‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
नेत्राची १०० दिवसांची तपस्या प्रेक्षकांसाठी फळणार का?
हंड्रेड :नेत्राची १०० दिवसांची तपस्या प्रेक्षकांसाठी फळणार का?
ऑनलाईन ॲप : हॉटस्टार
पर्व : पहिले
स्वरूप : नाट्यपट
दिग्दर्शक : रुची नरेन, आशुतोष शाह, ताहेर शब्बीर, अभिषेक दुबे
मुख्य कलाकार : लारा दत्ता, रिंकू राजगुरु, करण वाही, परमित सेठी, मकरंद देशपांडे आणि इतर
सारांश : एक पोलीस अधिकारी आणि मरणाच्या दारावर उभी असलेली मुलगी अशा वेगळ्याच प्रवृत्तीच्या दोन स्त्रियांभोवती फिरणाऱ्या या गोष्टीचे बहुरंगी पदर प्रेक्षकांना थक्क करतात.
अपयश आणि मरण या दोन गोष्टी माणसाला सुन्न करतात. सतत प्रयत्न करूनही अपयशी ठरणारा व्यक्ती आणि आपण मरणाच्या उंबरठ्यावर उभं असल्याची जाणीव असल्याची व्यक्ती वेळेप्रसंगी आपलं सगळं अवसान गाळून शस्त्र टाकते किंवा ‘आता गमविण्यासारख काहीच उरलं नाही’, हे लक्षात घेऊन नव्या उमेदीने उडायचा प्रयत्न करते. नेत्रा आणि सौम्या आपापल्या आयुष्याच्या याचं टप्प्यावर उभ्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी असलेली सौम्या आपल्या स्त्रीव्देष्टी वरिष्ठ पोलीस अधिकारी अंशुमन आणि व्यवस्थेपुढे हतबल असलेला पोलीस नवरा प्रवीण यांच्या दबावामुळे उत्तम कामगिरी करण्याची क्षमता असूनही पोलीस विभागाची ‘शोभेची बाहुली’ बनून राहिलेली असते. कोणतीही महत्त्वाची केस तिला देण्यापेक्षा सणांच्या दिवशी पोलिसांच्या प्रभातफेऱ्या काढणे, फ्लॅशमॉबसारख्या कार्यक्रमातून खात्याची प्रसिध्दी करणे, उद्घाटन सोहळ्यात रिबिनी कापणे अशी दुय्यम कामे तिला थोपवली जातात. त्यामुळे ती येनकेन मार्गाने स्वतःच्या जबाबदारीवर एखादी केस घेऊन सोडविण्याचा प्रयत्नात असते. त्याचवेळी तिची भेट होते सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या नेत्राशी. ऐन तारुण्यात स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याच्या काळामध्ये आळशी वडील, धाकटा भाऊ आणि आजोबांची जबाबदारी खांद्यावर घेऊन नोकरी आणि घरकाम सांभाळणाऱ्या नेत्राला एकेदिवशी कळत की तिला ब्रेन ट्युमर झालेला असून तिच्याकडे जगण्यासाठी जेमतेम शंभर दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे या शंभर दिवसांमध्ये इतर कशाचीही काळजी करण्यापेक्षा आपल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याचा वसा घेतलेली नेत्रा पहिल्यांदा दारू पिण्यासाठी बारमध्ये दाखल होते. तिथे नेत्रा आणि सौम्याची पहिली भेट होते. जीवावर उदार होऊन आलेला प्रत्येक क्षण जगण्याच्या तयारीत असलेली नेत्रा आपल्या बुडत्या करीयरला आधार होऊ शकते अशी जाणीव सौम्याला होते आणि ती नेत्राला आपल्यासोबत काम करायला राजी करते.
स्वित्झर्लंडला जायचं, पहिल्यांदा शरीरसुखाचा अनुभव घ्यायचा अशी स्वप्न चाळीत एका खोलीत राहणारी नेत्रा रंगवत असते. त्यात अचानक एकेदिवशी पोलीस खात्यात काम करायला मिळणार म्हणून हरकून जाते. सौम्या तिला आपल्या मिशनमध्ये कामाला लावून घेते. तिच्यासाठी माहितीगार म्हणून काम करणे, छुपे कॅमेरे लावणे, किडनी चोरणारे रॅकेट पकडण्यासाठी डमी गिऱ्हाईक बनून जाणे अशी काम करून घेते. पण हे सगळं करताना परिस्थितीमुळे दबलेल्या सौम्याची वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर हळूहळू उभी राहत जाते आणि सिरीजच्या कथानकाची उत्सुकता वाढत जाते.
रिंकू राजगुरूचं नावं आल्यवर सैराटचा संबंध आल्याशिवाय राहत नाही. या सिरीजमध्येही तिची ‘आर्ची’ म्हणून असलेल्या ओळखीची थोडी झलक प्रेक्षकांना पहायला मिळते. ‘नडेल त्याच्याशी भांडेन’ या स्वभावाची नेत्रा वागण्यात बेधडक असते. अगदी दारूच्या नशेत टॅक्सीचालकाला बेदम मारण्यापासून ते सुरक्षारक्षकांना चकवा देण्यासाठी उंच इमारतीच्या गच्चीवरून उडी मारण्याची धमकी देण्यापर्यंत कशालाही ती घाबरत नाही. त्यात समोर मृत्यू उभं ठाकलाच असल्यामुळे परिणामांची चिंता वगैरे तिला नसते. आपल्या रोगाबद्दल कळल्यापासून नोकरीला नियमित जाणही तिने सोडलेलं असतं. तर दुसरीकडे सतत वरिष्ठांचा दबाव, वाट्याला येणारी छोटीमोठी कामं यामुळे सौम्याकडेसुद्धा ही संधी म्हणजे करो या मरो सारखीच असते. फक्त आपल्या निवडक, विश्वासू पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन नेत्रा आणि मॅडी या दोन माहितीगारांच्या मदतीने एखादी मोठी केस सोडवायची आणि वरिष्ठांच्या नजरेत यायचं इतकचं तिचं लक्ष्य असतं. पण या धडपडीमध्ये नैतिक किंवा अनैतिक असे कुठलेही मार्ग स्वीकारायची तिची तयारी असते. या दोघींही आपल्या आयुष्याच्या अशा पायरीवर असतात, जिथून त्यांना आजुबाजूचे सगळेच रस्ते बंद दिसत असतात. त्यामुळे समोर दिसणाऱ्या वाटेवर जीवाच्या आकांताने उडी मारण्याची तयारी यांची असते. या दोघींचं आयुष्य भिन्न असलं तरी या समान दुव्यामुळे ते एकतर येतात आणि सिरीजमध्ये करामती घडतात.
सिरीजच कथानक प्रेक्षकांना बऱ्यापैकी गुंतवून ठेवत, पण काही ठिकाणी कथानकाचा वेग मंदावतो आणि बरीचशी प्रश्ने अनुत्तरीत राहतात. अंशुमनला सौम्याचा राग असण्याचं निश्चित कारण सिरीजमध्ये स्पष्ट होतचं नाही. तो स्त्रीव्देष्टी असल्याचं सौम्याच्या तोंडून येतं पण तिच्या आजूबाजूस अशाच परिस्थितीतून जाणार इतर कोणतही स्त्री पोलीस पात्र नसल्यामुळे असेल, हे कारण फारसं पटत नाही. प्रवीणने तिच्या समस्यांवर थंड प्रतिक्रिया देणंसुद्धा याचं कारणामुळे खटकत राहतं. काही प्रसंगांमध्ये नेत्रा आणि सौम्या आमनेसामने आल्यावर त्यांच्यातील संवाद आणि चेहऱ्यावरील भाव गोंधळात टाकणारे आहेत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर घरातल्यांना स्वावलंबी करून त्यांच्या पुढच्या आयुष्याची तजवीज करण्यापेक्षा त्यांना वाऱ्यावर सोडणे, आपल्या प्रियकराला आपल्याभोवती घुटमळत ठेवणे, वडिल आणि बॉसची जोडी जुळवायचा प्रयत्न करणे अशा काही प्रसंगातून नेत्राच्या वागण्याचा नीट संबंध लागत नाही. हा गोंधळ कदाचित जेमतेम आठ भागांची सिरीज दिग्दर्शित करण्यासाठी चार दिग्दर्शकांचा लागलेला हातभार हे कारणही असू शकत. पण या प्रकारामुळे सिरीजच्या कथानकाची लय तुटते आणि ती परत बांधायला बराच कालावधी जावा लागतो. पण नेत्राचं मरण शंभर दिवसांवर आल्याचं अधोरेखित झाल्यामुळे सिरीज पहिल्याच पर्वात आटोपली जाणार या आशेत असलेल्या प्रेक्षकाला शेवटच्या क्षणी आश्चर्याचा धक्का मिळतो आणि तेव्हा खरतर तर कथानकाची उत्सुकता शिगेला पोहचते. पण तो धक्का सिरीजच्या मध्यंतराला आला असता तर कदाचित त्याने वेगळाच परिणाम साधता आला असता, अशी चुकचुक पण मनाला लागून राहते. लारा दत्ताला बऱ्याच कालावधीने एका ताकदीच्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. रिंकुला पुन्हा तिच्या ठरलेल्या साच्याच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षक किती उत्सुक असतील हा प्रश्न असला, तरी तिने इथे नेत्रा आणि आर्ची यांच्यामध्ये फरक दाखविण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. या दोघीसोबत सिरीजमधील अजून काही पात्र आणि त्यांचे उद्देश स्पष्ट होण्यासाठी दुसऱ्या पर्वाची वाट पाहणे गरजेचे ठरते.