‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
रोहीत शेट्टी: मनोरंजनाचे महत्त्व अबाधित ठेवणारा दिग्दर्शक
रोहीत शेट्टी… (Rohit Shetty) ‘फायटर शेट्टी’ या नावाने बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेले स्टंटमॅन मुद्दू शेट्टी आणि ज्युनिअर आर्टिस्ट रत्ना शेट्टी यांचं हे पुत्ररत्न. लहान असतांना वडिलांसोबत ‘शालिमार’सारख्या चित्रपटांच्या सेट्सवर जाणं त्याला आवडायचं. पुढे रोहीत ८ वर्षांचा असतांनाच वडीलांचं छत्र हरपलं आणि शेट्टी कुटुंबाचे दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे रत्नाजी, रोहीत आणि त्याच्या तिन्ही मोठ्या बहिणींना घेऊन सांताक्रूझहून दहिसरला, आपल्या माहेरी शिफ्ट झाल्या. अभ्यासात विशेष रस नसलेल्या रोहीतने कसंबसं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि कॉलेजचा नाद कायमचाच सोडला.
१५ वर्षांचा झाल्यावर रोहीतने घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्याने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगत्या दुनियेत नशीब आजमवायचं ठरवलं. त्याची मोठी बहिण चंदा ही दिग्दर्शक राहुल रवैलसोबत सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करत होती. रवैलसोबत दिग्दर्शक कुकू कोहली यांची असलेली मैत्री पाहून रोहीतने चंदाकडे कोहलींच्या युनिटमध्ये काम मिळवून देण्यासाठी लकडा लावला. रोहीतचं कोवळं वय पाहून कोहलींनी त्यावेळी त्याला नकार दिला पण रोहीत हार न मानता नित्यनेमाने त्यांना भेटून कामासाठी गळ घालत राहिला. दीड वर्षं विचारविनिमय केल्यानंतर शेवटी कोहलींनी रोहीतला त्याची चिकाटी बघून इंटर्न म्हणून कामावर घेतलं. त्यावेळी इंटर्न्सना पगाराऐवजी फक्त प्रवास भत्ता मिळत असे आणि रोहीतला दिवसाला ३० रुपयांच्या प्रवास भत्त्यावर ही नोकरी स्वीकारावी लागली. मिळालेले पैसे घरातच खर्च व्हावेत यासाठी रोहीत दररोज मालाड ते अंधेरी (नटराज स्टुडीओ) पायी प्रवास करत असे.
कठोर मेहनतीच्या जोरावर रोहीतने अल्पावधीतच इंटर्न ते सहाय्यक दिग्दर्शक अशी मजल मारली आणि कोहलींसोबत ‘फूल और काँटे’, ‘सुहाग’, ‘हकीकत’, ‘जुल्मी’ अश्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. इतकंच नव्हे तर त्याने ‘हकीकत’च्या सेटवर तब्बूच्या साड्यांना इस्त्री करायचं कामही स्वीकारलं होतं तर अक्षय कुमारसाठी (Akshay Kumar) ‘सुहाग’मध्ये बॉडी डबल म्हणूनही काम केलं होतं. त्यादरम्यान, त्याची अजय देवगणशी (Ajay Devgan) चांगलीच जवळीक निर्माण झाली, जी आजतागायत कायम आहे. पुढे त्याने अजयच्या ‘प्यार तो होना ही था’, ‘हिंदुस्थान कि कसम’ आणि ‘राजूचाचा’, या चित्रपटांसाठीही सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. ‘प्यार तो होना ही था’च्या वेळी रोहीतने काजोलच्या केशरचनेचीही जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती.
एव्हाना, आपणही सिनेमा दिग्दर्शित करू शकतो, हा आत्मविश्वास रोहीतच्या मनात फुलू लागला. तशी इच्छा त्याने अजयकडे बोलून दाखवताच अजयनेही त्याला प्रोत्साहन दिले आणि २००३च्या ‘जमीन’मधून रोहीत त्याचं दिग्दर्शकीय पदार्पण करता झाला. इंडियन एरलाइन्सच्या आयसी ८१४ विमानाच्या अपहरणावर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा सुपर्ण वर्मा यांनी लिहिली होती व अजय देवगण, अभिषेक बच्चन आणि बिपाशा बासू यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. कालांतराने प्रसिद्धी मिळवलेला हा ॲक्शन थ्रिलर त्यावेळी बॉक्स ऑफिसवर मात्र चांगली कमाई करू शकला नाही आणि यामुळे रोहीत निराशेच्या गर्तेत अडकला.
त्याच सुमारास दिग्दर्शक नीरज व्होरा रोहीतकडे ‘अफलातून’ या गुजराती नाटकाची कथा घेऊन आला आणि रोहीतने या कथेवर सिनेमा बनवावा असं त्याने सुचवलं. ॲक्शन जॉनरमध्ये विशेष रस असलेल्या रोहीतने सुरुवातीला या प्रस्तावासाठी नकार दिला पण अजयने हा प्रस्ताव ऐकल्यानंतर त्यात काम करायची तयारी दर्शवल्यावर तोही हा कॉमेडी जॉनर हाताळण्यासाठी तयार झाला आणि अश्या तऱ्हेने सुपरहिट ‘गोलमाल’ सिरीजचा पहिला चित्रपट, ‘गोलमाल: फन अनलिमिटेड’ २००६मध्ये पूर्णत्वास आला. या चित्रपटाच्या जबरदस्त यशाने रोहीतचं नशीब रातोरात बदलून गेलं आणि त्याच्या नावावर त्याचा पहिला सुपरहिट सिनेमा लागला. त्यानंतर जानेवारी २००८मध्ये त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘संडे’ने बॉक्स ऑफिसवर ठीकठाकच कमाई केली. ‘अनुकोकुंदा ओका रोजू’ या मूळ तेलुगू थरारक रहस्यपटाला रोहीतने ‘संडे’च्या स्वरुपात विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला.
पण यावेळी खचून न जाता त्याने त्याच्या पुढच्या फिल्मवर, ‘गोलमाल रिटर्न्स’वर लक्ष केंद्रित केलं आणि ऑक्टोबर २००८मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर तुफान यश कमावलं. मराठी चित्रपट ‘फेकाफेकी’ आणि राजेंद्र भाटीया दिग्दर्शित ‘आज कि ताजा खबर’ चा रिमेक असलेला हा चित्रपट गोलमाल सिरीजचा दुसरा चित्रपट ठरला. त्यानंतर वर्षभराने रिलीज झालेला ‘ऑल द बेस्ट: फन बिगिन्स’ हा चित्रपट ‘गोलमाल’इतकी कमाई करण्यात अपयशी ठरला असला, तरी समीक्षकांनी मात्र याला सकारात्मक प्रतिसाद दिला. पण आता प्रेक्षकांसोबतच रोहीतलाही ‘गोलमाल’चीच भुरळ पडली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून नोव्हेंबर २०१० मध्ये ‘गोलमाल 3’ हा ‘गोलमाल’ सिरीजमधला तिसरा चित्रपट रिलीज केला गेला. ‘गोलमाल’ सिरीजची तीच पात्रे आणि तेच विनोद असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना लोटपोट करून हसवण्यात आणि बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवण्यात यशस्वी ठरला.
एकापाठोपाठ एक विनोदी चित्रपट बनवणाऱ्या रोहीतला आता मात्र हे चित्र कुठंतरी थांबावं असं वाटू लागलं कारण विनोदी ढंगाचे चित्रपट करावेत, असा त्याचा मानस कधीच नव्हता. करिअरच्या सुरुवातीपासूनच त्याचा ओढा कायमच मारधाडपटांकडे राहिला होता. गोलमालसारखे विनोदी ढंगाचे, सहजसोपे चित्रपट बनवून आपण ह्या चित्रपटसृष्टीत रोज नव्याने उभ्या राहणाऱ्या आव्हानांपासून दूर तर पळत नाहीय ना? असे एक ना दोन प्रश्न त्याला सतावू लागले.
त्याची ही घालमेल अजयने समजून घेतली आणि त्याला त्याच्याकडे असलेल्या ॲक्शन फिल्म्सच्या स्क्रिप्टबद्दल विचारलं. त्यावेळी रोहीतने ‘सिंगम’ या २०१०च्या गाजलेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक करायचं ठरवलं आणि अजय देवगणलाच प्रमुख भूमिकेत घेऊन जुलै २०११मध्ये ‘सिंघम’ बनवला, जो ‘शेट्टी कॉप युनिव्हर्स’चा पहिला चित्रपट ठरला. पुढे २०१४मध्ये ‘सिंघम रिटर्न्स’ आणि डिसेंबर २०१८मध्ये रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘सिम्बा’ हे दोन चित्रपट दिग्दर्शित करून रोहीतने त्याच्या ब्लॉकबस्टर कॉप युनिव्हर्सचा विस्तार केला.
मध्यंतरी त्याने शाहरुखला मुख्य नायकाच्या भूमिकेत ठेवून दीपिका पदुकोनसोबत ‘चेन्नई एक्सप्रेस’ (२०१३) आणि काजोलसोबत ‘दिलवाले’ (२०१५) या दोन सुपरहिट चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले. शाहरुख-काजोलच्या एव्हरग्रीन ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ला ट्रिब्युट म्हणून बनवला गेलेला ‘दिलवाले’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकला नसला, तरी बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने तो सुपरहिट ठरला. ॲक्शन जॉनर समर्थपणे हाताळत असतानाच रोहीतने ‘बोलबच्चन’ (२०१२) आणि ‘गोलमाल अगेन’ (२०१७) हा ‘गोलमाल’ सिरीजमधला हॉरर कॉमेडी कथानक असलेला चौथा सिनेमाही दिग्दर्शित केला. विनोदी ढंगाच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं. आता २०२१ मध्ये रोहीतने दिग्दर्शित केलेल्या २ नव्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असून त्यात ‘सूर्यवंशी’ या ‘शेट्टी कॉप युनिव्हर्स’च्या चौथ्या चित्रपटाचा आणि ‘सर्कस’ या कॉमेडी जॉनरच्या चित्रपटाचा समावेश आहे.
हे देखील वाचा: ‘चेन्नई एक्सप्रेस’ हे नाव का ठरवण्यात आलं? चित्रपटाच्या नावामागे हि आहे कथा
कधीकाळी घरखर्चासाठी प्रवासभत्त्याचे मिळणारे ३० रुपये वाचवून तंगडतोड करणारा रोहीत आज ३०० कोटींचे सिनेमे लीलया बनवताना दिसत आहे.
ज्या तब्बूच्या साड्या इस्त्री करण्याचं काम त्याने हाती घेतलं होतं, आज तीच तब्बू त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘गोलमाल अगेन’मध्ये झळकते, काजोलची केशरचना सांभाळणारा स्पॉटबॉय आज तिलाच ‘दिलवाले’मध्ये दिग्दर्शित करत आहे, हे दिवास्वप्न सत्यात साकारण्यासाठी रोहीतने घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे.
‘एंटरटेन्मेंट! एंटरटेन्मेंट!! एंटरटेन्मेंट!!!’ या उक्तीला जागणारे चित्रपट, जे केवळ प्रेक्षकांच्या दोन तासांच्या करमणूकीसाठीच बनवले गेलेले असतात, ज्यांना फक्त आणि फक्त कमर्शियल सिनेमाचा दर्जा मिळतो, असे चित्रपट बनवूनही बॉलीवूडच्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये रोहीतने मानाचं स्थान मिळवलेलं आहे. राखेतून झेप घेणाऱ्या बॉलीवूडच्या या फिनिक्स पक्ष्याला कलाकृती मिडीयाचा सलाम आणि वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! ‘मनोरंजन क्षेत्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटसृष्टीतील मनोरंजनाचे महत्त्व अधोरेखित करणारे सिनेमे त्याच्याकडून नित्यनेमाने येत राहोत, हीच सदिच्छा!!