‘फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब येणार नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला!
‘साजन’ चे संगीत एल पी कडून नदीम श्रवण यांच्याकडे कसे गेले?
सुधाकर बोकाडे निर्मित आणि लॉरेन्स डिसूझा दिग्दर्शित ३० ऑगस्ट १९९१ रोजी प्रदर्शित झालेला ‘साजन’ हा चित्रपट ऑल टाइम म्युझिकल हिट सिनेमा आहे. संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. या चित्रपटातील प्रत्येक गाणं त्या काळात प्रचंड गाजल होत. खरं तर या चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल देणार होते. दिग्दर्शकासोबत त्यांच्या एक दोन मीटिंग देखील झाल्या होत्या. सिनेमाचे बॅकग्राऊंड म्युझिक कसे असावे यावर देखील चर्चा झाली होती. मग हा सिनेमा संगीतासाठी संगीतकार नदीम श्रवण (Nadeem Shravan)यांच्याकडे कसा गेला? याचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे.
दिग्दर्शक लॉरेन्स डिसूजा यांचा हा दुसरा चित्रपट याच्या आधीचा चित्रपट ‘न्याय अन्याय’ १९८८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आनंद मिलिंद यांचे संगीत होते. तो सिनेमा देखील सुधाकर बोकाडे यांनी निर्माण केला होता. ‘साजन’ या चित्रपटाला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत द्यायचे ठरले होते पण त्या काळात ते प्रचंड बिझी होते. त्यामुळे या सिनेमाला संगीत द्यायला त्यांच्याकडे अजिबात वेळ नसायचा. लॉरेन्स डिसूजा रोज लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे जाऊन बसायचे पण त्यांचा नंबर कधी लागायचाच नाही.
अनेक मोठे मोठे निर्माते दिग्दर्शक लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे आलेले असायचे. सुभाष घई, एन चंद्रा…. त्यामुळे लॉरेन्स डिसूजा यांचा नंबर कधी यायचा नाही. त्यांनी निर्माते सुधाकर बोकाडे यांना सांगितले की आपण एकदा स्पष्टपणे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना विचारू आणि निर्णय घेऊ. त्या पद्धतीने सुधाकर बोकाडे एकदा एलपी यांना भेटले त्यांनी त्यांच्या चित्रपटांची लिस्ट दाखवली. त्यावेळेला दोघांच्या राजीखुशीने त्यांनी नवीन संगीतकार निवडायचे ठरवले.
अशा पद्धतीने संगीतकार नदीम श्रवण (Nadeem Shravan) यांची चित्रपटात एन्ट्री झाली. तोवर चित्रपटाचे बरेचशे शूटिंग झाले होते. नदीम श्रवण यांनी सांगितले की, ”तुम्ही तुमच्या चित्रपट रशेस मला पाठवा त्यानुसार मी सिनेमाचा जॉनर बघतो आणि त्यानुसार चित्रपटाला संगीत देतो.” झालेल्या शूटिंगची काही रिळे त्यांना दाखवण्यात आली. नदीम श्रवण यांनी काही ट्युन्स सुधाकर बोकाडे आणि लॉरेन्स डिसूजा यांना ऐकवल्या. पण दोघांना त्या काही आवडल्या नाही. त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी पाहून नदिम म्हणाले, ”थांबा आमच्या डेटा बँकेमध्ये भरपूर ट्युन्स आहेत!” त्यांनी आणखी काही धून वाजवून दाखवल्या.
त्यातली पहिलीच ट्यून या दोघांना खूप आवडली. या ट्यूनवर नंतर गीतकार समीर यांनी गाणे लिहिले. गाणे होते ‘बहुत प्यार करते है तुमको सनम’ यानंतर संगीतकार नदीम श्रवण (Nadeem Shravan) यांनी त्या दिवशी त्यांना भरपूर ट्युन्स ऐकवल्या. त्यातील निवडक सात ट्यून्स त्यांनी सिलेक्ट केल्या आणि त्यावर गाणी लिहिली गेली आणि संगीतबद्ध झाली. अवघ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये ‘साजन’ या चित्रपटाचे संगीत तयार झाले. एकूण एक सुंदर असलेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आणि हा सिनेमा सुपर हिट झाला.
बहुत प्यार करते है तुमको सनम (अनुराधा पौडवाल/एस पी बालसुब्रमण्यम),मेरा दिल भी कितना पागल है ये प्यार तो तुमसे करता है(कुमार सानू आणि अलका याद्निक),देखा है पहली बार एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका), जिये तो जिये कैसे बिन आपके (एस पी बालसुब्रमण्यम/कुमार सानू/अनुराधा/पंकज), तुमसे मिलने कि तमन्ना है (एस पी बालसुब्रमण्यम),तू शायर है (अलका), पहली बार मिले है (एस पी बालसुब्रमण्यम) ही सर्व गाणी समीरची होती फक्त एक गीत ‘पहली बार मिले है’ फैज अन्वर यांनी लिहिले होते.
===================
हे देखील वाचा : कोमात असलेल्या सचिनदा यांनी ‘ही’ बातमी ऐकून डोळे उघडले!
===================
साजन सिनेमाला फिल्मफेअरची तब्बल ११ नामांकने मिळाली होती. त्या पैकी सर्वोत्कृष्ट संगीतकार (नदीम श्रवण), आणि सर्वोत्कृष्ट पार्श्व गायक कुमार सानू(मेरा दिल भी कितना ) ही पारितोषिके मिळाली. १९९१ सालचा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा सीनेमा होता. एल पी यांनी नक्कीच चांगले संगीत दिले असते पण नदीम श्रवण (Nadeem Shravan) यांनी अवघ्या १५ दिवसात सुरीलं संगीत देवून इतिहास घडवला.