‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
डॉक्टरचा अभिनेता कसा झाला???
स्टार प्रवाह वाहिनीवरील “रंग माझा वेगळा” या मालिकेने आता वेगळं वळण घेतलं आहे आणि यात ‘सुजय’ ही नवीन व्यक्तिरेखा आता आपल्या समोर आली आहे. ही भूमिका करणारा कलावंत म्हणजे डॉक्टर निखिल राजेशिर्के. तो अभिनयाच्या क्षेत्रात अनेक वर्षे आहे. निखिल हा ‘बालमोहन विद्यामंदिर’, दादरचा विद्यार्थी. विद्याताई पटवर्धन यांनी अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाटकाची आवड विकसित केली. निखिल हा देखील त्यांचाच विद्यार्थी. तो सातवीत असताना प्रकाश बुद्धिसागर दिग्दर्शित “आमच्या या घरात” या नाटकात त्याला भूमिका मिळाली. “नायक” नावाच्या मालिकेत निखिलने नकारात्मक भूमिका केली होती. शाळेत असताना “पेप्सी” ची जिंगल देखील तो गायला होता. मग “दे धमाल”, “आभाळमाया” असा त्याचा प्रवास सुरु झाला. “तेरा मेरा साथ रहे” मध्ये सुद्धा त्याची छोटीशी भूमिका होती. शाळेत असताना मासिकांसाठी जे फोटो शूट्स असतात, त्या फोटो शूटमध्ये सुद्धा त्याचा सहभाग होता.
हे हि वाचा: “दख्खनचा राजा ज्योतिबा माझा” मालिकेच्या शीर्षक गीताची गोष्ट…
अभिनयासोबत शिक्षणाची आवड…
दहावीनंतर रुईया कॉलेजला सायन्सला त्याने प्रवेश घेतला. मग एकांकिका स्पर्धेत यश मिळवले. बारावीनंतर निखिलने वैद्यकीय अभ्यासक्रम निवडला आणि त्याने इस्लामपूर येथील ‘लोकनेते राजारामबापू पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय’ येथे प्रवेश घेतला. तिथे स्थानिक पातळीवरील एकांकिका स्पर्धेत सुद्धा त्याने सहभागी होऊन यश मिळवले. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाला, इंटर्नशिप सुद्धा पूर्ण झाली. पण डॉक्टर झालेल्या निखिलला लक्षात आलं होतं की आपण वैद्यकीय क्षेत्रात रमणार नाही.
अखेर अभिनय वरचढ ठरला…
मुंबईत आल्यावर अभिनयाच्या क्षेत्रात प्रवास पुन्हा सुरु केला. आपण फक्त अभिनय करू नये, तर आपल्याला तांत्रिक बाजू सुद्धा माहिती हव्या, हा त्याचा दृष्टिकोन होता आणि त्याने “तेंडुलकर आऊट” या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले. तिथे त्याला खूप गोष्टी शिकता आल्या. अनेक एपिसोडिक मालिकांत त्याने भूमिका केल्या आहेत. “अरुंधती”, “एक मोहोर अबोल”, “दिल्या घरी तू सुखी रहा”, “लगोरी”, “प्रीती परी तुजवरती” लक्ष्य या मालिकांत त्याने काम केले. मराठी रंगभूमीवर “गॉड ब्लेस यु” या नाटकात त्याची भूमिका होती. सुयश टिळक, सुरुची आडारकर या कलाकारांचे गाजलेले नाटक “स्ट्रॉबेरी” यात देखील निखिलची महत्वाची भूमिका होती. “पंच ए तंत्र” या इंग्रजी नाटकात देखील त्याने काम केले आहे. “बायकर्स अड्डा”, “असेही एकदा व्हावे” हे निखिलने भूमिका केलेले चित्रपट देखील आपल्याला माहित आहेत. जाहिरातीत सुद्धा त्याने काम केले आहे. “हॅशटॅग मूव्हिंग आऊट” सीजन वन आणि सीजन टू या वेब् सिरीज मध्ये देखील त्याने काम केले आहे.
“रंग माझा वेगळा” मालिकेतील सुजयची भूमिका कशी मिळाली???
निखिल म्हणतो, “रंग माझा वेगळा” साठी मला अतुल केतकर यांचा फोन आला आणि त्यांनी जेव्हा मला ‘सुजय दाते’ ही व्यक्तिरेखा सांगितली, तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण आतापर्यंत मी केलेल्या भूमिकांत बहुतांशी भूमिका या नकारात्मक शेडच्या होत्या आणि या मालिकेत सकारात्मक भूमिका करायला मिळणार याचा खुप आनंद झाला. “निखिल सध्या “८ दोन ७५”, “फक्त इच्छाशक्ती हवी” या चित्रपटात भूमिका करत आहे.