ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
आनंद बंधूंचा भाचा जागतिक पातळीवर दिग्दर्शक कसा बनला?
बॉलीवूड मधील ज्या दिग्दर्शकांनी जागतिक पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवला त्यामध्ये एक नाव आवर्जून घ्यायला पाहिजे शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांचे. त्यांनी आपल्या देशात आणि विदेशात अनेक चित्रपट, टीव्ही सिरीयल्स बनवून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. खरंतर शेखर कपूर (Shekhar Kapoor) या इंडस्ट्रीमध्ये आले होते ते एक ॲक्टर बनण्यासाठी. पण बनले डायरेक्टर. आणि त्याहून गमतीची गोष्ट म्हणजे खरंतर त्यांना सिनेमात यायचंच नव्हतं. त्यांना व्हायचं होतं चार्टड अकाऊंटंट आणि ते त्या पद्धतीने सीए झाले देखील. पण घरातील सिनेमाचं वातावरण त्यांना फार काळ सिनेमापासून दूर ठेवू शकले नाही.
शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांचे तीनही मामा सिनेइंडस्ट्री मधील बाप माणूस होते. त्यांचे तीन-तीन मामा सिनेमांमध्ये होते आणि तिघेही इथले मातब्बर निर्माता- दिग्दर्शक होते. शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांचे मामा होते चेतन आनंद, देव आनंद आणि विजय आनंद. या तीन आनंद बंधूंची एक बहीण होती शीला कांता. तिचा हा मुलगा शेखर कपूर. यांचा जन्म ६ डिसेंबर १९४५ पाकिस्तानातील लाहोर इथला. त्यांचं शालेय शिक्षण तिथेच झालं. त्यांना सुरुवातीपासूनच चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं होतं. त्यानुसार त्यांनी आपला अभ्यास सुरू केला. इंग्लंडला जाऊन पदवी घेतली. काही मल्टिनॅशनल कंपन्यांसोबत त्याने काम देखील केले.
पण सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांना हिंदी सिनेमा भुरळ पाडत होता. नवकेतनच्या ‘इष्क इश्क इश्क’(१९७३) या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा चेहऱ्याला रंग लावला हा चित्रपट काही चालला नाही. पण तिन्ही मामांनी आपल्या भाच्याला चांगल्या पद्धतीने लॉन्च करायचे ठरवले. यासाठी विजय आनंद स्वतः प्रोड्यूसर बनले आणि त्यांनी आपल्या भाच्याला हिरो म्हणून प्रस्थापित करेल असा एक चित्रपट निर्माण केला. त्या काळात देव आनंद , विजय आनंद आणि चेतन आनंद प्रचंड बिझी असल्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय आनंद यांचे असिस्टंट मनोहर लाल यांनी केले. (त्यांनी दिग्दर्शित केलेला हा एकमेव चित्रपट होता!) (Shekhar Kapoor)
हा चित्रपट होता १९७५ साली प्रदर्शित झालेला ‘जान हाजीर है’. त्या काळात पोलका डॉटेड शर्ट्स, त्याच्या मोठ्या मोठ्या कॉलर्स आणि बेल बॉटम याची मोठी फॅशन होती. या चित्रपटातील शेखर कपूरचा (Shekhar Kapoor) लूकपण असाच होता. यात शेखर कपूर (Shekhar Kapoor) सोबत प्रेम किशन आणि नताशा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ही एक ट्रँग्युलर लव्ह स्टोरी होती. या सिनेमासाठी बजेट खूप कमी होते. त्यामुळे या चित्रपटाला संगीत जयकुमार पार्टी यांनी दिले होते. चित्रपटाची गाणी शैलेंद्र यांचे पुत्र शैली शैलेंद्र यांनी लिहिली होती. चित्रपट अजिबात चालला नाही. पण या सिनेमातील ‘हम ना रहेंगे तुम ना रहेंगे ये प्यार हमारा हमेशा रहेगा…’ हे अमित कुमार, मनहर आणि दिलराज कौर यांनी गायलेलं गाणं त्या काळात खूप लोकप्रिय झाला होतं.
तो ॲक्शन मूव्हीजचा जमाना होता त्यामध्ये हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला कळलच नाही. यानंतर शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांनी ‘टूटे खिलौने’ या एका चित्रपटात काम केलं होतं. यात त्यांची नायिका शबाना आजमी होती. या काळात शबाना आणि शेखर कपूर यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा मीडियामध्ये चांगली रंगली होती. ‘टूटे खिलौने’ हा सिनेमा देखील सुपरफ्लॉप झाला. यातील येसुदास ने गायलेलं ‘माना हो तुम बेहद हंसी…’ हे गाणं होतं त्या काळात प्रचंड गाजले होते.
==================
हे देखील वाचा : ….आणि नवकेतन फिल्म्स हे बॅनर पुन्हा उभे राहिले!
==================
अभिनेता म्हणून आपण फारसे यशस्वी होऊ शकत नाही म्हणून शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांनी बॉलीवूडचा नाद सोडून दिला होता. पुन्हा एकदा सी.ए. प्रॅक्टिस सुरु करावी असे विचार त्याच्या मनात येत होते. पण त्याच काळात त्याची भेट देवी दत्त यांच्यासोबत झाली आणि त्यांनी त्याला सिनेमा दिग्दर्शन करणार का? अशी ऑफर दिली. शेखर कपूर (Shekhar Kapoor) हे पूर्णपणे नवीन होते पण तरी त्याने देवी दत्त यांना होकार दिला आणि त्यातूनच १९८३ सालचा ‘मासूम’ हा चित्रपट तयार झाला. ‘मासूम’ या चित्रपटाने संपूर्ण देशभर मोठे यश मिळवले. यानंतर शेखर कपूर या नावाला बॉलीवूडमध्ये मोठे ग्लॅमर आले होते. १९८७ सालचा ‘मिस्टर इंडिया’ हा त्यांचा सर्वाधिक यशस्वी झालेला चित्रपट आला. यानंतर शेखर कपूर यांच्या यशाचा मार्ग प्रशस्त झाला. बँडिट क्वीन, एलिझाबेथ हे त्यांचे उल्लेखनीय सिनेमे.