
Television Serial War: स्टार प्रवाह मालिका विरुद्ध झी मराठी मालिका; TRP च्या स्पर्धेत कोण मारेल बाजी?
टीव्हीविश्वात कोणता कार्यक्रम चालेल, कोणता नाही, याचं गणित बदलतं ते अक्षरशः प्रत्येक आठवड्याला. TRP म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद – आणि त्यासाठी सर्व वाहिन्या आपापल्या पातळीवर नवनवीन प्रयोग करतच असतात. सध्या आघाडीवर असलेल्या दोन प्रमुख वाहिन्या स्टार प्रवाह आणि झी मराठी यांनी नव्या शो आणि मालिकांची घोषणा करत प्रेक्षकांच्या मनोरंजनात रंग भरायला सुरुवात केली आहे. स्टार प्रवाहच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘आता होऊ दे धिंगाणा’ चं चौथं पर्व नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत, नव्या जोशात या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. हा शो ९ ऑगस्टपासून प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Television Marathi Serial War)

याच वेळेस झी मराठीवरदेखील मोठं पुनरागमन होत आहे आणि तेही कोणाचं, तर तब्बल १० वर्षांहून अधिक काळ गाजलेला ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाचं! हा शो २६ जुलैपासून शनिवार–रविवार रात्री ९ वाजता पुन्हा प्रसारित होणार आहे. त्यामुळे दोन्ही वाहिन्यांवर एकाच वेळेस दोन दिग्गज रिअॅलिटी शोज समोरासमोर असणार आहेत, आणि TRPच्या स्पर्धेला रंग चढणार आहे.

याशिवाय, मालिकांच्या पातळीवरदेखील दोन्ही वाहिन्यांनी दमदार तयारी केली आहे. झी मराठीवर नुकतीच ‘कमळी’ ही नवीन मालिका सुरू झाली आहे. लवकरच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ही लोकप्रिय जोडी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत दिसणार आहे. शिवाय, ‘तारिणी’ या मालिकेचा प्रोमो ही रिलीज झाला असून, त्यात शिवानी सोनार आणि स्वराज नागरगोजे प्रमुख भूमिकेत झळकतील.(Television Serial War)
================================
================================
दुसरीकडे, स्टार प्रवाहवर ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका नुकतीच प्रसारित झाली आहे. तसेच, रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘लपंडाव’ ही नवी मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एकूणच, दोन्ही चॅनेल्सकडून दमदार तयारी सुरू आहे. कोणता शो किंवा मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल आणि कोण पुढे जाईल या TRPच्या स्पर्धेत हे पाहणं आता उत्कंठावर्धक ठरणार आहे.