लोकसंस्कृती हे महाराष्ट्राचे विचारधन…. नंदेश उमप
आपल्या महाराष्ट्राची संपन्न अशी लोककला आहे. ही लोककला म्हणजे आपल्या प्रत्येकाची संस्कृती, परंपरा आहे. या संस्कृतीला अनेक कलाकारांनी आपल्या योगदानातून संपन्न केले आहे. या कलाकारांमध्ये अग्रेसर होते ते विठ्ठल उमप… काय माणूस होता हा… त्यांचा आवाज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आवाज… लोककलेचा असा कोणताही प्रांत नव्हता की जिथे विठ्ठल उमप नव्हते. पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळ या सर्व महाराष्ट्रातील लोककलांना त्यांनी उभारी दिली. त्यांचे जांभूळ आख्यान पाहिले नाही असा माणूस शोधून सापडणार नाही… एवढी प्रसिद्धी झाली होती. हाच समृद्ध वारसा जपला तो त्यांचे चिरंजीव नंदेश उमप यांनी….
नंदेश यांनी आपल्या वडीलांचा वारसा समृद्धपणे जोपासला आहेच शिवाय आपल्या अभ्यासूवृत्तीने नवीन पिढीपर्यंत हा वारसा पोहचवण्याचे कामही केले आहे. आपल्या या लोकसंगीताचा… लोकसंस्कृतीचा त्यांना अभिमान आहे. नंदेश सांगतात, जेव्हा जेव्हा कलेच्या प्रांतात काही वेगळं हवं असतं तेव्हा लोककलेनं आपल्याला तारलं आहे. आपली लोकसंस्कृती म्हणजे एक विचार आहे. लोकसंस्कृती हे महाराष्ट्राचे विचारधन आहे. महाराष्ट्राच्या सुखात-दुःखात लोककला साथ देते. कलेच्या माध्यमातून किंवा प्रबोधनाच्या माध्यमातून ही लोककला आणि लोकसंस्कृती जनतेला चैतन्य देते. लोकांना उमेद देण्याचं काम, संजवनी देण्याचं काम ही लोककला गेली अनेक वर्ष करीत आली आहे. आणि पुढेही करत राहील, असा विश्वास नंदेश यांनी व्यक्त केला.
जय जय महाराष्ट्र माझा या सोनी मराठी चॅनेलवरील कार्यक्रमात महाराष्ट्रातील सगळ्या लोककलांना उजाळा देण्यात आला. नंदेश यांचाही यात समावेश होता. या कार्यक्रमात सगळे सण साजरे झाले… सगळ्या कलांना सादर करण्यात आलं. तसेच आपल्या भूमितील थोरांचा सन्मान करण्यात आला. त्यांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमातून लोककला नवीन पिढीपर्यंत अधिक चांगल्यारितीने पोहचली गेली, असं नंदेश सांगतात.
लोककला ही सतत नव्याने शिकण्याची कला आहे. तिचा कायम अभ्यास करावा लागतो. आपल्याला गाता आलं की झालं, येवढं ते सोप्प नसतं. रोज नव्या हरकतींचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. या सर्वांकडे नवीन पिढीचं थोडं दुर्लक्ष होत असल्याचं नंदेश सांगतात. एखाद्या चॅनलवर दिसण्यापेक्षा आपला या क्षेत्रातील अभ्यास किती आहे, रियाज किती आहे, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नंदेश सांगतात. लोकसंगीताच्या क्षेत्रात नवीन पिढी येतेय, ही चांगली गोष्ट आहे. मात्र या पिढीचा कल सखोल अभ्यास करण्याकडे नाही. जेवढं येतं तेवढ्याचा अभ्यास होतो. त्याच्यापलिकडे जाण्याची उत्सुकता नसते. आपल्याला प्रसिद्धी मिळू शकते. लोकांच्या हद्यात स्थान मिळवण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं असतं. आजच्या पिढीची कला ही आळवावरच्या पाण्यासारखी होतेय की काय अशी भीती वाटत असल्याचे नंदेश यांनी सांगितले. आपली कला, संगीत किती काळ चिरंतन टिकेल याची काळजी घ्यायला हवी, असा सल्लाही नंदेश यांनी दिला आहे.
नंदेश सांगतात कलाकार म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी व्हाल. पण लोकांनी तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. आपला कुणीतरी आदर्श घेतला पाहिजे. आजच्या तरुणांकडे टॅलेंट खूप आहे. पण त्यात खूप कमीजणांना संधी मिळते. त्यातही त्या संधीचं सोनं कितीजण करतात आणि हे यश किती जणं टिकवून ठेवतात, हे नवीन कलाकारांनी नक्की बघायला हवं. त्याचप्रमाणे आपला संगीताचा, लोकसंगीताचा वारसा ज्या कलाकारांनी संपन्न केला आहे, त्या ज्येष्ठ कलाकारांच्या जीवनाचा अभ्सासही करण्याची गरज असल्याचे नंदेश सांगतात. या ज्येष्ठ कलाकरांनी कलेसाठी जे योगदान दिलं आहे, त्याचा मान हा राखलाच गेला पाहिजे. बऱ्याचवेळा त्यांची गाणी, गायची म्हणून गायली जातात. मात्र यासोबत त्या कलाकारांनी गाण्यासाठी किती मेहनत घेतली, याचा शोध घेतला तर नवीन कलाकारांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. नंदेश उमप पुढे सांगतात, आता मुलांना सर्व सुविधा मिळतात. संधीही चांगल्या मिळतात. त्यामुळे अगदी लहान गावातील मुलेही पुढे येतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण थोड्या यशावर या मुलांनी हुरळून न जाता आपला अभ्यास कायम ठेवला पाहिजे. सतत शिकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. तरच त्यांचा पाया भक्कम होईल असा सल्ला नंदेश यांनी दिला आहे.
सध्या लॉकडाऊनच्या काळात नंदेश आपला वेळ नवीन गाणी करण्यात आणि वाचनात घालवत आहेत. तसेच बॅक स्टेज आर्टीस्टसाठी त्यांनी एक मोहीम चालू केली आहे. सध्या या कलाकारांसाठी मदत गोळा करण्याचं काम चालू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक बॅकस्टेज कलाकारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार चालू झाली आहे. छोटे वादक, गायक, तंत्रज्ञ यांना दिवसाच्या हिशोबात पगार मिळतो. पण आता सर्वच बंद असल्यामुळे हे कलाकार संकंटात सापडले आहेत. या गरजू कलाकारांसाठी नंदेश, विठ्ठल उमप फांऊंडेशनच्या माध्यमातून मदत गोळा करीत आहेत. या फाऊंडेशनतर्फे कलाकारांना धान्यपुरवठा करण्याचे काम चालू आहे.
सई बने.