
अब्दुल हाईचे साहिर लुधियानवी कसे झाले?
हिंदी सिनेमाच्या गीतकारांच्या दुनियेत आज देखील सर्वाधिक चर्चेला जाणारे नाव म्हणजे साहीर लुधियानवी हे नाव. काळ जस जसा पुढे जातो आहे तस तसा साहीरच्या गीतांच्या लोकप्रियतेचा परीघ वाढतो आहे. त्यांचे खरे नाव (पाळण्यातलं नाव) होते अब्दुल हाई. आता तुम्ही म्हणाल अब्दुल हाई हे नाव होतं तर ते साहिर लुधियानवी कसे झाले? याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
अब्दुल हाई एका श्रीमंत जमीनदाराचा मुलगा. त्यांचे अब्बाजान जमीनदार आणि रंगीन मिजाज असलेले सरंजामी वृतीचे! त्यांनी चक्क दहा ते बारा लग्न केली होती. पण मुलगा मात्र एकीलाच झाला. बाळाच्या जन्मापासून त्याचा छळ वाद सुरु झाला होता. वडलांची माया काही मिळालीच नाही. वडिलांनी त्याच्या आईला फारकत दिली. त्यामुळे लहान अब्दुल आपल्या आईसोबत राहू लागला. त्याचे बालपण अतिशय खडतर अवस्थेत गेलं. अब्दुलच्या आईचा हा निर्णय वडिलांना आवडणे शक्यच नव्हते. त्यांनी आईला आणि मुलाला मारण्यासाठी त्यांच्यावर गुंड पाठवले.

लहान अब्दुल आपल्या आईसोबत लाहोरला पळून आला. येथे अतिशय गरीबीमध्ये त्याचं बालपण केलं. त्यामुळेच गरिबीचे, अपमानाचे,अवहेलनेचे, मुफलीसीचे चटके अब्दुल्लला लहानपणापासूनच बसू लागले. पुढे हे सर्व त्याच्या शायरीमधून उमटू लागले. अब्दुल प्रचंड मातृ भक्त होता. आयुष्यभर त्याने आईची सेवा केली. त्याने आयुष्यात लग्न देखील केलं नाही आणि १९७९ साली त्याची आई गेल्यानंतर वर्षभरात ( २८ ऑक्टोबर १९८०) तो देखील ही दुनिया सोडून गेला. इतका तो मातृ भक्त!
पंधरा-सोळा वर्षांचा झाल्यानंतर अब्दुल शायरी करू लागला. त्या काळात शायर आपलं वेगळं नाव घेऊन लोकांपुढे येत असे आणि या नावांमध्ये आपल्या गावाचं नाव देखील असे. जसे मलिहाबादचे जोश मलिहाबादी, आजमगड चे कैफी आजमी, लायालपूर नक्ष लायालपुरी,गोरखपूरचे फिराक गोरखपुरी,लखनौचे मजाज लखनवी,आणि दिल्ली चे दाग दहलवी… अब्दुल हाई लुधियानाचा. त्यामुळे लुधियानवी हे नाव त्याच्या डोक्यात पक्क होतं.
========
हे देखील वाचा : …..एका क्षणात सर्व मतभेद मिटले आणि रफी व ओपी नय्यर पुन्हा एकत्र आले!
========
परंतु त्याच्या आधी एखादे पेट नेम ज्याला उर्दूमध्ये ‘तखल्लुस’ म्हणतात घ्यायचे ठरले. कोणते ‘तखल्लुस’ घ्यावे याचा तो विचार करू लागला तेव्हा त्याला इक्बाल यांची एक कविता दिसली. दाग दहलवी यांच्या मृत्युनंतर त्यांनी श्रद्धांजली वाहताना ही नज्म लिहिली होती त्यातील एका शब्दावरून त्याने आपले ‘तखल्लुस’ घेतले इकबाल यांची ती नज्म अशी होती.
चल बसा दाग आह मय्यत उसकी जेबे दोष है
आखरी शायर जहानाबाद का आज खामोश है
इस चमन में होगे पैदा बुलबुले सिराज भी
सैकडो साहीर भी होगे साहबे इजाज भी
हुबहू खिचेगा लेकीन इश्क कि तस्वीर कौन?
उठ गया नावाग फगन मारेगा दिल पे तीर कौन?
=========
हे देखील वाचा : ‘या’ सिनेमातील गाणे चित्रित करायला दिग्दर्शक राजू हिरानी तयार नव्हते.
=========
याचा अर्थ ‘दाग दहलवी’ तर आता गेले त्यांचा ‘जनाजा’ आमच्या खांद्यावर आहे. आता शेकडो साहीर (जादूगर) येतील, करिष्मा करणारे येतील पण प्रेमाची तंतोतंत प्रतिमा कोण उतारेल ? त्याचा काही उपयोग होणार नाही. साहीर या शब्दाचा अर्थ जादूगार! आणि अब्दुल हाई यांना यांना इक्बाल यांच्या नज्म मधील ‘सैकडो साहीर भी होगे साहबे इजाज भी हुबहू खिचेगा लेकीन इश्क कि तस्वीर कौन? हा शेर खूप आवडला. म्हणून त्यांनी या नज्म मधील ‘साहीर’ हा शब्द उचलला आणि ‘तखल्लुस’ म्हणून वापरायला सुरुवात केली! अशा पद्धतीने अब्दुल हाई चा साहीर लुधियानवी झाला!