नासिरुद्दीन शहाने ‘मिर्झा गालिब’चा रोल कसा मिळवला?
प्रत्येक कलाकाराचा एक ड्रीम रोल असतो. आपल्याला आयुष्यात ही भूमिका कधी न कधी करायला मिळावी अशी त्याची इच्छा असते. प्रत्येकाचीच ही इच्छा पूर्ण होईल अशातला भाग नसतो पण तो कलाकार ती भूमिका करण्यासाठी मात्र कायम प्रयत्नशील नक्कीच असतो. ‘मिर्झा गालिब’ (Mirza Ghalib) ही व्यक्तीरेखा, ती भूमिका आपल्याला साकारता यावी म्हणून एक युवक अगदी शालेय जीवनापासून उत्सुक होता. मिर्झा गालिबने त्याच्या जीवनावर प्रचंड प्रभाव टाकला होता. हा युवक होता अभिनेता नासिरुद्दीन शहा.
त्याने दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतले होते त्यानंतर ते पुण्याच्या एफ टी आय आयमध्ये शिक्षणासाठी आले. अजून त्यांचा चित्रपट प्रवेश व्हायचा होता. पण त्याच काळात त्यांना एक बातमी एका फिल्मी मासिकातमध्ये वाचायला मिळाली. ती बातमी अशी होती दिग्दर्शक गुलजार संजीव कुमारला घेऊन मिर्झा गालिब (Mirza Ghalib) या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत! ती बातमी वाचून नासिरुद्दीनची तळपायांची आग मस्तकाला गेली. जी भूमिका आपण करण्यासाठी इतके दिवस प्रयत्न करत होतो; ती भूमिका इतक्या सहजासहजी संजीव कुमारला कशी काय मिळू शकते? याचा त्याला प्रचंड राग आला.
त्याने त्या रागातच गुलजार यांना एक पत्र लिहिले या पत्रात नासिरुद्दीन शहा यांनी लिहिले ‘तुम्ही मिर्झा गालिब या चित्रपटाची निर्मिती करत आहात ही खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे. पण या भूमिकासाठी तुम्ही ज्या कलाकाराची निवड केली आहे ती सर्वथा चुकीची आहे. संजीव कुमार या भूमिकेसाठी अत्यंत चुकीची निवड आहे. याची दोन कारणे आहेत. एक तर संजीव कुमार यांचे उर्दू उच्चार अजिबात चांगले नाहीत. दुसरे मिर्झा गालिब (Mirza Ghalib) आणि शेरोशायरी याचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे ही भूमिका त्यांना अजिबात जमणार नाही. या भूमिकासाठी कुणी योग्य कलाकार असेल तर मीच आहे! त्यामुळे तुम्ही थांबा. लवकरच पुण्यातील अभ्यासक्रम संपवून मी मुंबईला येत आहे. मी आल्यानंतर ही भूमिका मला द्या मग बघा मी कशी रंगवतो ते!”
गद्धे पंचविशीतमध्ये लिहिलेले हे पत्र गुलजार यांना मिळाला की नाही हे ठाऊक नाही पण गुलजार संजीव कुमारला घेऊन ‘मिर्झा गालिब’ हा जो चित्रपट निर्माण करत होते त्यात वारंवार अडथळे येत होते. तो सिनेमा कधीच तयार झाला नाही. काही न काही कारणाने हा प्रोजेक्ट पुढे पुढे ढकलत गेला आणि ६ नोव्हेंबर १९८५ या दिवशी संजीव कुमार यांचे निधन झाले. मग प्रश्नच संपला.
याच काळात देश पातळीवर एक सांस्कृतिक परिवर्तनाची घटना घडली. ऐंशीच्या दशकामध्ये भारतात दूरदर्शनचे जाळे पार गावापर्यंत पोहोचले आणि दैनंदिन मालिकांना सुरुवात झाली होती. आता दूरदर्शन एक स्ट्रॉंग मीडिया तयार झाले. गुलजार यांनी आता ‘मिर्झा गालिब’(Mirza Ghalib) वर चित्रपट न बनवता एक दूरदर्शन मालिका बनवायचे ठरवले. तोवर नसिरुद्दीन शहादेखील एक प्रस्थापित अभिनेता बनला होता. त्यामुळे साहजिकच ही भूमिका नसीरलाच मिळाली. फक्त त्याच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला कारण निर्मात्यांच्या दृष्टीने नासिरचे मानधन खूप जास्त होते.
==========
हे देखील वाचा : लताचे ‘हे’ गाणे गुलजार आपल्या पहिल्या चित्रपटात घेऊ शकले नाही?
==========
त्यावर नासिरचे असे म्हणत होते की या भूमिकेसाठी मी गेली वीस वर्ष प्रयत्न करतो आहे. पंधरा वर्षांपूर्वी मीच तुम्हाला एक पत्र देखील पाठवले होते. मिर्झा गालिब माझ्या रोमा रोमात विसावला आहे. त्यामुळे या भूमिकेवर माझा हक्क आहे. राहता राहिला प्रश्न पैशाचा. मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांनी आयुष्यात कधीच पैशासाठी तडजोड केली नाही मग मी का करू?” गुलजार यांना नासिरचा तो विश्वास आणि तो अटीट्युड आवडला आणि नासिर घेऊन त्यांनी मिर्झा गालिब या मालिकेची निर्मिती केली. नासिरने आपल्या आत्मचरित्रामध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक असा उल्लेख या भूमिकेचा केला आहे.
गुलजार यांनी अतिशय तब्येतीने ही मालिका बनवली. या मालिकेत नसिरुद्दीन शाह (मिर्झा गालिब) (Mirza Ghalib), तन्वी आझमी (उमराव बेगम) सुधीर दळवी (बहादूर शहा जफर), नीना गुप्ता (नवाब जान),अमजद खान (काली मियां), शफी इनामदार (मोहम्मद इब्राहीम) परीक्षित सहानी (नवाब शाम्सुद्दीन) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मालिकेला जगजीत सिंग यांचे संगीत होते.