Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Filmistan Studio : फिल्मीस्तान स्टुडिओत डोकावताना…..
भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर व वैविध्यपूर्ण वाटचालीत ‘स्टुडिओ संस्कृती’ ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट. काळ जस जसा पुढे गेला तसं तसं आपल्या मुंबईतील एकेक करत अनेक स्टुडिओ काळाच्या पडद्याआड गेले… असाच एक स्टुडिओ गोरेगाव पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील ‘फिल्मीस्तान स्टुडिओ’. तेथील सायलेन्स, कॅमेरा, ॲक्शन, कट, रिटेक यांची वर्दळ आता काळाच्या पडद्याआड जात आहे…या भव्य दिमाखदार ऐतिहासिक स्टुडिओच्या भल्या मोठ्या किंमतीतील विक्रीची बातमी प्रसार नमस्कार लक्षवेधक ठरतंय.

मिडियात असल्याने चित्रपटसृष्टीत भटकंतीचे योग अनेक. नवीन चित्रपटांचे मुहूर्त, शूटिंग रिपोर्टींग, एखाद्या कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता, दिग्दर्शक यांच्या भेटीगाठी, मुलाखती यासाठी या अनेक स्टुडिओत सातत्याने माझे जाणे. त्यात फिल्मीस्तान स्टुडिओ अगदी वेगळा. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेला. स्टुडिओचे प्रवेशद्वारचं ‘हा चित्रपटाचे शूटिंग करण्याचा स्टुडिओ’ आहे, याची जाणीव करुन देणार. भल्या मोठ्या प्रवेशद्वाराला आणखीन एक छोटे प्रवेशद्वार. ते ढकलत असतानाच आपण पत्रकार आहोत हे सांगताच वॉचमन आढेवेढे घेत नसे. (वारंवार जाऊन मुंबईतील अनेक चित्रपट स्टुडिओचे वॉचमन, कॅन्टीन बॉय छान ओळखीचे झाले), फिल्मीस्तानमध्ये प्रवेश करताच समोरच जुन्या पठडीतील कार्यालय. एक खास वैशिष्ट्य सांगायचे तर, येथील कार्यालयातील फोन आम्हा सिनेपत्रकारांना वापरता येई आणि बाहेरुन फोन केला तर, स्टुडिओतील शूटिंग शेड्युल समजत असे. जुन्या काळातील अनेक सकारात्मक वैशिष्ट्य अशा जुन्या काळातील चित्रपट स्टुडिओत अनुभवता येत.
या स्टुडिओत डाव्या बाजूस मेकअप रुम्स. एकूणच स्टुडिओत फेरफटका मारताना एकूण सात मोठे फ्लोअर (चित्रीकरणाची जागा) आणि त्याबरोबरच काही चित्रीकरण आवश्यक स्थळे हेदेखील एक वैशिष्ट्य. पोलीस स्टेशन, जेल, देऊळ, छोटेसे गार्डन, गाव, इस्तितळ यात आपल्या गरजेनुसार कमी जास्त करुन कॅमेर्याची जागा ठरे. हे स्पॉट प्रत्यक्षात पाहताना असे वाटे की छायाचित्रणकार (कॅमेरामन) पडद्यावर हे छान खुलवतो. संकलन अतिशय कौशल्याने कात्री चालवून याच जागा पडद्यावर जिवंत करतो.
================================
हे देखील वाचा: दादा कोंडके यांची हिंदीतील भन्नाट मुशाफिरी…
=================================
फिल्मीस्तान स्टुडिओत अनेकदा जाणे झाल्याने आठवणी अनेक. आवर्जून काही सांगायलाच हव्या. ताहिर हुसेन दिग्दर्शित ‘तुम मेरे हो’चा मुहूर्त, डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘स्वर्ग’साठी लावलेला भला मोठा सेट, राजश्री प्रॉडक्शन्स निर्मित व सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम साथ साथ है’ या चित्रपटासाठी तब्बल दीड महिन्यासाठी भला मोठा सेट लागला असता सोनाली बेंद्रेच्या मुलाखतीसाठी या सेटवर गेलो होतो. मुकुल आनंद दिग्दर्शित ‘त्रिमूर्ती’ पासून ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘अक्स’पर्यंत अनेक चित्रपटांचे येथे चित्रीकरण असताना शूटिंग रिपोर्टींगसाठी येथे जाणे झाले.

तुम्हाला गुलशन रॉय निर्मित व विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’ (१९७०) मधील सदाबहार देव आनंद व ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी साकारलेली ‘ओ मेरे राजा खफा न होना’ हे खट्याळ, मस्तीवाले गाणे चांगलेच माहित आहे. संपूर्ण गाणे आऊट चित्रीकरण आहे. पण अशातच एक छोटासा भाग व्यवस्थित चित्रीत झालेला नव्हता. मग काय करणार? तसाच पाळण्याचा सेट याच फिल्मीस्तान स्टुडिओत उभा केला आणि तसे तेवढे चित्रीकरण केले. गाणे पाहताना देव आनंद व हेमा मालिनीचे क्लोजअप पाहताना ते लक्षात येईल. असे अनेक चित्रपटांचे लहान मोठे प्रसंगांचे याच फिल्मीस्तान स्टुडिओत चित्रीकरण झाले.
फिल्मीस्तानची एक वेगळी आठवण सांगतो, सुभाष घई दिग्दर्शित ‘देवा’साठी याच स्टुडिओत भला मोठा सेट लागला असता अमिताभ बच्चनचा स्पेशल गेटअप एक्स्युझिव्हज रहावा म्हणून सेटबाहेर लावलेल्या फलकावर म्हटले होते, सिनेपत्रकार व पाहुण्यांना सेटवर प्रवेश देण्यात येणार नाही. अशातच एके दिवशी याच फिल्मीस्तान स्टुडिओत निर्माते पहलाज निहलानी यांच्या तीन नवीन चित्रपटांच्या मुहूर्तांना क्लॅप देण्यास अमिताभ सेटबाहेर आला आणि त्याचा ‘देवा’चा एक्स्युझिव्हज गेटअप दिसला. काही दिवसांतच हा चित्रपट बंद पडला.

याच स्टुडिओतील असाच एक वेगळा अनुभव. बी.आर.चोप्रा दिग्दर्शित ‘आवाम’ या चित्रपटाच्या शूटिंग कव्हरेजसाठी आम्हा काही निवडक सिनेपत्रकार व फोटोग्राफर्सना सेटवर बोलावले होते. लंच ब्रेकमध्ये एका बाजूस एका भल्या मोठ्या टेबलावर आम्ही सिनेपत्रकार जेवत होतो तसेच सेटच्या दुसर्या टोकाला राजेश खन्ना व शफी इनामदार जेवत होते. राजेश खन्नाच्या घरुन जेवणाचा भला मोठा डबा येत असे. अशातच शेजारच्या सेटवर नितीन मनमोहन निर्मित व मुकुल आनंद दिग्दर्शित ‘इन्साफ’चा लंच ब्रेक होताच डिंपल अचानक ‘आवाम’च्या सेटवर राजेश खन्नाला भेटायला आली, हा आमच्यासाठी मोठाच सांस्कृतिक धक्काच होता. का माहित्येय? कारण त्या काळात ते दोघे वेगळे राहत होते. त्यांच्यात भांडणे झालीत असे गॉसिप्स रंगवून खुलवून लिहिले जात होते आणि अशातच डिंपल राजेश खन्नाला भेटायला यावी? शफी इनामदार उष्ट्याने उभा राहिला. फोटोग्राफर्सनी जेमतेम उष्टे हात धुतले आणि हा एक्स्युझिव्हज क्षण कॅमेर्यात कैद केला. हा फोटो त्या काळात भारी किंमतीत विकला गेला. फिल्मीस्तान स्टुडिओतील ही एक वेगळी ओळख.

मनोजकुमार दिग्दर्शित ‘क्लर्क’ यापासून दीपक बलराज दिग्दर्शित ‘बॉम्बब्लास्ट’ अशा अनेक चित्रपटांचे कमी अधिक चित्रीकरण याच चित्रपट स्टुडिओत रंगले. फिल्मीस्तान स्टुडिओच्या फ्लॅशबॅकमध्ये जायचे तर खूपच मोठा इतिहास आहे. २८ एप्रिल १९४३ रोजी फिल्मीस्तान लिमिटेड या चित्रपट निर्मितीची स्थापना झाली. तेव्हापासून ही इमारत उभी आहे.BombayTalkies या चित्रपट निर्मिती संस्थेतून बाहेर पडून सशधर मुखर्जी यांच्या पुढाकाराने ही स्थापना झाली. ज्ञान मुखर्जी दिग्दर्शित व सशधर मुखर्जी निर्मित ‘चल चल रे नौजवान'(१९४३) हा फिल्मीस्तान निर्मित पहिला चित्रपट. त्यानंतर नीतिन बोस दिग्दर्शित ‘मजदूर'(१९४५), सावक वाचा दिग्दर्शित ‘शिकारी'(१९४६), किशोर साहू दिग्दर्शित ‘सिन्दूर'(१९४७), बिभूती मित्रा दिग्दर्शित ‘शबनम'(१९४९), रमेश सहगल दिग्दर्शित ‘समाधी’ (१९५०), प्यारेलाल संतोषी दिग्दर्शित ‘सरगम'(१९५०), हेमेन गुप्ता दिग्दर्शित ‘आनंद मठ'( १९५२), नंदलाल जसवंतलाल दिग्दर्शित ‘अनारकली'(१९५३) व ‘नागिन’ (१९५४), आय. एस. जोहर दिग्दर्शित ‘नास्तिक’ (१९५४) व ‘हम सब चोर है’ (१९५६) वगैरे अनेक चित्रपट फिल्मीस्तानने निर्माण करुन भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत मोलाची भर घातली.

फिल्मीस्तानने काही मराठी चित्रपटांचीही निर्मिती केली हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.त्यातील एक उल्लेखनीय चित्रपट दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित ‘आलीया भोगासी’ (१९५७). त्यामागे एक किस्सा आहे.त्या काळात गिरगावात राहणाऱ्या रमेश देव यांनी याच फिल्मीस्तान स्टुडिओत जाण्यासाठी चर्नी रोडला लोकल ट्रेन पकडली. पुढच्याच ग्रॅड रोड स्टेशनला त्याच डब्यात नलिनी सराफ आपल्या आईसोबत चढल्या. त्या नेमक्या रमेश देव यांच्यासमोर बसल्या. मराठी चित्रपटातील रमेश देव यांच्या काही नकारात्मक भूमिका पाहून या दोघी काहीशा खुश नव्हत्या. गोरेगाव स्टेशनवर रमेश देव उतरताच या दोघी त्यांच्या मागे मागे जावू लागल्या. कारण त्यांना तोपर्यंत फिल्मीस्तान स्टुडिओ माहित नव्हता. आता हे पाठोपाठच फिल्मीस्तान स्टुडिओत शिरले आणि मग योगायोगानेच त्यांना ‘आलिया भोगासी’ या चित्रपटात भाऊ व छोटी बहीण या भूमिका साकारायला मिळाल्या. खुद्द रमेश देव यांनीच मला हा किस्सा सांगितला. फिल्मीस्तानने राजा नेने दिग्दर्शित ‘पहिलं प्रेम’ (१९५७), राम चितळकर दिग्दर्शित ‘आई मला क्षमा कर’ (१९५७), शांताराम आठवले दिग्दर्शित ‘पडदा’ (१९५८), प्रेम माणिक दिग्दर्शित ‘सौभाग्यवती भव'(१९५८), या चित्रपटांची निर्मिती केली.
================================
हे देखील वाचा: Sholay :’शोले’ची ५० वर्ष पुर्ण; प्रेक्षकांसाठी खास रि-रिलीज होणार चित्रपट
=================================
कालांतराने अनेक मराठी चित्रपटांचे फिल्मीस्तान स्टुडिओत चित्रीकरण झाले. दत्ता केशव दिग्दर्शित ‘विश्वास’, ‘सौभाग्याचं लेणं’व ‘पोरीची कमाल बापाची धमाल’,अरुणा बोरगावकर दिग्दर्शित ‘सुलक्षणा’, राजदत्त दिग्दर्शित ‘माझं घर माझा संसार’, सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘गंमत जंमत’, ‘माझा पती करोडपती’,’अशी ही बनवाबनवी’,रवि नेमाडे दिग्दर्शित ‘खरं कधी बोलू नये’, अविनाश ठाकूर दिग्दर्शित ‘सगळीकडे बोंबाबोंब’, गिरीश घाणेकर दिग्दर्शित ‘रंगत संगत’ व ‘राजानं वाजवला बाजा’ अशा अनेक मराठी चित्रपटांचे फिल्मीस्तान स्टुडिओत कमी अधिक प्रमाणात चित्रीकरण रंगले. यातील अनेक चित्रपटांच्या सेटवर एक सिनेपत्रकार म्हणून मला जाण्याचा योग आला. कालांतराने फिल्मीस्तान स्टुडिओची मालकी बदलली. या गोष्टीदेखिल होत राहिल्या. इतकेच नव्हे तर, फिल्मीस्तान स्टुडिओच्या आजूबाजूचा, मागचा परिसरही बदलत बदलत गेला.

फिल्मीस्तान स्टुडिओच्या जागेवर उंच उंच इमारती उभ्या राहतील. पण त्याखाली मराठी व हिंदीसह अन्य भाषेतील (विशेषत: भोजपुरी) चित्रपटांच्या मुहूर्त, चित्रीकरण यांचा भला मोठा गौरवशाली, वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे याची सतत जाणीव होत राहिल हे नक्कीच… मुंबईतील एकेक करत अनेक स्टुडिओ असे काळाच्या पडद्याआड जात असून त्याजागी टोलेजंग इमारती उभ्या राहताना दिसताहेत. रुपेरी पडद्यावर चित्रपट शूटिंग, रेकॉर्डिंग, डबिंग या रुपात हेच स्टुडिओ आपले अस्तित्व दाखवणार आहेत.