सलमान खानचा दबंग कसा बनला?
सुपरस्टार सलमान खान यांचे अनेक सिनेमे आजही देशाच्या नॉर्थ बेल्टमध्ये प्रचंड संख्येने पुन्हा पुन्हा पहिले जातात. त्यात पुन्हा ‘दबंग’ या सिरीज मधील तीनही चित्रपट सुपर डुपर हिट त्याचे कल्ट क्लासिक बनले आहेत. आज सलमानच्या एकूणच फिल्मी करिअरमधील या तीनही चित्रपट जबरदस्त हिट सिनेमांना मोठे स्थान आहे. पहिला दबंग २०१० साली आला होता. गंमत म्हणजे या ‘दबंग’ चित्रपटाचा हिरो आधी सलमान खान नव्हताच. दुसऱ्याच कुठल्या अभिनेत्याचा विचार या भूमिकेसाठी केला जात होता. मग सलमान खानला हा दबंग मिळाला कसा मिळाला? मोठी इंटरेस्टिंग स्टोरी आहे.(Salman Khan)
दिग्दर्शक अभिनव सिंग कश्यप या सिनेमाची कथा घेऊन अनेक जणांना भेटत होते. पण कोणीही याबाबत सकारात्मक विचार करत नव्हता. अभिनव सिंग कश्यप वैतागला होता. एक दिवस तो सलमान खानचा भाऊ अरबाज खान यांना भेटला आणि त्याने सांगितले,” मला फक्त तुम्ही चाळीस मिनिटे द्या या सिनेमाची स्टोरी मी तुम्हाला सांगतो. जर आवडली तरच पुढचा विचार करू” असे म्हणून त्याने अरबाज खानला सिनेमाची स्टोरी ऐकवली. अरबाजला कथानक खूप आवडलं. तो अभिनव सिंग कश्यप ला म्हणाला,”यातील कुठले कॅरेक्टर मी करावे असे तुम्हाला वाटते?” त्यावर कश्यप म्हणाले ,”मख्खीचे!” त्यावर अरबाज म्हणाला,”मक्खीच का? चुलबुल पांडे का नाही?” त्यावर कश्यप म्हणाले,” नाही. या भूमिकेसाठी माझ्या डोक्यात दुसरी काही नावे आहेत.” अरबाज खानने ती नावे विचारली असता त्यांनी सांगितले,” चुलबुल पांडेची भूमिका इरफान खान किंवा रणदीप हुडाने करावी असे मला वाटते.”
त्यावर अरबाज खानने विचारले,“मख्खीची भूमिका तुम्ही मला का देत आहात?” यावर कश्यप यांचे उत्तर होते,”मी तुम्हाला ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात बघितले होते. यात तुमचा कॅमिओ होता पण ती तुमची भूमिका मला खूप आवडली होती म्हणून मी तुम्हाला देत आहे.” अरबाज ने विचारले,” सिनेमाचा प्रोड्युसर कोण आहे?” त्यावर कश्यप म्हणाले “त्याचाच शोध चालू आहे.” त्यावर अरबाज खान ने विचारले,” जर हा सिनेमा मी प्रोड्यूस केला तर?” त्यावर खुश होऊन कश्यप म्हणाले,”का नाही? मला आवडेल!”(Salman Khan)
अशा पद्धतीने अरबाज खानने हा सिनेमा प्रोड्युस करायचे ठरवले. मग त्याने चुलबुल पांडेच्या भूमिकेसाठी सलमान खान (Salman Khan) याला घ्यायचे ठरवले. त्याने विचार केला नाही तरी कथानकामध्ये दोन भावांचीच कथा आहे मग तिथे देखील दोन सख्या भावाने भूमिका केली तर चांगले होईल असे त्यांना वाटले. अरबाजने सलमानला विचारले. त्याला देखील कथानक आवडले आणि त्याने होकार दिला. नंतर अरबाजने कश्यप यांना सलमानकडे पाठवून संपूर्ण कथा पुन्हा एकदा त्याला सांगायचे सांगितले.
कश्यप त्यांनी आता कथानक पुन्हा एकदा सलमानला (Salman Khan) सांगितले. सलमान काम करायला तयार झाला आणि म्हणाला “तुम्ही हा सिनेमा आता सलमानच्या स्टाईलने बनवा. बजेटचे काही काळजी करू नका. हा सिनेमा आता आपण मोठ्या स्केलवर बनवत आहोत.” या सिनेमात आधी गाणी नव्हती. पण अरबाजने सांगितले,”लोकाना पडद्यावर सलमानला गातांना, नाचतांना पाहायला आवडतं. त्यामुळे त्याला गाणी हवीच.” सलमानचा या सिनेमातील लूक काहीसा वेगळा होता. यात त्याला मिशा होत्या! तीन-चार महिने वेगवेगळ्या लुक्सवर चर्चा करण्यात आली. आणि मग हा लुक फायनल करण्यात आला.
========
हे देखील वाचा : शशी कपूरचा पहिला सुपरहिट सिनेमा
========
सलमानची (Salman Khan)नायिका म्हणून सोनाक्षी सिन्हा हिची निवड झाली. तिचा हा पहिला हिट सिनेमा होता. पण तिची शरीर यष्टी खूप जाड होती. सलमानने तिला बारीक व्हायला सांगितले. तिने आपले वजन बऱ्यापैकी कमी केले. चित्रपटात अरबाज खानची पत्नी मलाइका अरोरा हिने एक आयटम डान्स केला होता. ‘मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये…’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले. या चित्रपटातील ‘तेरे मस्त मस्त दो नैन …’ या गाण्याला देखील पब्लिकने खूप उचलून धरले. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाले. सिनेमाचे काही शूटिंग दुबई येथे झाले १० सप्टेंबर २०१० रोजी रमजान ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा जगभर प्रदर्शित झाला आणि तीस कोटी रुपये बजेट असलेले या सिनेमाने तब्बल २०० कोटी रुपये कमावले. दिग्दर्शक कश्यप याचा हा पहिलाच चित्रपट होता आणि पहिल्याच सिनेमाने जबरदस्त बिजनेस केला!