हॉलिवूडचा अमिताभ बच्चन
दुबईमध्ये काही वर्षापूर्वी पर्यावरणविषयक जागतिक परिषद झाली. या परिषदेत एक वक्ता सर्वांच्या उत्सुकतेचा विषय झाला होता. हॉलिवूडचा अमिताभ बच्चनच म्हणा ना तो. वाढत्या वयाबरोबर तो अधिक तरुण होत चाललेला. हा अभिनेता भाषण करायला उभा राहीला आणि त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलला. एकदम रोखठोक…परखड…निसर्गाला माणसाची गरज नाही. माणसाला निसर्गाची गरज आहे. माणसानं आपलं वर्तन सुधारलं नाही तर मानव जातीला भविष्यात मोठा फटका बसू शकतो. त्यांनी या भाषणात मांडलेले मुद्दे ऐकून पर्यावरणतज्ञांच्याही अंगावर काटा आला. तो अभिनेता होता हॅरिसन फोर्ड… हॅरिसन फोर्ड म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ. अभिनेता म्हणून तो जसा महान आहे, तसंच त्याचं पर्यावरणक्षेत्रातही मोठं नाव आहे. याबाबत त्याची मतं अत्यंत परखड आहे. विशेष म्हणजे ही परखड मत व्यक्त करतांना तो कुठलीही भीडभाड ठेवत नाही.
हॅरिसन फोर्ड हे प्रकरणच असं आहे. आज वयाच्या 78 व्या वर्षीही हा अभिनेता हॉलिवूडच्या मोस्ट वॉन्टेड स्टार आहे. अगदी आपल्या बच्चन साहेबांसारखं. हॅरिसन म्हटलं की पहिलं आठवतं स्टार वॉर्स आणि इंडियाना जोन्स हे चित्रपट आणि त्यांचे सिक्वल. पण हॅरिसन फोर्ड फक्त अभिनयापूरताच मर्यांदीत नाही. जे-जे पाहिन ते-ते शिकेन ही हॅरिसन यांची वृत्ती. याच स्वभावामुळं ज्या वयात ज्येष्ठ अभिनेता असं लेबल लावून त्याच्याबरोबर काम करणारे कलाकार घरी बसले आहेत, तर हॅरिसन आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी करत आहेत.
हॅरिसन फोर्ड यांचा जन्म अमेरिकेतील शिकागो प्रांतातला. वडील क्रिस्टोफर फोर्ड हे अभिनेते तर आई डोरेथी, रेडीओ कलाकार होती. त्यामुळे हॅरिसन चित्रपटात जाणार हे उघड होतं. हायस्कूलमध्ये असतांना रेडीओवरील काही कार्यक्रम हॅरीसन यांनी केले. मात्र त्यांचा स्वभाव बुजरा होता. या स्वभावावर मात करण्यासाठी त्यांनी नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला. पुढे कॉलेज जीवनात नाटकांमध्ये काम केलं. तेव्हाच आपला करिअर कशामध्ये आहे हे त्यांनी जाणलं होतं. सुरुवातीला काही छोट्या भूमिका त्यांनी केल्या. पण हॅरिसन म्हणजे लंबी रेस का घोडा ठरले. स्टार वॉर्स आणि इंडायाना जोन्स सारखे चित्रपट आणि त्यांचे सिक्वल यामुळे हॅरिसन फोर्ड हे नाव जगभरात झालं. ब्लेड रनर, विटनेस, पेट्रियट गेम्स, क्लियर अँड प्रेझेंट डेंजर, लॉर्ड आर्क ऑफ रायडर्स ऑफ दि लॉस्ट आर्क, एअर फोर्स वन, द कन्व्हर्शन, मॉस्किटो कोस्ट, प्रॉस्ड्युड इनोसेंट, व्हॉट लिज बिनेट, रिक डेकार्ड, वर्किंग गर्ल, सबरीना, रँडम हार्ट्स, मॉर्निंग ग्लोरी, द एज ऑफ ॲकडलिन अशा अनेक चित्रपटात आणि नाटकांत फोर्ड यांनी भूमिका केली. छोट्या पडद्यावरही त्यांनी काम केलं. कधी रोमॅन्टीक, कधी विनोदी तर कधी ॲक्शन हिरोच्या भूमिकेत ते चमकले. लाखो चाहत्यांनी या हिरोला डोक्यावर घेतलं. त्यांच्या प्रत्येक चित्रपटांनं विक्रम केला. लाखो, करोडोंची कमाई केली. आज सर्वाधिक कमाई असलेला हा ज्येष्ठ अभिनेता आपलं सुखासीन आयुष्य शांतपणे जगत असेल, असं वाटेल. पण हॅरिसन फोर्ड म्हणजे एक धगधगतं व्यक्तीमत्व. अभिनेता, पर्यावरणरवादी, पायलट, पुरातत्त्वशास्त्रचा अभ्यासक. अशा कितीतरी आघाड्यांवर ते कार्यरत आहेत.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये फोर्ड यांची जगातील सर्वात श्रीमंत पुरुष म्हणून नोंद करण्यात आलेला हा अभिनेता वयाच्या 52 व्या वर्षी विमान चालवायला शिकला. एअरफोर्स वन या अत्यंत गाजलेल्या चित्रपटात हॅरिसन यांनी वैमानिकाची भूमिका केली आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःचं विमान विकत घेतलं. आपल्या भल्या मोठ्या शेतात त्यांनी या विमानांचा तळ उभा केलं. चॉपर आणि हेलिकॅप्टर घेऊन तो चालवायला शिकला. आता तो अमेरिकेचा ‘लायसेन्स्ड् पायलट’ आहे. फोर्ड हा गाड्यांचा शौकीन आहे. बाईक आणि क्लासिक कारचं त्याचं कलेक्शन खास आहे. आता त्यात त्याच्या विमानाच्या कलेक्शनची भर पडली आहे. मार्च 2004 मध्ये फोर्ड प्रायोगिक एअरक्राफ्ट असोसिएशन (ईएए) च्या यंग ईगल्स प्रोग्रामचे अधिकृतपणे अध्यक्ष झाले. फोर्ड हे मानवतावादी विमानचालन संस्था विंग्स ऑफ होपचे मानद मंडळाचे सदस्य आहेत. निव्वळ भूमिकेपुरते हॅरिसन पायलट झाले नाहीत. तर खरंखुरं विमान स्वतः चालवायला शिकून ते आता पायलटसंदर्भात असलेल्या अडचणी मांडण्यासाठी अग्रणी असलेल्या संस्थामध्येही काम करतात.
हॅरिसन फोर्ड हे आघाडीचे पर्यावरणवादी म्हणूनही ओळखले जातात. फोर्ड यांनी पर्यावरण आणि संवर्धन संदर्भात संदेश देणा-या मालिकेसाठी आपला आवाज दिला आहे.हवामान बदलांवर उपाय सुचवणा-या सामाजिक संस्थेसाठी ते काम करतात. याबाबत अनेक परखड मतंही त्यांनी नोंदवली आहेत. एका जागतिक परिषदेसाठी गेल्यावर त्यांनी संबंधित देशाच्या नेत्यालाच पर्यावरणावरुन थेट सुनावले होते. पर्यावरण आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी त्यांची भूमिका रोखठोक असते. मानवी चुकांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे, याचा फटका भविष्यात नक्की बसणार, यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. ही त्यांची भविष्यवाणी सध्याच्या परिस्थितीत सत्यात उतरली आहे.
१९८१ साली निर्माता जॉर्ज लुकास आणि दिग्दर्शक स्टीव्हन स्लिपबर्ग या दोघांनी रेडर्स ऑफ द लास्ट आर्कहा चित्रपट काढला. प्रोफेसर डॉक्टर इंडियाना जोन्स हा त्या चित्रपटाचा नायक पुरातत्त्व शास्त्रज्ञ असतो. हॅरिसन फोर्ड यांनी त्या डॉक्टराची भूमिका केली… हा चित्रपट अमेरिकेसह जगभर गाजला. या चित्रपटाचे आलेले पुढचे भागही गाजले. त्यानंतर हॅरिसन यांनी पुरातत्त्वशास्त्रची माहिती करुन घेतली. त्याचा अभ्यास केला. हॅरिसन आर्किऑलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकाया अतिशय प्रतिष्ठीत संस्थेचा सक्रीय सभासद झाला. आज तो त्या संस्थेचा एक मान्यवर विश्वस्त आहे. वारसा लाभलेल्या वस्तू आणि वास्तू यांचे संवर्धन करण्यासाठी फोर्ड या संस्थेला मदत करतो. इंडोनेशियन सरकार आपल्या देशातील पुराणअवषेशांची नीट काळजी घेत नाही, असे त्याने इंडोनेशियाच्या सांस्कृतिक मंत्र्याला अगदी थेट सांगितले होते. तेव्हा फोर्ड खूप चर्चेत आला होता. भूमिकेपूरता मर्यादीत नसलेला अभिनेता म्हणून त्याचे कौतुक करण्यात आले.
हॅरिसन त्याच्या राजकीय मतांसाठीही प्रसिद्ध आहे. जे आपल्याला वाटते ते तो बोलून व्यक्त होतो. या वक्तव्यांचा राजकीय काय परिणाम होईल याची त्याला पर्वा नसते. दलाई लामा आणि तिबेटचे स्वातंत्र्य याला त्याचा जाहीर पाठिंबा आहे. यासंदर्भात त्याने माहितीपटही काढला आहे. हॅरिसन म्हणजे एवढा स्पष्ट वक्ता की हॉलिवूड़वर टिका करायलाही मागपुढे बघत नाही. सध्याचे हॉलिवूड चित्रपट म्हणजे ‘व्हिडिओ गेम्स’ आहेत, मानवी भावभावना, मानवी जीवन त्यात दिसतच नाही, असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगून खळबळ उडवून दिली होती. हॉलिवूडच्या या अब्जाधिश अभिनेत्याचा लॉस एन्जलीसमध्ये अलिशान महल आहे. आता कोरोना आणि त्यामुळं आलेल्या लॉकडाऊनच्या काळात हॅरिसन या महलातून आपला एखादा व्हीडोओ शेअर करत आहेत. इंडीयाना जोन्सच्या पुढच्या भागावर त्यांचे काम चालू आहे. म्हणजे काय या लॉकडाऊनमध्येही हे फोर्ड महाशय स्वतःला व्यस्त ठेऊन आहेत. एकूण काय इथे घरी बसून लोकं कंटाळली असली तरी 78 वर्षाचा हा तरुण मनाचा हॅरिसन फोर्ड आपल्या नवीन प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त आहेत…