‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
हेमंत – क्षिती खूप उत्साहात साजरी करतायत घरगुती दिवाळी
यावर्षी सगळ्याच सणांवर करोनाचं सावट आहे. अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली असली तरी संकट अजूनही कायम आहे. कामासाठी घराबाहेर पडत असलात तरी काळजी घेणं तितकचं आवश्यक आहे. दरवर्षीप्रमाणे मित्रमैत्रिणींच्या घरी न जाता, त्यांना न भेटता एक वर्ष आपल्या कुटुंबासोबत साधेपणाने दिवाळी साजरी करून पाहूयात, असं आवाहन करतायत मराठी अभिनयक्षेत्रातली लाडकी जोडी हेमंत ढोमे आणि क्षिती जोग.
दरवर्षी दिवाळीला हेमंत आणि क्षिती दोघे मिळून घरी फराळ बनवतात. नटूनथटून मित्रमैत्रिणींच्या घरी फराळ खायला व एकमेकांना भेटायला ते कायम उत्सुक असतात. पण दोघंही चित्रीकरणाच्या निमित्ताने घराबाहेर जात असल्याने सुरक्षिततेसाठी यावर्षी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते दिवाळी साजरी करणार आहेत.
फराळ बनवण्याच्या आठवणीबाबत क्षिती म्हणते, “बाकी सगळा फराळ ठीक आहे. पण माझे बेसनाचे लाडू दरवर्षी चुकतात. रव्याचे लाडूही नीट होतात. पण प्रत्येक वर्षी तुपाचे प्रमाण काहीतरी कमी जास्त होतं. त्यामुळे मी ते लाडू वळायला गेले की ते खालीच बसतात. त्यामुळे चवीला चांगले झाले तरी आम्ही ते वाटी चमचा घेऊन खातो. तर हेमंतने चकल्या बनवण्याचा धसका घेतला आहे”. “चकल्या बनवणं हा अशक्य प्रकार आहे. मला चकल्या बनवायची अत्यंत भिती वाटते. चकल्या तळणं हा भयंकर प्रकार आहे. मी एक वर्ष करून पाहिल्या होत्या. त्यावर्षी त्या अक्षरशः विरघळत होत्या. तेव्हापासून मी चकल्या बनवण्याचा नाद सोडून दिला आहे. बाकी चिवडा, लाडू, करंज्या हे सगळे फराळाचे पदार्थ मी बनवू शकतो”, असे हेमंतने सांगितले.
दिवाळीतील पाडवा सण हेमंत आणि क्षिती दोघांसाठीही कायमच स्पेशल असतो. पाडव्याच्या आठवणीत राहिलेल्या भेटीबद्दल क्षिती सांगते, ‘आमच्या लग्नानंतर पहिल्या पाडव्याच्या वेळी हेमंतने मला सोन्याचे झुमके घेऊन दिले होते. ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण मला ते आवडले होते पण मी नंतर कधीतरी घेऊ असं म्हणाले होते. पण हेमंत मला घेऊन गेला आणि तेच कानातले घ्यायला लावले. त्यामुळे तो पाडवा खूप खास होता. त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी आम्ही आमचं घर घेतलं तोही पाडवा खूप स्पेशल होता”. घरकाम करण्याबरोबरच बाकीही बाबतीत स्त्री-पुरूष समानता हवी असं मानणारा हेमंतही क्षितीकडून दर पाडव्याला भेटवस्तू घेतो. याबद्दल हेमंत सांगतो, “क्षिती सरप्राइज व भेटवस्तू देण्याबाबत एकदम माहीर आहे. ती प्रत्येक वेळी योग्य भेट मला देते. पूर्वी मी कानात तट घालायचो तेव्हा मी एकदा स्वत:शीच म्हणलं की सॉलिटेअर घातलं पाहिजे कानात. आणि तिने त्या पाडव्याला तेच आणलं. मला खूप आश्चर्य वाटलं की मी स्वत:शीच नुसतं बोललो होतो. ती पाडव्याची भेट खूप आठवणीत राहणारी आहे”.
हे हि वाचा : सावनी रवींद्रच्या गायन शैलीतील दिवाळी पहाटचा अनुभव
यंदाची दिवाळी कशी साजरी करावी याबद्दल हेमंत आणि क्षिती म्हणाले, “यंदा मोठ्या प्रमाणावर जरी आपल्याला दिवाळी साजरी करता येत नसली तरी आनंद, उत्साहाने घरगुती दिवाळी साजरी करून पाहूया. आपल्या मनात काळजीयुक्त भिती हवी. कारण अजूनही करोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे घरातल्या घरात रांगोळी काढून, फराळ करून, आरास करून, नवे कपडे घालून फोटो काढून ते इतरांबरोबर शेअर करूयात. जर यावर्षी आपण संयमाने वागलो तर पुढची सगळी वर्षे मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिवाळी साजरी करता येईल”.
मुलाखत आणि शब्दांकन : गौरी भिडे