बॉलिवूडमधील होळीच्या सुरेल गीतांची आठवण
‘रंगुनी रंगात मधुर’ असं वर्णन ज्या उत्सवाचे करता येईल तो म्हणजे ‘होलिकोत्सव’! होळी हा सण खऱ्या अर्थाने इथला लोकोत्सव आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात तर या सणाला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले आहे.
आधीच उत्सव प्रिय असलेल्या समाजाला ऋण काढून सण साजरे करायचे संस्कार, त्यात पुन्हा हा लोकोत्सव व मन मानेल तस्स वागायची मुभा असल्याने तमाम जनता खूष असते. या एकाच दिवशी वर्षभरातील सारे मतभेद, गिले शिकवे, बाजूला ठेवून खुल्या दिलाने मैत्रीच्या,प्रेमाच्या सप्त रंगात न्हावून जाण्याचा दिवस! त्यामुळे या साऱ्याचं प्रतिबिंब आमच्या सिनेमा नामक संस्कृतीत पडलेलं दिसतं. (Holi Special cult classic)
रूपेरी पडद्यावर हा रंगोत्सव भलताच खुललेला दिसतो. हा ‘सिलसिला’ पार सिनेमा श्वेत – श्याम होता त्यावेळे पासून चालू आहे. विविध रंगाच्या रंगपंचमीत न्हात रसिक प्रेक्षक सुध्दा काही काळ आपल्या कटू वास्तवापासून दूर गेलेला दिसतो. होळीची गाणी आजही सिनेमात दिसतात (बलम पिचकारी) पण पूर्वीची खुमारी, ती नजाकत आणि ती मोहकता दिसतं नाही. (Holi Special cult classic)
संगीत आणि नृत्यात कमालीची तफावत असणं नैसर्गिक असले तरी पूर्वीच्या गीतांची जादू काही औरच होती हे नक्की! कृष्ण धवल चित्रातील रंगाची कमतरता मुळीच जाणवायची नाही. ही त्रुटी काव्य संगीत आणि नृत्याने पुरी व्हायची. प्रेमाला धिटाईने पुढे नेण्याचे काम रूपेरी पडद्यावर या सणाने केली आहे. आज होळीच्या निमित्ताने अशाच काही होळी गीतांचा ‘कॅलिडोस्कोप’!
आजवर अनेक होळी गीते सिनेमातून बघितली असली तरी सर्वात सुंदर गीत कोणतं, असा प्रश्न जर कुणी केला, तर निर्विवादपणे डोळ्यापुढे येते १९६० सालचे शांताराम बापूंच्या ‘नवरंग’चे गाणे. यातील नायक (महिपाल) राजदरबारातील कवी असतो. आधीच कवी आणि त्यात पुन्हा प्रेमात पडलेला(!) त्यामुळे त्याची स्वप्नातील प्रेयसी (संध्या) यांच्यातील हे गोड अद्वैत होळीत खूपच खुलतं! (Holi Special cult classic)
संध्याच्या अप्रतिम नृत्याविष्कारा बाबत वेगळं काही सांगायची गरज नाही. ‘अरे जारे हट नटखट ना दूंगी मेरा घूंघट, पलट के दूंगी आज तुझे गाली रे, मुझे समझ ना तू भोली भाली रे’ यावर कवी महाशयांचा ‘आया होली का त्योहार उडे रंगो की बहार, तू नार नखरेवाली रे आज मिठी लगे तेरी गाली रे’ हा जवाब अगदी ‘देखणेबल’ होता.
होळीच्या सप्तरंगाची मनमुराद उधळण या गीतात असल्याने गाणे आजही रसरशीत वाटते. हे गाणं संगीतबध्द केल होतं सी रामचंद्र यांनी. मेहबूब यांच्या ‘मदर इंडीया’त ‘होली आई रे कन्हाई रंग छलके सुना दे जरा बांसुरी’ हे शमशाद ने गायलेले (सं. नौशाद) गाणे आजही जुन्या रसिकांना आठवत असेल. (Holi Special)
पडद्यावर हे गीत साकार करतात राजेंद्रकुमार, कुमकुम आणि सुनील दत्त. नर्गीस दूरवरून हा सोहळा पाहत असते, परंतु तिचं मन पार भूतकाळात शिरून अंगावर शिरशिरी आणणाऱ्या गतस्मृतीचा मनातल्या मनात आनंद घेत न्हावून गेलेलं असतं. याचे चित्रीकरण फार सुंदर झाले आहे. विविध भाव भावनांचा विलोभणीय पदर असलेलं हे गीत पुढे अभावानेच आढळते.
दिलीप-मीनाचा ‘कोहिनूर’ (१९६०) आठवतो? हा सिनेमा तसा पोषाखी चित्रपट असल्याने तेथील होळी देखील राज दरबरातील सभ्यतेच्या मर्यादा ओळखून खेळली जाते. ‘तन रंग लो जी आज मन रंग लो’ हे रफी –लताचे गीत प्रेमाचा नुकताच उमललेला अंकुर पुढे वाढण्यासाठी उपयुक्त ठरते.
दोघांच्या हृदयाच्या तारा याच गीतातून झंकारून पुढे दृढ होतात. यातील एका ओळीत नायिका म्हणते’ रंग झूटे मोरे अंग पे न डालो जी, मन प्यार में साजन रंग लो जी’ पिचकारीतून अंग भिजविणारे रंगीत तुषार तिला फसवे वाटू लागतात. त्यापेक्षा हृदयापर्यंत पोचणारे रंग तिला गडद वाटू लागतात. (Holi Special cult classic)
शकीलच्या लेखणीतून उतरलेलं आणखी एक होळी गीत ‘आन’ (१९५४) चित्रपटात होतं. ‘खेलो रंग हमारे संग आज दिन रंग रंगीला आया’ हे गाणं शमशाद सोबत रफीने गायले आहे. राजवाड्यातील राजेशाही वातावरणात वाढलेल्या राजकन्येला (नादिरा) आपल्या प्रेमाची जाणीव करून देणारा प्रेमवीर होता दिलीपकुमार.
सत्तरच्या दशकात राजेश खन्नाच्या ‘कटीपतंग’ मध्ये एक सुंदर गीत आहे. ‘आज न छोडेंगे बस हमजोली खेलेंगे हम होली’ दिवंगत मित्राच्या पत्नीवर (तशी ती नसतेच!) आशा पारेख वर रेशीम धागे टाकणारा राजेश अगदी ‘मस्ती’त हे गीत गातो. इतक्या दिवसात मनातल्या मनात कोंडून ठेवलेलं प्रेम होळीच्या दिवशी मुक्तपणे व्यक्त होतं. (Holi Special cult classic)
काकाच्याच ‘नमक हराम’ (१९७३) मध्ये ‘नादिया से दरिया’ या होळी गीतात खरी धमाल आणली असरानीने! कामचोर (१९८७) मधील ‘मल दे गुलाल मोहे आई होली आई रे’ मस्त जमून आले होते. यश चोप्रांच्या ‘मशाल’ चित्रपटातील ‘होली आई होली आई देखो होली आई रे’ हे गाणे हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्याच ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या गाण्याचीच चाल वापरून पूर्ण केलं.
प्रीतीला शाप असतो विरहाचा. मनात खोलवर जपलेलं प्रेम आणि ती प्रेयसी नेमकी होळीच्याच दिवशी समोर आली तर? मनात दाबून ठेवलेल्या भावना सभ्य / असभ्यतेची भीती खोटी ठरवीत व्यक्त होतात. तिला मनसोक्त भिजवून तो मस्तीत गाऊ लागतो ‘रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे!’ (Holi Special cult classic)
अमिताभचे अलीकडचे हिट म्हणजे ‘होली खेले रघुवीरा अवध में’ रमेश सिप्पीच्या बिग बजेट सुपर हिट ‘शोले’तील ‘होली के दिन दिल खिल जाते है रंगो में रंग मिल जाते है,’ भारतकुमार अर्थात मनोजकुमारच्या काही सिनेमातून होळी गीतं आली ती इथल्या संस्कृतीचा घटक म्हणून.
====
हे देखील वाचा: तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
====
दिग्दर्शक जर कलासक्त असेल तर होळी गीत किती नयनरम्य होऊ शकतं हे पाहायचं असेल, तर गोल्डी च्या ’गाईड’ (१९६५) मधील ’पिया तोसे नैना लागे रे’ पहा. यातील ’आयी होली आय़ी, बिन तेरे होली भी न भाये रे’ च्या वेळचा वहिदाचा अप्रतिम पदन्यास व भाव मुद्रा क्या कहना! (Holi Special cult classic)
आर के स्टुडीओत खेळली जाणारी होळी संपूर्ण सिनेजगतात प्रसिध्द होती. आख्खं कपूर घराणं सर्व कलाकारांना रंगाच्या वर्षावात चिंब करीत. या उत्सवाची चर्चा वर्षभर चालत असे. पण असं असलं तरी आर के च्या सिनेमात एकही होळीचं गाणं नसावं हा एक कायम मनाला सलणारा प्रश्न पडतो..असं कां?
====
हे देखील वाचा: किस्सा तलत मेहमूद यांच्या पहिल्या गाण्याचा!
====