
एस पी सिन्हाचा शत्रुघ्न सिन्हा कसा झाला ?
सत्तर आणि ऐंशी च्या दशकातील शॉटगन शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांचा चित्रपट प्रवेश आणि त्यांचे फिल्मी नामकरण याचा एक फार मजेशीर किस्सा आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून अभिनयाचा कोर्स पूर्ण केला होता. १९६७ साली त्यांनी आपला कोर्स पूर्ण केल्यानंतर ते मुंबईला येऊन काम शोधू लागले. त्यांचा चेहरा कोणत्याही अँगलने नायक बनण्यासाठी नव्हता म्हणून त्यांना बराच स्ट्रगल करावा लागला. त्यांनी सुरुवातीला सहनायक आणि खलनायकाचे भूमिका केल्या. त्यांना पहिले काम मिळवून देण्यासाठी अल्युमनी असोसिएशनचा खूप उपयोग झाला.
त्यांच्या एका जुन्या सीनियरने शत्रुघ्न सिन्हांना (Shatrughan Sinha) गोगी आनंद कडे पाठवले. गोगी आनंद देव आनंदचे पुतणे होते आणि ते देव आनंदला असिस्ट करत होते. (पुढे याच गोगी आनंदने देव आनंदचा डार्लिंग डार्लिंग हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.) गोगीने देव आनंद आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मीटिंग फिक्स केली. देव आनंद यांनी त्यांना आपल्या ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटात एका पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची भूमिका दिली.

देव आनंद यांचा ‘प्रेम पुजारी’ हा पहिलाच दिग्दर्शनातील प्रयोग होता. पहिल्याच सिनेमा तोदेखील नवकेतन बॅनरचा यामुळे शत्रुघ्न सिन्हा खूप खूष झाला. देव आनंद आपल्या सिनेमाचे चित्रीकरण बऱ्याचदा परदेशात करत असल्यामुळे आपल्याला देखील या सिनेमाच्या शूटिंगसाठी परदेशात जायला मिळेल असे देखील शत्रुघ्न सिन्हाला वाटले ! पण शत्रुघ्न सिन्हाचे सर्व शूटिंग नाशिक जवळ आणि शिर्डी येथे झाले. या सिनेमातील शत्रुघ्न सिन्हा यांचा रोल अतिशय छोटा असल्यामुळे एका दिवसातच शूटिंग उरकले!
या चित्रपटाच्या शूटिंग लांबल्यामुळे या सिनेमाच्या आधीच त्याने जो चित्रपट त्या नंतर साइन केला होता मोहन सैगल यांचा ‘साजन’ तो आधी १९६९ साली प्रदर्शित झाला. त्यामुळे त्यामुळे शत्रुघन सिन्हा चा पहिला सिनेमा म्हणून ‘साजन’ चा उल्लेख होतो. भले त्याने पहिले शूट ‘प्रेम पुजारी’ चे केले असले तरी पहिल्यांदा प्रदर्शित झालेला ‘साजन’ हाच चित्रपट होता. या दोन्ही सिनेमांमध्ये सुरुवातीच्या क्रेडीट टायटल्स मध्ये शत्रुघन सिन्हा हे नाव येत नाही तर तिथे नाव येते एस पी सिन्हा ! कारण शत्रुघ्न सिन्हाचे खरे नाव होते शत्रुघ्न प्रसाद सिन्हा. हे एवढे लांबलचक नाव घेण्यापेक्षा त्याने एस पी सिन्हा हे छोटे आणि सुटसुटीत नाव घेतले.
नंतर मात्र शत्रुघ्न सिन्हाच्या (Shatrughan Sinha) एका मित्राने त्याला सांगितले,” अरे हे काय सिनेमाचे नाव झाले का ? हे फिल्मी नाव वाटत नाही तर कुठल्यातरी सरकारी बांबूचे नाव वाटते ! त्यामुळे हे नाव तू बदल.” त्याकाळी फिल्मी नाव घेण्याची एक फॅशन झाली होती. जतीन खन्नाचा राजेश खन्ना झाला होता. रवी कपूरचा जितेंद्र झाला होता. त्यामुळे शत्रुघ्न प्रसाद सिन्हा उर्फ एस पी सिन्हा यांनी देखील आपले नाव बदलण्याचा प्रयत्न केला. पण त्याला विरोध त्याच्या घरूनच झाला. याचे कारण शत्रुघ्न सिन्हा बिहारमधील एका खानदानी कुटुंबातील घटक होतात. त्याला चार भाऊ होते आणि या चार भावांची नावे होती…राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न! त्यामुळे त्यांच्या भावांनी शत्रुघ्न ला नाव बदलला विरोध करून सांगितले,” अरे जगामध्ये असे खूप कमी कुटुंब आहेत जिथे चार भावांची नावे अशी आहेत त्यामुळे कृपा करून हे नाव तू बदलू नकोस!”
==========
हे देखील वाचा : संगीतकार रोशनचे अखेरचे गाणे !
==========
आपल्या भावांच्या विनंतीला मान देऊन मधले प्रसाद हे नाव काढून शत्रुघ्न सिन्हा ने आपले हेच नाव वापरायचे ठरवले. फक्त त्याने एक छोटा सा बदल केला. आपल्या नावाचे स्पेलिंग थोडेसे बदलले. शत्रुघ्नच्या ऐवजी shatrughan असे केले! फक्त ए आणि एन हे अक्षरे त्याने एन आणि ए अशा पद्धतीने बदलून घेतली आणि त्यामुळे त्याचा उच्चार व्यवस्थित होवू लागला! आणि एस पी सिन्हा चा शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) झाला. त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख आहे.