लग्न पाहावे जुळवून..
इंडियन मॅचमेकिंग: पारंपारिक लग्नजुळवणी प्रक्रियेचे छक्केपंजे
नेटफ्लिक्सवर भारतीय सिनेमांच्या गर्दीत थोडा फेरफटका मारला तर एका सिनेमा/माहितीपटावर नजर जाते. ‘द सुटेबल गर्ल’ नावाचा हा माहितीपट भारतातील तीन लग्नाळू मुली दीप्ती, अम्रिता आणि रितुच्याभोवती फिरतो. त्यापैकी रितू मुंबईत नोकरी करणारी, अर्थशास्त्र क्षेत्रात करियर करू पाहणारी तरुणी. मुलगी वयात आली आहे, त्यामुळे सहाजिकच घरच्यांना तिच्या लग्नाचे घोर लागलेले. त्यात रितूची आई स्वतः लग्नजुळवणी क्षेत्रात काम करणारी. कित्येक तरुण-तरुणींची लग्ने तिने स्वतः जुळवलेली असतात. मग अशावेळी घरात एक लग्नाळू मुलगी असूनही तिच्याकडे मात्र आई इक्ष देत नाही याबद्दल तिला सासूपासून ते सर्व नातेवाईकांची बोलणी खावी लागत आहेत. ‘डॉक्टर कसा स्वतःचा इलाज स्वतः करू शकत नाही, तसचं स्वतःच्या मुलीसाठी योग्य मुलगा शोधताना माझा गोंधळ उडतो. त्यामुळे मी इतरांना सांगते, तुम्हीच तिच्यासाठी कोणीतरी बघा,’ असं काहीतरी सांगून ती येणारी वेळ मारून नेत असते. तिथे रितूला मात्र आपल्या करीयरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिला लग्न करायचच नाही, असा विषय नाही, पण फक्त वय झालं, नातेवाईक मागे लागलेत म्हणून लग्न करण्यापेक्षा स्वतःला योग्य वाटेल आणि योग्य मुलगा मिळेल तेव्हा लग्न करायचं हा तिचा विचार असतो.
अशावेळी रितुच्या लग्नाचा विषय जीवनमरणासारखा कठीण ठेवणाऱ्या तिच्या आईवडिलांविषयी प्रेक्षक म्हणून बरेच प्रश्न उठतात. हेच प्रश्न ‘Hello, I am Sima Thapariya from Mumbai’ म्हणत इंडियन मॅचमेकिंगच्या पडद्यावर सीमा म्हणजेच रितूची आई स्वतःला भारतातील ‘अग्रगण्य’ लग्नजुळवणीकार असल्याची ओळख करून देते, तेव्हा अधिकच ठळक होत जातात. गेले काही दिवस समाजमाध्यमांवर ‘इंडियन मॅचमेकिंग’ ही नेटफ्लिक्सवरील सिरीज प्रचंड चर्चेत आहे. ‘लग्न’ हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो, हे सत्य असलं तरी भारतात लग्न हा फक्त दोन व्यक्तींचा नाही तर दोन कुटुंबांना जोडणारा धागा आहे हेही तितकच खरं आहे. त्यात भारतीय समाजात पारंपारिक लग्न जुळवणी प्रक्रिया किंवा ‘अरेंज मॅरेज’ची पध्दत पूर्वापार सुरु आहे. कांदेपोहे कार्यक्रमात मुलगा मुलगी आणि त्यांच्या कुटुंबाची भेट होते, काही प्रश्न विचारले जातात, मग होकार किंवा नकार कळवला जातो हा ठरलेला साचा. अगदी ८०-९०च्या दशकातील जाणत्या अनुभवांच्या शिदोरीत डोकवावं तर, ‘आमच्या काळात आम्हाला हो/नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच. घरातल्या मोठ्यांनी सांगितलं, मुलगा/मुलगी चांगली आहे की चढलो बोहल्यावर,’ हे संवाद नक्कीच ऐकायला मिळतात. आज यातील कित्येक सोहळे कॅफेतील वाफाळत्या कॉफी आणि सँडविचसोबत होतात.
मुलगा आणि मुलगी एकमेकांना पारखायला कित्येकदा भेटतात आणि मग आपला निर्णय सांगतात. साचा कुठलाही असो शेवटी तो या ‘लग्न जुळवणी’च्या साच्यात बसतो. ‘इंडियन मॅचमेकिंग’ नेमका हाच साचा नव्या स्वरुपात आपल्यासमोर मांडते. पण ही सिरीज खटकायला सुरवात होते जेव्हा मुळातच भारतीय समाजात दबा धरून बसलेले काही प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभे राहतात आणि आपल्याला अस्वस्थ करतात. मग कोणी या सिरीजला दांभिक म्हणत तर कोणी सीमाची खिल्ली उडवत. कोणी भारतीय समाज अजूनही कसा जुन्या विचारांमध्ये गुरफटलेला आहे याबद्दल उतारेच्या उतारे लिहतो, तर कोणी ‘आम्ही नाही त्यातले’ म्हणत हात झटकू पाहतो. पण कसंही करून ही सिरीज भारतीय मानसिकतेचा एक आरसा आहे, ही बाब अमान्य करायचा आटोकाट प्रयत्न करतो, पण हे शक्य नाही.
ह्युस्टनची अपर्णा, मुंबईचे अक्षय आणि प्रद्युमन, न्यू जर्सीची नादिया, ऑस्टीनचा व्यासर आणि दिल्लीची अंकिता यांना जोडणारा एक समान दुवा म्हणजे मुंबईस्थित सीमा थापरीया. आपापली लग्न जुळविण्यासाठी या सहाजणांनी सिमला संपर्क साधलेला असतो. त्यामुळे यांना त्यांच्या मनाजोगे जीवनसाथी मिळणार की नाही, सीमाचे त्यांच्याबाबतीतले निकष आणि तिची जोड्या जुळविण्याची पध्दत, हे सगळं आणि बरचं काही इंडियन मॅचमेकिंगमध्ये सामवलेल आहे. या सिरीजला ठराविक असं कथानक नाही. सीमा यातील प्रत्येकाला भेटते, त्यांच्या अपेक्षा आणि इच्छांची यादी बनवते आणि त्यानुसार त्यांची काही ठराविक उमेदवारांची भेट घडवते. त्यानंतर त्यांचं सुत जुळत की बिनसत हे पूर्णपणे त्यांच्या हातात असतं. दरम्यान सिरीजमधील पात्रे भारतीय असली तरी भारतीय रहिवासी आणि अनिवासी भारतीय या दोन्ही गटातील असल्यामुळे सिरीजची व्याप्ती वाढते. प्रत्येकाचे प्रश्न, त्यांच्यावर सीमाची मतं यामध्ये वैविध्य पहायला मिळत. या प्रक्रियेबद्दल अनेकांनी नोंदविलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यास हे वैविध्य प्रकर्षाने दिसत आणि त्यातूनच भारतीय लग्नसंस्थेच आजचं थोडफार चित्र उभं राहत.
त्यामध्ये एकीकडे आपल्या अपेक्षांच्या चौकटीत बसणारा जोडीदार हवा या हट्टाची अपर्णा सीमासाठी हेकेखोर आणि डोकेदुखी ठरते तर अशाच अपेक्षांच्यापोटी १००-१५० मुलींची प्रोफाईल्स नाकारणारा प्रदयुमन मात्र पारखी ठरतो. ‘आईसारखीच बायको हवी’ या मताचा अक्षय आदर्श ठरतो, तर आपल करीयर आणि मतं यांचा सन्मान करेल असं जोडीदार शोधणारी अंकिता अति’मॉडर्न’ ठरते. घटस्फोटीत रुपम आपल्या मुलीला कुटुंब देण्याच्या उद्देशाने दुसऱ्या लग्नाचा विचार करत असली, तरी सीमाच्या दृष्टीने तिची मुलगीच लग्नासाठी अडचण ठरू शकते. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक रहावं म्हणून वडिलांबद्दलच सत्य मुलीला आधीच सांगू पाहणारा व्यासरचा स्वभाव तिला खटकतो.
हे मुद्दे प्रेक्षक म्हणून आपल्यालाही खटकतात. पण मुळात हे आजच्या भारतीय समाजाचा कमीअधिक प्रमाणात आरसा आहेत हे मात्र आपण मान्य केल पाहिजे. आजही ‘वधुवरसूचक’विषयाचे वर्तमानपत्रातील रकाने, वेबसाईट यावर ‘सुंदर, आदर्श, घरेलू, बारीक, उच्चशिक्षित मुलगी हवी’ ही जाहिरात असतेच. मुलाच्या दिसण्यापेक्षा त्याचा पगार, हक्काचं घर, कमीतकमी भावंड, गाडी हे ठोकले पडताळून पाहिले जातात. सीमा नेमकं हेच सांगते, दाखवते. ‘आजच्या काळात लग्ने बिस्कीटसारखी तुटतात’, हे सीमाच वाक्य जितकं खर आहे तितकच घटस्फोटीत मुलगी दुसऱ्या लग्नाला उभी राहते तेव्हा तिची मुलं हा विषय अडचणीचा होतोच. स्वतंत्र करियर, आर्थिक निर्णय घेणारी मुलगी म्हणजे अति’मॉडर्न’ हे आजही समजलं जातं.
मुलगा किंवा मुलगीने एकदा पंचविशी पार केली म्हणजे त्यांची लग्ने लावली तर आईवडिलांची जबाबदारी संपली ही मानसिकता अजूनही आहे. पण हे सगळं सीमा सांगते तेव्हा खटकायला सुरवात होते कारण कदाचित हे सत्य आपण पूर्णपणे मान्य करत नसतो किंवा मान्य असून आपल्याला त्याबद्दल काही करता येत नाही याबद्दल आपल्याला हळहळ असते. शेवटी हा विषय गॉसिप किंवा मिमचा भाग बनून राहतो. ‘इंडियन मॅचमेकिंग’ बऱ्याच प्र्षांकडे आपलं लक्ष वेधून घेते. यात कुठही मतपरिवर्तनचा प्रयत्न केलेला नाही. या सहाजणांच्या गोष्टी पाहून आपण प्रेक्षक म्हणून काय बोध घेतो आणि त्याचा कसा अर्थ लावतो हे दिग्दर्शक आपल्यावर सोडते. त्यामुळे या सिरीजबद्दल तुमची मतं वेगवेगळी असू शकतील, ती मात्र कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.