‘सत्यम शिवम सुंदरम’ मधील नायिकेचा रोल झीनतने कसा मिळविला?
सत्तरच्या दशकामध्ये आर के फिल्म्सचा एक चित्रपट आला होता ‘सत्यम शिवम सुंदरम’. या चित्रपटाने बॉलीवूडचे अंग प्रदर्शनाचे गणित बदलवून टाकले. यातील नायिकेचा बोल्ड अंदाज सर्वांचीच झोप उडवून गेला. यातील नायिकेच्या भूमिकेने बॉलीवूडमधील प्रस्थापित चौकटीला धक्का बसला. यातील नायिकेचा रोल झीनत अमानला (Zeenat Aman) कसा मिळाला याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत झीनतने स्वतःच याबद्दल सांगितले होते. (Zeenat Aman)
खरंतर झीनत अमानच्या कारकीर्दीमध्ये महत्त्वाच्या तीन भूमिका सांगायच्या झाल्या तर पहिली भूमिका ऑफकोर्स १९७१ सालच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील जेनिसची होती. त्यानंतर बी आर चोप्रा यांच्या १९८० सालच्या ‘इंसाफ का तराजू’ या चित्रपटातील बलात्कारी स्त्रीची जबरदस्त भूमिका आणि सर्वात लोकप्रिय आणि ज्या भूमिकेला एकाच वेळी लोकप्रियता आणि आजच्या भाषेत ट्रोलिंग मिळाले आणि ज्या चित्रपटामुळे तिला आयडेंटिटी मिळाली ती भूमिका म्हणजे ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटातील रूपाची. या भूमिकेमध्ये तिला भरपूर अंग प्रदर्शन करायचे होते. पण हे आव्हान तिने स्वीकारले. (Zeenat Aman)
राज कपूरच्या चित्रपटांमधून नायिकांना ज्या पद्धतीने पेश केले जातात तो अंदाज सर्वार्थाने वेगळा असायचा. नर्गिस आयुष्यातून निघून गेल्यानंतर राज कपूर काहीसा बिथरला होता आणि त्यांच्यातील व्यावसायिक निर्माता जागा झाला होता. आपल्या नायिकांचे अंग प्रदर्शन करून बऱ्यापैकी बिजनेस कॅश करून घेतला. सिम्मी गरेवाल (मेरा नाम जोकर) किंवा डिंपल कपाडिया (बॉबी), पद्मिनी (जिस देश मे गंगा बहती है), वैजयंतीमाला (संगम) , मंदाकिनी (राम तेरी गंगा मैली ) ही अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. ( Zeenat Aman )
‘बॉबी’ हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर राज कपूरने ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. या सिनेमातील बोल्ड नायिकेच्या भूमिकेसाठी त्यांनी आधी हेमा मालिनीला विचारले परंतु तिने ही भूमिका ऐकून नकार दिला. असाच नकार विद्या सिन्हाने देखील दिला. त्यानंतर ही भूमिका राज कपूरने डिंपलला ऑफर केली पण तिचे लग्न झाल्यामुळे तिने चित्रपट संन्यासच घेतला होता. आर.के. च्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ साठी हिरोईनचा शोध पुन्हा सुरू झाला. राजकपूर सर्वांशी बोलताना “हीरोइन नही मिल रही है…हीरोइन नही मिल रही है ” असे म्हणायचं. (Zeenat Aman)
याच काळामध्ये राजकपूर काही आर के बाहेरच्या चित्रपटात काम करत होता. साधारणता १९७५ साली ‘वकील बाबू’ या चित्रपटात तो काम करत होता. (हा चित्रपट खूप रखडला आणि कसाबसा १९८२ साली प्रदर्शन झाला!) या ‘वकील बाबू’ मध्ये शशी कपूर आणि झीनत अमान (Zeenat Aman) ही पेअर होती आणि राज कपूरची महत्वपूर्ण भूमिका होती. सेटवर राज कपूर कायम ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाबद्दल आणि त्यातील हिरोईनच्या गेटअप बद्दल बोलत असे. सेट वर भेटायला येणाऱ्या प्रत्येकासोबत तो हाच विषय बोलत असे. झीनत अमान (Zeenat Aman)शांतपणे सर्व ऐकत असे. तिला मनातून वाटत होतं की ही भूमिका आपल्याला मिळावी पण तिची हिंमत होत नव्हती. राज कपूरकडून रोज हिरोईनचे वर्णन ऐकून तिच्या डोक्यात हिरोइनचा अटायर फिट बसला होता.
एक दिवस मात्र तिने खंबीर मनाने एक निर्णय घेतला. चित्रपटाच शूटिंग पॅकअप झाल्यानंतर ती आर के स्टुडीओ मध्ये दाखल झाली आणि तिथे जाताना तिने ‘सत्यम शिवम सुंदरम’ मधील रूपाचा पेहराव केला होता. पांढरी साडी, ब्लाउज गायब आणि चेहऱ्यावर भाजल्याची निशाणी असल्याचा एक पेपर चिकटवला होता. आर के स्टुडिओमध्ये गेल्यानंतर ती राजकपूर समोर उभी राहिली आणि म्हणाली “मैं तुम्हारी रूपा हूं !” ‘वकील बाबू’ च्या सेटवर राज कपूर ने इतक्या वेळेला या हिरोईनबद्दल सांगितलं होतं की तिच्या मनात रूपाची प्रतिमा परफेक्ट तयार झाली होती आणि तशीच इमेज करून ती आर के स्टुडिओत दाखल झाली.(Zeenat Aman)
राज कपूर प्रचंड खूष झाला. त्याने लगेच त्याची पत्नी कृष्णा कपूरला बोलवलं आणि सांगितलं, “आपल्याला आपल्या सिनेमाची हीरोइन मिळाली!” कृष्णा कपूर देखील खूष झाली तिने लगेच आत जाऊन काही सोन्याचे अलंकार आणले आणि ते झीनत अमानला (Zeenat Aman) दिले आणि सांगितले “हि सायनिंग अमाऊंट आहे!” अशा पद्धतीने झीनत अमानची ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटात एन्ट्री झाली. (Zeenat Aman)
==========
हे देखील वाचा : हँडसम शशी कपूरला पाहून तरुण शर्मिला टागोर त्याच्यावर लट्टू झाली होती!
==========
या सिनेमात तिचे कॉस्चुम डिझाईन आणि वेशभूषा ऑस्कर विजेत्या भानू अथय्या यांनी केले होते. वर उल्लेख केलेल्या तिन्ही भूमिकांसाठी झीनतला (Zeenat Aman) फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले होते पण ॲवॉर्ड मात्र फक्त ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला.‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला नॉमिनेशन मिळाले अवॉर्ड मात्र अभिनेत्री नूतन हिला ‘मै तुलसी तेरे आंगन की’ या चित्रपटासाठी मिळाले! (Zeenat Aman)