दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
“सौ बार जनम लेंगे सौ बार फनाह होंगे”
एकाच महिन्यात नव्हे तर एकाच आठवडयात जयंती व पुण्यतिथी येते असे कलाकार फिल्लम इंडस्ट्रीमध्ये फार क्वचित आढळतात. त्या कलाकारांमध्ये ज्युबिलीकुमार राजेंद्रकुमार नंतर संगीतकार रवी यांचे नाव येते. संगीतकार रवी यांची जयंती व पुण्यतिथी केवळ याच महिन्यात नव्हे तर याच आठवडयात यावी हा एक विलक्षण योगायोगच आहे.
हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णमय कालखंडाचा विचार करताना तुम्ही संगीतकार रवीला कधीच टाळू शकत नाही. १९५० ते १९७० अशी सलग वीस वर्षे हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात कार्यरत राहूनही रवीचे नाव आघाडीच्या संगीतकारांत कधीच का घेतले जात नाही हे एक कोडंच आहे. खर तर याच काळात त्याच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट व सुपरहिट गाणी नोंदली गेली आहेत.
वचन, पुनराह, चौदावीका चांद, घट, गृहस्थी, भराना, चिराग कहाँ रोशनी कहाँ, या कृष्णधवल चित्रपटापासून ते थेट दस लाख, ऑखे वक्त, हमराज, काजल, नीलकमल, खानदान, एक फूल दो माली, सगाई, शहनाई, अशा रंगीत जमान्यातील अनेक चित्रपट केवळ त्याच्या सुमधुर सुरेल संगीतावरच गाजले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
“चौदहवीका चांद हो या आफताब हो, न सर झुका के जियो, ओ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही, बाबुलकी दुवाए लेती जा, हुस्नवाले तेरा जबाब नही, चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये, गैरोपे करम अपनोपे सितम, तुम जिसपे नजर डालो उसका दिलका खुदा हाफिज, सौ बार जनम लेंगे सौ बार फनाह होंगे अशी एक ना दोन किती तरी असंख्य सुरेल, सुमधुर व सदाबहार गाणी त्यांच्या नावावर असूनही रवी कुणाच्याच खिसगणतीत नसावा याच नवल वाटते.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या त्या साठच्या दशकातील सुवर्णमय कालखंडातील तिकिटाच्या बारीवरील तो एक यशस्वी संगीतकार होता. त्याने संगीत दिलेल्या चित्रपटातील गाणी गाजली नाही असं होतच नसे. साहिर, शकील बदायुनी सारखे प्रतिभावान गीतकार त्याला लाभले.
महंमद रफी व आशा भोसले, महेंद्र कपूर सारख्या पार्श्वगायकांकडून त्याने उत्तमोत्तम गाणी गाऊन घेतली. उत्तमोत्तम गीतांना त्याने तितक्याच सुरेल सुमधुर चाली लावून ती गाणी कायमची सदाबहार करुन ठेवली. मग ते दो बदन मधील ‘जब चली ठंडी हवा’ असेल वा प्यारका सागर मधील ‘मुझे प्यारकी जिंदगी देनेवाले’ असेल वा एक साल मधील ‘सबकुछ भुलाके होशमें आये तो क्या किया’ असेल वा टॉवर हाऊस मधील ‘मै खुशनसिब हूँ के मुझो किसीका प्यार मिला’ असेल. आजही संगीतकार रवीची गाणी ऐकताना कोणतेही गाणे शिळे बेचव व कालबाहय वाटत नाही. कारण शब्दरचना व चाल तसेच वाद्यवृंदाच्या अभूतपूर्व सुमधूर सुरावटीमुळे ही गाणी कधीही ऐकली तरी ताजी रसरशीत व चैतन्याने फुललेली टवटवीतच वाटतात हे श्रेय गीतकार व संगीतकारांशिवाय कोणाकडे जाईल.
ढोलकी, हॉर्मोनियम व पियानो ॲकोर्डियन, मेंडोलिन सारख्या वाद्यांचा अचूक व सुयोग्य वापर ही त्याची खासीयत होती. ३ मार्च १९२६ रोजी दिल्लीत जन्मलेल्या रवीशंकर शर्मा याने संगीताचे कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण घेतले नव्हते. वडिलांना भजनाचा नाद असल्याने घरात असलेल्या या वातावरणातच रवी Ravi (Music Director) कोणत्याही गुरुविना उत्तम हॉर्मोनियम वाजवायला शिकला पुढे त्याने सितार तंबोरा आदि अन्य भारतीय वाद्यांवरही अशीच मेहनत घेतली.
त्याला उत्तम गाता गळा असल्याने तो मुंबईत प्रथम आला तो पार्श्वगायक बनण्याच्याच इर्षेने सुरवातीच्या काळात तो मालाड रेल्वेस्टेशनवर झोपायचा व दिवसा संधीच्या शोधात स्टूडिओचे व संगीतकारांच्या घराचे उंबरठे झिजवायचा. तेही अर्धपोटी राहून इथंतिथं किरकोळीत गात असतानाच त्याच्या आवाजातील कशिश व संगीतावरील अविचल श्रध्दा बघून १९५२ साली संगीतकार हेमंतकुमार यांनी त्याला आनंदमठ या चित्रपटातील वंदे मातरम गाण्यात कोरसमध्ये संधी दिली.
हेमंतकुमार यांच्याकडे त्याने बरेच दिवस उमेदवारी केली इथेच तो उत्तम तबला व ढोलकी वाजवायलाही शिकला.सुरवातीला काही दिवस त्याने चित्रपटासाठी कधी नावानिशी तर निनावी स्वरुपात गीतलेखन केले व काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले. पण संगीतकार म्हणून ख-या अर्थाने त्याचा गाजलेला चित्रपट म्हणजे “वचन” होय. यातही चंद्रा नावाच्या एका अन्य संगीतकाराची भागीदारी होतीच. तरीपण या चित्रपटातील ‘चंदामामा दूरके पूरी पकाये हूरसे’ या आशा भोसलेच्या आवाजातील लोरीने तेव्हा लोकप्रियतेचा उच्चांकच गाठला होता. याच चित्रपटातील ‘जब दिया हाथमे हाथ मेरे सजना देखो जी हमें छोड़ ना जाना’ हे द्वंदगीत आजही ऐकायला मिळते.
हेंमतकुमारकडे शागिर्दी करत असतानाच त्याच्यातील हुनर व प्रतिभेचे देणे व चिकाटी, मेहनती स्वभाव आणि संगीतावरील अभंग निष्ठा पाहून त्यांनी रवीला त्यांच्याकडे आलेले काही चित्रपट त्याच्याबाबतीत खात्री असल्यानेच संगीतदिग्दर्शनासाठी बहाल केले. संगीतकार रवीला १९६०-७० च्या दशकात चौदहवीका चांद, दो बदन, आंखे, हमराज इ.चित्रपटांसाठी फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले होते तर १९६१ मध्ये घराना आणि १९६५ मध्ये खानदान चित्रपटासाठी त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून फिल्मफेअर पुरस्काराचा तो मानकरी ठरला. याशिवाय १९८२ मध्ये त्याने संगीतबध्द केलेल्या निकाह चित्रपटातील ‘दिलके अरमान आंसूओमे बह गये’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार या चित्रपटाची नायिका व पार्श्वगायिका सलमा आगा हिला मिळाला होता.
साहिर वा शकिल बदायुनी कैफी आझमी, जानेवार अख्तर सारखे प्रतिभाशाली गीतकार त्याला लाभल्याने अनेक सर्वोत्कृष्ट अजरामर सदाबहार गीतांचा तो उदगाता ठरला. ज्यात, मिली खाकमे मोहोब्बत जला दिलका आशियाना (चौदहवीका चांद),र हा गर्दीशोमै हरदम मेरे इश्कका शिकारा (दो बदन), किसी पत्थरकी मूरतसे मोहोब्बतका इरादा है (हमराज), मिलती है जिंदगीमे मुहोबत कभी कभी (आंखे), सौ बार जनम लेंगे (उस्तादोके उस्ताद), आजकी मुलाकात बस इतनी (भरोसा), हम प्यार तुम्हे करते है हमे (अपना बनाके देखो), राखी धागोंका त्योहार (राखी), तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा (खानदान), हुस्नवाले तेरा जबाब नही (घराना) सारख्या गाण्याचे जनमानसातील स्थान अव्वल आहे.
१९६० च्या दशकात संगीतकार रवीने त्या काळातील आघाडीचे संगीतकार शंकर जयकिशन, ओ.पी.नय्यर, सी रामचंद्र, सचिनदा, हेमंतदा, रोशन नौशाद, सारख्या बडया संगीताकारांच्या स्पर्धेत उतरुन अनेक चित्रपटांना सुपरहिट संगीत देऊन हम भी कुछ कम नही है दाखवून दिले. मग तो दस लाख असेल एक फुल दो माली असेल वा दूरकी आवाज, काजल, असेल. असं असूनही इतकी हिट व सुमधूर अर्थपूर्ण सदाबहार गाणी देऊनही रवी पुढे या गळेकापू स्पर्धेत मागे का पडला या प्रश्नाचं उत्तर कुणीच देऊ शकेल असे वाटत नाही. कारण हाच प्रश्न नौशाद, मदनमोहन, ओ.पी.नय्यर वा हेमंतकुमार यांच्याबाबतीतही पडतो. अन त्याचे उत्तर कदाचित बदलत्या पिढीच्या बदलत्या अभिरुचीतही असू शकेल. पण त्या त्या काळी त्याच्या हितशत्रुकडून केल्या गेलेल्या तोच तो पणाच्या आरोपात व त्यांच्या विरुध्दच्या विषारी प्रचारातही दडले असेल. पण त्यानंतर या संगीताकारांच्या तोडीचे संगीतकार व संगीत रसिकांना भविष्यात कधीच ऐकायला मिळाले नाही हे सत्यही नाकारून चालणार नाही.
असो… १९८० नंतर संगीतकार रवीने बॉलीवूडकडून टॉलीवूडकडे म्हणजे मल्याळम चित्रपटांकडे मोर्चा वळवला व तिथेही आपले स्थान अव्वल असल्याचे अनेक मल्याळम चित्रपटांना सुपरहिट संगीत देऊन सिध्द केले. मात्र दाक्षिणात्य चित्रपटांसाठी त्याचे बॉम्बे रवी हे नवे बारसे झाले. थोडक्यात संगीतकार रवीने आपली सेंकड इनिंग बॉम्बे रवी या नावाने मल्याळम चित्रसृष्टीत यशस्वी केली. दाक्षिणात्य चित्रपटांना त्याने बॉम्बे रवी या नावाने संगीत दिले. ज्याबददल त्याला त्याच्या सेकेड इनिंगमध्येही विविध पुरस्कारही मिळाले आहेत. खरा सिक्का कुठेही टाकला तरी तो खणखणीतच वाजतो हेच त्याला मिळालेले सेकंड इनिंगमधले पुरस्कार सांगतात.
रवी सुमधुर सुरेल चालीच्या गाण्यांचा धनी आहे. त्याने संगीतबध्द केलेल्या अनेक चित्रपटातील गाण्याचा दर्जा, लोकप्रियता व गुणवत्ता तत्कालीन कोणत्याही आघाडीच्या संगीतकारापेक्षा काकणभरही कमी नव्हती. रवीच्या संगीतात काव्याला अनन्यसाधारण महत्व असे. अन ही गोष्ट त्याने त्याच्या काही मुलाखतीमधून आवर्जून सांगितली होती. तो स्पष्टपणे सांगायाचा की, माझ्या संगीतामधील शकील, साहीर सारख्या प्रतिभावान गीतकारांचे काव्य वजा केले तर काय उरते? त्या गीतकारांनी एकाहून एक सरस काव्यरचना केल्या त्या अर्थपूर्ण भावपूर्ण प्रतिभाशाली काव्यरचनांमुळे प्रेरीत झाल्यामुळेच माझ्याकडून चांगले संगीत दिले गेले. त्यामुळे मी माझ्या यशात गीतकारांचा सिंहाचा वाटा आहे असे मानतो. आपल्या यशाचे लोकप्रियतेचे व संगीताच्या श्रेष्ठत्वाचे श्रेय गीतकारांना उघडपणे उदार मनाने देणारा संगीतकार रवी त्यामुळेही ग्रेटच ठरतो.
–दिलीप कुकडे