दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
कविता कृष्णमूर्तींना ‘हे’ गाणे कसे मिळाले?
कविता कृष्णमूर्ती अतिशय प्रतिभावान आणि गोड गळ्याच्या गायिका आहेत. भारतातील सोळा विभिन्न भाषांमधून तब्बल २५००० हून अधिक गाणी गायली आहेत. अनेक पुरस्कारांसोबतच मानाच्या फिल्मफेअर आणि नॅशनल अवॉर्ड च्या त्या मानकरी आहेत. त्यांच्या एका अत्यंत गाजलेल्या गाण्याचा किस्सा आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मुळात हे गाणं कविता कृष्णमूर्ती गाणारच नव्हत्या. त्यांच्यासाठी ते गाणं बनलंच नव्हतं. त्या केवळ डमी आर्टिस्ट म्हणून एका ट्रॅकवर त्यांनी हे गाणं गायलं होतं नंतर हे गाणं आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं जाणार होतं पण काही कारणाने ते गाणे कविताच्या स्वरात कायम राहिले. या गाण्यात एक छोटीशी चूक देखील झाली होती. ती कुणाच्याच लक्षात देखील आली नाही. काय होती ती चूक? आणि कोणतं होतं ते गाणं?
कविता कृष्णमूर्ती (kavita krishnamurthy) सत्तरच्या दशकाच्या अखेर पासून अनेक कार्यक्रमातून जात होत्या.आशा भोसले यांचे ‘जाईये आप कहा जायेंगे ये नजर लौटके फिर….’ हे गाणं त्यांनी एका कार्यक्रमात गायले. संगीतकार हेमंत कुमार यांनी ते ऐकले. त्यांना कविताचा आवाज खूपच आवडला. त्यांनी तिला बोलावून घेतले आणि तिचे कौतुक केले. त्या नंतर हेमंत कुमार यांच्या बऱ्याच कार्यक्रमातून कविता कृष्णमूर्ती गाऊ लागल्या. परंतु बऱ्याचदा स्टेजवर आल्यानंतर प्रेक्षक त्यांना ‘तितली उडी…’ या गाण्याची फर्माईश करायचे! याचे कारण कविता कृष्णमूर्तीचे खरे नाव शारदा होते. आणि शारदा यांनी गायलेले ‘तितली उडी…’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय होते. नंतर तिने आपले शारदा हे नाव बदलून कविता करून घेतले!
हेमंत कुमार यांच्या अनेक बंगाली रचना तिने गायल्या अर्थात या केवळ डमी सिंगर म्हणून. नंतर त्या रचना बंगाली गायिके कडून डब केल्या जायच्या. हा सिलसिला आता हिंदी गाण्यांमध्ये देखील सुरू झाला. कविता कृष्णमूर्ती (kavita krishnamurthy) रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये जाऊन अनेक गाणी गायच्या परंतु नंतर ही गाणी लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड केली जायची! १९८७ साली आलेल्या शेखर कपूर यांच्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी कविताला बोलावले. हे गाणं खूप मजेशीर होतं. ‘हवाहवाई’. यात खूप अर्थहीन शब्द होते. (रेडीओ सिलोनवर असायचा तसा अनोखे बोल असलेले गाणे होते.) लक चिकी लक चिकी चिकी बूम , मोंबासा, होनोलूलू… त्यामुळे रेकॉर्डिंग च्या वेळेला कविताला खूप हसू येत होते. तब्बल चाळीस कोरस सिंगर्स आणि शंभरहून अधिक म्युझिशियंस चा ताफा यांच्यासोबत कविताने हे गाणे गायले आणि ते विसरून गेली! कारण हे गाणे दुसऱ्या दिवशी आशा भोसले यांच्या आवाजात होणार होते!
सहा महिन्यानंतर तिला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा फोन आला आणि सांगितले, ”तुझ्या आवाजात आपण रेकॉर्डिंग केलेले ‘हवा हवाई’ गाणे चित्रपटात देखील तुझ्याच आवाजात राहणार आहे. अभिनंदन.” कविता कृष्णमूर्तीला (kavita krishnamurthy) खूप आनंद झाला. पण तिने लगेच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सांगितले, ”पण याचे रेकॉर्डिंग आपल्याला पुन्हा करायला लागेल. कारण यात माझ्याकडून एक छोटी चूक झालेली आहे.” एलपींनी विचारले,”काय चूक झाली आहे?” त्यावर कविताने सांगितले की अंतऱ्याच्या एका ओळीमध्ये मी एका ठिकाणी ‘जिनू’ आणि एका ठिकाणी ‘जानू’ असा उच्चार केला आहे!” त्यावर एल पी म्हणाले, ”या गाण्यांमध्ये असे अनेक शब्द आहेत. ज्याला काहीही अर्थ नाही .त्यामुळे तू याकडे फारसे लक्ष देऊ नकोस. कुणाच्या लक्षात देखील हि चूक येणार नाही!” अशा पद्धतीने कविता कृष्णमूर्तीचे हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आणि तिथून तिचा खरा काळ सुरू झाला.
=========
ही देखील वाचा : यांच्या हट्टापाई राजकुमारीने १९७८ साली ही लोरी गायली…
=========
पुढे सुभाष घई यांच्यासोबत तिचे विशेष असोसिएशन होते. कर्मा, मेरी जंग, राम लखन, खलनायक, ताल अशा अनेक चित्रपटातून कविता कृष्णमूर्ती (kavita krishnamurthy) त्यांच्यासोबत गात होती. १९९२ साली आलेल्या आर डी बर्मन यांच्या ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील ‘प्यार हुआ चुपके से’ या गाण्यासाठी कविता कृष्णमूर्ती ला पहिले फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले!