Heal the World – काळाची गरज
काही दिवसांपूर्वी मायकल जॅक्सनचं ‘Heal the world’ हे गाणं ऐकलं. १९९१ साली रिलीज झालेल्या ‘डेंजरस’ या अल्बममधल्या चौदा गाण्यांपैकी एक गाणं. त्या निमित्ताने मायकल जॅक्सनबद्दल थोडं अधिक वाचन केलं गेलं आणि लक्षात आलं की लहान मुलांबद्दल आणि एकंदरीतच या जगाबद्दल प्रचंड आस्था होती या माणसाला. त्याच्या कितीतरी गाण्यांमधून हे जाणवतं. ‘हिल द वर्ल्ड फाउंडेशन’ ही सामाजिक संस्था उभारून विशेषतः लहान मुलांसाठी MJ ने समाजकार्यसुद्धा केलं. चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांच्या मनात त्या भावना उत्पन्न करण्यासाठी आपल्या कलेचा, फॅनफॉलोईंगचा आणि ग्लॅमरचा वापर करून घेणारा हा कलाकार विरळाच आहे !
एक साधा विचार मनात येतो. माणसाची जी काही आर्थिक ऐपत असेल, त्या ऐपतीत आपलं राहतं घर जितकं सुंदर ठेवता येईल तितकं सुंदर ठेवण्याचा माणूस प्रयत्न करतो. मग माणसाला हे जग सुंदर असावं असं वाटत नाही ? मूल कसं रूप जन्माला घेऊन येतंय हे आपल्या हातात नाही. पण मनुष्य स्वतःला आयुष्यभर शक्य तितकं आकर्षक ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण इतरांची गोष्ट जाऊदे, पण असं राहिल्याने आपलं आपल्याला बरं वाटतं, सकारात्मक ऊर्जा मिळते. मग या बाह्य सौंदर्याबरोबर आंतरिक सौंदर्य खुलवण्यासाठी माणूस प्रयत्नशील का होत नाही ?
“मानवता हि परमो धर्म:” या संस्कृत वचनापासून “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या ओळीपर्यंत गेली अनेक वर्ष आपण मानवतेचे गोडवे गात आलोय…साहित्यात. पण प्रत्यक्षात ? माणसाला माणुसकीची जाणीव होण्यासाठी साध्या डोळ्याला न दिसणाऱ्या एका अल्पशा व्हायरसला संपूर्ण जगाचा ताबा घ्यावा लागला ही किती खेदजनक गोष्ट आहे! समस्त जग एका सरळ रेषेत येऊन उभं आहे. कुठला श्रीमंत-गरीब भेद ? कुठलं जात-पातीचं राजकारण ? कुठला वर्णभेद ? जेव्हा ही सगळी फुकाची आवरणं गळून पडली, तेव्हा माणसाला जाणीव झाली की शेवटी आपण सगळे एकच आहोत.
हे जग पुन्हा एकदा सुंदर करण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे मेहनत घ्यायला हवीये. माणुसकी आणि प्रेम या सकारात्मक जाणिवांवर स्वार्थीपणाच्या नकारात्मकतेने अधिराज्य गाजवून चालणार नाहीये. आपण सगळे एकजुटीने आपल्यासाठी सुंदर जग निश्चितच निर्माण करू शकतो. सुंदर जग फक्त आपल्यासाठी नाही तर पशु-पक्षी, आपला निसर्ग आणि येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी !
तुम्ही मायकल जॅक्सनच हे गाणं ऐकलं नसेल तर जरूर ऐका आणि बघा !
– राही बी.