसवीला नम्र सलाम.”
कित्येकदा पुरस्कारांपेक्षा कौतुकाची ही थाप कलाकारासाठी जास्त महत्त्वाची असते. हे कौतुक कुणी केलंय हे तितकंच महत्त्वाचं. कारण त्यातून कलाकाराला मिळणारी सकारात्मक उर्जा चांगल्या दर्जेदार कामासाठी प्रवृत्त करत रहाते. कलाकारातल्या खेळीयाला जिवंत ठेवते.