‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
श्रुती: प्रेमातील ‘स्वातंत्र्यभाव’ जाणणारी प्रेयसी
२०१२ ला आलेला अनुराग बासू दिग्दर्शित ‘बर्फी!’ हा अनुरागसोबतच त्यातील कलाकार म्हणजे रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा आणि इलियाना डिक्रुझसाठी महत्त्वाचा चित्रपट ठरला. या चित्रपटात रणबीर ‘मर्फी’ (या शब्दाचा उच्चार मर्फी कायमच ‘बर्फी’ असा करत असल्याने लोक त्याला त्याच नावाने ओळखू लागतात!) या मूकबधीर तरुणाच्या भूमिकेत दिसला होता तर प्रियांकाने झिलमिल नावाच्या स्वमग्न मुलीची भूमिका साकारली होती. तेलूगु आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या इलियानाचा हा बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट होता. भारताकडून ऑस्करसाठी पाठवल्या गेलेल्या या चित्रपटात इलियानाने श्रुती घोष या बंगाली तरुणीची भूमिका साकारली होती. श्रुती, बर्फी आणि झिलमिल या अनोख्या प्रेमत्रिकोणाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
फिल्म सुरु झाल्यावर दार्जिलिंगच्या ‘मुस्कान’मध्ये अंथरुणाला खिळून असलेला म्हातारा बर्फी आपला फोटो काढण्यासाठी धडपडताना दिसतो. हा फोटो त्याला कोलकात्याला असलेल्या श्रुतीला पाठवायचा असल्याने तो परफेक्ट फोटो काढायचा प्रयत्न करतो पण ती संधी थोडक्यात हुकते. पुन्हा कॅमेरा अॅडजस्ट करायला जाताना बर्फी अडखळून पडतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं. बर्फीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी कळताच श्रुतीसकट त्याचे सर्व निकटवर्तीय दार्जिलिंगला पोहोचतात आणि मग उर्वरित कथा श्रुती आणि इतर पात्रे सांगत असलेल्या बर्फीच्या आठवणींमधून पुढे सरकत राहते.
वडिलांच्या बदलीमुळे बंगालहून दार्जिलिंगला आलेल्या श्रुतीला सर्वात आधी दिसतो तो, बर्फी! कारच्या मागच्या सीटवरूनच ती बर्फीच्या माकडचेष्टा एन्जॉय करते. त्यानंतर काही दिवसांनी ट्रेनमध्ये बर्फी तिला पाहतो आणि पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडतो. बर्फी तिला खाणाखुणा करून त्याच्या प्रेमाची आणि व्यंगाची जाणीव करून देतो, मात्र श्रुती आपण रणजीतसोबत एंगेज्ड असल्याचं सांगून त्याचा प्रस्ताव टाळते. पण तरीही निराश न होता, बर्फी तिच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवतो आणि तिला हसतहसत तो स्वीकारायलाही भाग पाडतो. बर्फीशी मैत्री केल्यानंतर अचानकच तिला रणजीतपासून मोकळीक मिळाल्यासारखं वाटू लागतं. रणजीतसोबतच्या नात्यातील बंधनापेक्षा तिला बर्फीसोबतची स्वच्छंदी मैत्री महत्त्वाची वाटू लागते.
आपला जोडीदार बनू पाहणारी व्यक्ती आपल्या व्यंगामुळे आयुष्यभराची साथ देऊ शकेल की नाही, यासाठी बर्फी (Barfi) नेहमीच त्या व्यक्तीची त्याच्या पद्धतीने सत्वपरीक्षा घेतो. त्यासाठी तो पथदिव्याचा खांब विशिष्ट पद्धतीने कापतो आणि तो ठराविक ठिकाणी पडेल असं बघून जोडीदाराच्या हातात हात घालून त्या ठिकाणापासून एक पाऊल लांब उभा राहतो. अंगावर पडणारा खांब बघताना हात सोडून जीवाच्या भीतीने मागे सरकणारे बर्फीच्या दृष्टीने पळपुटे ठरतात. श्रुतीही घाबरून त्याचा हात सोडते आणि तिथून जाऊ लागते पण बर्फी मिनतवाऱ्या करून तिला अडवतो. एव्हाना श्रुतीच्या मनातही बर्फीसाठी प्रेम फुलू लागतं. एकेदिवशी फिरायला गेल्यावर अगदी सहजच बर्फी तिच्या बोटातील एंगेजमेंट रिंग काढून घेतो आणि गवताच्या पात्याची अंगठी तिच्या बोटात घालून तिला पुन्हा एकदा प्रपोज करतो. यावेळी मात्र श्रुती स्वतःला न रोखता बर्फीला किस करून आपल्या प्रेमाची पावती देते.
श्रुतीच्या आईला हे कळाल्यावर ती श्रुतीला स्वतःच्या प्रेमप्रकरणाचं उदाहरण देते. भावनिकता आणि व्यावहारिकता यांतील फरक श्रुतीला समजावून ती श्रुतीला रणजीतशी ठरलेलं लग्न न मोडण्याचा सल्ला देते आणि बर्फीची अवस्था पाहता श्रुतीलाही तो सल्ला पटतो. इकडे श्रुती आपल्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कार झालेला बर्फी श्रुतीला मागणी घालायला तिच्या घरी जातो पण तिथे रणजीतला पाहून त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. अपेक्षाभंग झालेला बर्फी खाणाखुणांनीच पावसापासून वाचण्यासाठी छत्रीत उभ्या असलेल्या श्रुतीला सुनावतो आणि तिला पश्चातापाने भरलेल्या अश्रूंच्या पावसात भिजवून तिथून निघून जातो.
लग्न झाल्यावर बंगालमध्ये स्थायिक झालेल्या श्रुतीला दार्जिलिंगमधील स्वातंत्र्य अधिकच खुणावू लागतं. रणजीतसोबत ती सर्व सुखांचा उपभोग घेत असतानाही तिला त्यातील प्रेमाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. एखाद्या आदर्श भारतीय पत्नीसारखी रणजीतसाठी सर्व कर्तव्ये पार पाडूनही कळत-नकळत तिच्या पदरी उपेक्षाच येते. अश्यातच सहा वर्षांनी तिला पुन्हा एकदा बर्फी भेटतो आणि तिचं मन भूतकाळाकडे ओढ घेऊ लागतं. यावेळी बर्फी एकटा नसून त्याच्यासोबत झिलमिल आहे, हे कळल्यावर ती थोडीशी दुखावते पण त्या दोघांमधील प्रेम पाहून तिला बर्फी खुश असल्याचं समाधानही वाटतं. अश्यातच झिलमिल गायब होते आणि काही दिवसांतच तिच्या खुनाचा आळ बर्फीवर येतो पण इन्स्पेक्टर दत्तांच्या सांगण्यावरून श्रुती बर्फीला पोलीस कस्टडीत अडकू न देता कलकत्त्याला परत घेऊन येते. झिलमिल हरवल्यानंतर सैरभैर झालेल्या, पुन्हा एकटा पडलेल्या बर्फीला आता हातून जाऊ द्यायचं नाही, असा निर्धार करून ती तिच्या वैवाहिक जीवनाचा त्याग करून बर्फीच्या आयुष्यात परतते. त्याला आपलं सर्वस्व मानून त्याची सेवाही करू लागते. बर्फी अजूनही झिलमिलला विसरला नसून, तो कधीही तिच्याकडे परतू शकतो हे माहित असूनही ती त्या क्षणिक सुखासाठी बर्फीसोबतच राहण्याचा निर्णय घेते.
अचानक एकेदिवशी झिलमिल ‘मुस्कान’मध्ये असल्याचा अंदाज बर्फी वर्तवतो आणि श्रुती बर्फीला घेऊन पुन्हा दार्जिलिंगला येते. ‘मुस्कान’मध्ये गेल्यावर बर्फी झिलमिलला शोधण्यासाठी बरीच धडपड करतो पण झिलमिल न दिसल्याने दोघेही परतू लागतात. बर्फी आता तरी झिलमिलला विसरेल, असा विचार श्रुतीच्या मनात पिंगा घालू लागतो. तितक्यात मागून झिलमिल बर्फीला मारत असलेल्या हाका तिच्या कानावर पडतात आणि तिची घालमेल सुरु होते. ज्या व्यंगासाठी पूर्वी बर्फीला नाकारलं होतं, त्याच व्यंगाचा फायदा उचलून बर्फीला आपल्या आयुष्यात परतायला भाग पाडायची संधी तिच्यासमोर उभी राहते. पण यावेळी श्रुती बर्फीला कसल्याही पाशात गुंतून न ठेवता त्याला स्वतंत्र करायचं ठरवते आणि मागे वळून बर्फीला झिलमिलच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. संपूर्ण चित्रपटात प्रेक्षकांना आपल्याभोवती खिळवून ठेवणाऱ्या बर्फी आणि झिलमिलपेक्षा श्रुती इथे कैकपटीने उजवी ठरते.
‘बर्फी’ जितका रणबीर (Ranbir Kapoor) आणि प्रियांकाचा (Priyanka Chopra) आहे, त्याहूनही जास्त तो इलियानाचा (Ileana D’Cruz) आहे. या चित्रपटात तिच्या आधीच्या तमिळ आणि तेलूगु चित्रपटांसारखं कसलंही अंगप्रदर्शन न करता ती नितांतसुंदर दिसली आहे. भावनिक प्रसंगांतही संयत अभिनयाच्या आणि नेमक्या एक्स्प्रेशन्सच्या जोरावर ती नजरेत भरते. खरंतर या भूमिकेसाठी आधी कतरिनाला विचारणा करण्यात आली होती पण त्यावेळी अभिनयाची बोंब असलेल्या या ग्लॅमडॉलने श्रुतीचं पात्र साकारायला नकार देऊन प्रेक्षकांवर जणू उपकारच केले आणि यानिमित्ताने इलियानाच्या अभिनयसामर्थ्याचा जलवा प्रेक्षकांना अनुभवता आला.
अबोल बर्फीच्या प्रेमाची भाषा समजणारी श्रुती, दार्जिलिंगच्या स्टेशनवर बर्फीला न गमावण्यासाठी पळत जाऊन ट्रेन पकडणारी श्रुती, आईच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराची तुलना बर्फीसोबत करणारी श्रुती, सासरच्या प्रतिष्ठेचा विचार न करता वेळी-अवेळी बर्फीसाठी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढणारी श्रुती, हाताशी आलेल्या बर्फीला पुन्हापुन्हा गमावताना हतबल होणारी श्रुती, झिलमिल आणि तिच्यासोबत असलेल्या बर्फीच्या प्रत्येक फोटोतून झिलमिलला सोयीस्कररित्या वगळून कपल फोटोफ्रेम बनवणारी श्रुती, स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता आपल्या प्रेमाच्या पिंजऱ्यातून बर्फीला स्वतंत्र करणारी श्रुती… इलियानाने खऱ्या अर्थाने श्रुतीच्या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळवून दिला.
=====
हे देखील वाचा: प्रियांका चोप्रा हिच्या प्रवासातील काही दुर्मिळ फोटोज खास या फोटो स्टोरीमधून
=====