फुल टू फिल्मी…… धर्मेंद्र ने थेट चेन्नईला जाऊन थांबवलं होतं हेमा मालिनी आणि जितेंद्रचं लग्न !
त्याकाळी हेमा मालिनी यांच्या सौंदर्यावर केवळ सर्वसामान्यच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा फिदा होते. कलाविश्वातील बरीच नावं त्यांच्यासोबत जोडली जात होती. तो काळ देखील असा होता की,धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले. अशा परिस्थितीत हेमा मालिनीशी लग्न केले तर तेही धर्मेंद्रांसारखे लकी सुपरस्टार होतील, अशी भावना जितेंद्र यांच्या मनात आली.
हेमा (Hema Malini) यांना धर्मेन्द्र (Dharmendra) यांच्यासोबत लग्न करायचे होते. पण कुटुंबाचा विरोध होता. मग काय, कुटुंबियांनी लवकरात लवकर हेमाचे लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. जितेंद्र यांचे स्थळ हेमासाठी परफेक्ट होते. कुटुंब राजी होते आणि कुटुंबाच्या इच्छेखातर हेमा यांनाही राजी व्हावे लागले. जितेंन्द्र (Jeetendra) यांना धर्मेंद्र व हेमा यांच्याबद्दल ठाऊक असूनही तेही लग्नासाठी तयार होते. अखेर लग्न ठरले. शिवाय लग्नात कुठलेही विघ्न नको म्हणून लग्नासाठी चेन्नई हे ठिकाण निवडण्यात आले.
हेमा मालिनी यांच्या ड्रीमगर्ल या आत्मवृत्तात लिहिल्याप्रमाणं धर्मेंद्र आणि हेमा यांचं प्रेम प्रकरण हेमाची आई जया चक्रवर्ती यांना पसंत नव्हते. कारण धर्मेंद्र विवाहित होते आणि त्यांना ३ मुलंही होती. दोघांना वेगळं करण्यासाठी आई जया यांनी जितेंद्र सोबत हेमाचं लग्न लावण्याचा विचार केला.
गुपचूप लग्न लावण्यासाठी घरचे सगळे चेन्नईला पोहोचले. लग्नाची बातमी गुप्त ठेवूनही लीक झाली आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आली. बातमी पाहून धर्मेंद्रचा पारा चढला आणि ते शोभा सिप्पी (जितेंद्रची बालमैत्रीण) यांना घेऊन फ्लाईटनं चेन्नईला गेले. कसंतरी करून धर्मेंद्र हेमाला एकांतात भेटले आणि त्यांना हे लग्न न करण्यासाठी सांगितलं. हेमाचे वडिल खूप चिडले होते. परंतु दारूच्या नशेत असणारे धर्मेंद्र कोणाचंच ऐकेना. गोंधळलेल्या हेमा यांनी लग्न पुढे ढकलण्यास सांगितलं. जितेंद्र आणि त्यांच्या घरचे खूप संतापले होते. यानंतर जितेंद्र कुटंबाला घेऊन तिथून निघून गेले.
हा सगळा एपिसोड कुठल्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हता. यानंतर जितेन्द्र व हेमा यांनी मित्र बनून राहण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्यांच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता. म्हणून धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचं म्हटलं जातं. पुढे अर्थातच घरच्यांचा विरोध डावलून हेमा यांनी धर्मेन्द्र यांच्याशी लग्नगाठ बांधली.
शब्दांकन- शामल भंडारे.