“मी दुसरी नर्गीस तयार करेन!” असं दिग्दर्शक मेहबूब का म्हणाले?
निर्माता दिग्दर्शक मेहबूब यांनी १९४३ साली अभिनेत्री नर्गिस(Nargis)ला ‘तकदीर’ या चित्रपटापासून हिंदी सिनेमाच्या दुनियेत आणले. त्यानंतर ‘हुमायून’, ‘अंदाज’ या चित्रपटाची नायिका नर्गीसच होती. त्या अर्थाने मेहबूब तिचे सिनेमातील गॉडफादर होते. १९५० साली त्यांनी भारतातील पहिल्या टेक्निकलर सिनेमाची ‘आन’ची सुरुवात केली. हा सिनेमा मोठ्या स्केलवर बनणार होता. चित्रपटाचा नायक दिलीप कुमार होता आणि नायिका म्हणून त्यांनी त्यांची आवडती अभिनेत्री नर्गिसची निवड केली. चित्रपटाचा शेड्युल ठरले.
परंतु नर्गीस मात्र पहिल्या दिवसापासूनच शूटिंगला यायला एक तर उशीर करू लागली किंवा शूटिंगला येणेच कॅन्सल करू लागली! त्यामुळे मेहबूब यांच्या या ड्रीम प्रोजेक्ट सिनेमाच्या निर्मितीमध्ये अडथळे येऊ लागले. नर्गिस (Nargis) त्याच काळात आर के फिल्म्सच्या ‘आवारा’ या चित्रपटाची शूटिंग करत होती. दोन दोन चित्रपटाची शूटिंग एकाच वेळी चालू असल्यामुळे सहाजिकच तिला यायला उशीर होत होता. परंतु मेहबूब यांना ही बाब आतल्या आत सारखी खटकत होती त्यांनी एका दिवशी मात्र सोक्षमोक्ष करायचे ठरवले.
त्यांनी नर्गिसला विचारले, ”तुला आता निर्णय घ्यावाच लागेल. एक तर तुला माझा चित्रपट सोडावा लागेल किंवा राज कपूरचा चित्रपट सोडावा लागेल!” मेहबूब यांना असं वाटत होतं की नर्गिस आर के फिल्म्सचा ‘आवारा’ चित्रपट सोडेल कारण मेहबूब यांनी दिला ‘तकदीर’ या चित्रपटातून पहिला ब्रेक दिला होता आणि तिथूनच तिचा हिंदी सिनेमाच्या दुनियेत प्रवेश झाला होता. परंतु झालं उलटच! तिने मेहबूब यांचा ‘आन’ हा चित्रपट सोडला आणि आर के फिल्म्सचा ‘आवारा‘ हा चित्रपट कंटिन्यू केला. याचे कारण आर के फिल्म्स आणि राजकपूरमध्ये तिची इन्व्हॉलमेंट वाढली होती!
दिग्दर्शक मेहबूब यांना हा खूप मोठा धक्का होता. ते आणि त्यांची पत्नी सरदार अख्तर त्या रात्री झोपू शकले नाही. जिला आपण पहिला ब्रेक दिला त्या नर्गीसकडून त्यांना अशी ट्रीटमेंट अनपेक्षित होती. रात्रभर ते तळमळत राहिले. ‘आन’ सिनेमाची मोठी इन्व्हेस्टमेंट होती. भावूक होणं परवडणारे नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी मनाशी विचार केला, ”मी मेहबूब आहे. कुणी लेचा पेचा निर्माता दिग्दर्शक नाही. एक नर्गीस गेली तर काय? मी दुसरी नर्गीस (Nargis) तयार करेन.” असा ठाम निश्चय करून त्यांनी दुसऱ्या नव्या नायिकेचा शोध सुरु केला. त्यांना आता दुप्पट काम करायचे होते.
==========
हे देखील वाचा : ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है…’
==========
नायिकेचा शोध सुरु झाला आणि त्यांना सापडली मुंबईतील एक ज्यू मुलगी नादीरा! तिची स्क्रीन टेस्ट घेतली आणि ‘आन’ या चित्रपटाची नायिका बनवले आणि तिला दुसरी नर्गिस बनवण्याचा विडा उचलला. चित्रपटात नादिराने मोठा डॅशिंग रोल केला होता. लोकांना ती आवडली. सिनेमा देखील हिट ठरला. ‘आन’ सिनेमाला नौशाद यांचे संगीत होते. यातली गाणी अफाट गाजली.
‘मान मेरा अहसान अरे नादान के मैने तुझसे किया है प्यार’, ‘दिल में छुपा के प्यार का तुफान ले चले’,’ मुहोब्बत चुमे जिनके हाथ’,’तुझे खो दिया हमने’,’आज मेरे मन में सखी बांसुरी’,’खेलो रंग हमारे संग आज दिन रंग रंगीला’ हि आणि इतर गाणी अफाट गाजली. नादिरा मात्र यशाचे सातत्य मात्र ती टिकवू शकली नाही. दुसरी नर्गिस काय ती नायिका म्हणून देखील फारशी यशस्वी होऊ शकली नाही. तिकडे राज कपूर आणि नर्गिस यांची जोडी लोकप्रियतेच्या शिखरावर होती पण त्याला देखील ग्रहण लागले. ‘जागते राहो’ (१९६६) नंतर ते दोघे विभक्त झाले.
त्यानंतर पुन्हा नर्गिस(Nargis)ला आपल्या गॉडफादर मेहबूब यांची आठवण झाली. मेहबूब यांनी देखील जुन्या कटू आठवणी विसरून तिला घेऊन एक महत्त्वकांक्षी सिनेमा तयार केला ‘मदर इंडिया’. जो नर्गीसच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला! अर्थात ‘आन‘ मधील भूमिका नादिराच्या व्यक्तीमत्वाला साजेशी होती. काहीशी टॉमबॉईश तिखट पुरुषी सौंदर्य असलेली नादिरा त्या भूमिकेसाठी फिट्ट होती. पुढे अनेक वर्षांनी अमिताभचा ‘मर्द’ हा सिनेमा आला होता. ‘मर्द’चे कथानक असेच होते. त्यात अमृता सिंग नायिका होती. अभिनेत्री ‘नर्गीस’ला ‘आन’ची भूमिका झेपली असती का शंकाच आहे!