हकीकत: भारतातील पहिला युद्धपट, ज्याची जादू अद्याप कायम आहे.
भारतातील पहिली फुल लेन्थ वॉर मूवी म्हणजे चेतन आनंद यांचा हकीकत (Haqeeqat) चित्रपट. १९६४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांना आपली अवीट छाप सोडली आहे. हा चित्रपट १९६२ सालच्या भारत चीन युद्धावर आधारित होता. भले ही या युद्धामध्ये आपल्या देशाचा पराभव जरी झाला असला तरी भारतीय सैनिकांनी जो संघर्ष केला होता त्याला तोड नाही. हा भारतीय सैनिकांचा चिवट संघर्ष होता. हा सारा थरार रुपेरी पडद्यावर मांडणं सोपं नव्हतं. कारण तोवर अशा चित्रपटांची भारतामध्ये निर्मितीच होत नव्हती. निर्माता दिग्दर्शक चेतन आनंद यासाठी प्रयत्नशील होते. पण यासाठी शासकीय पातळीवर बऱ्याच परवानग्या आवश्यक असायच्या आणि त्या मिळणं कठीण होतं.
चेतन आनंद यांना वॉर बॅटलवर म्हणजे थेट लडाख येथे जाऊन चित्रीकरण करायचं होतं. या चित्रीकरणात त्यांना भारतीय सैनिकांचा देखील सहभाग हवा होता. भारतीय लष्कराची तशी परवानगी हवी होती. या सर्व प्रयत्नात चेतन आनंद १९६२ पासून होते. परंतु शासकीय कामात होणारी दिरंगाईमुळे ते थकून गेले आणि शेवटी नवकेतन चा ‘गाईड’ हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे ठरवले. त्या पद्धतीने त्यांनी त्याच्यावर काम देखील चालू केले. पण आश्चर्य घडले. त्यांना शासनाकडून वॉर मूवी करीता ग्रीन सिग्नल मिळाला आणि त्यांनी ‘गाईड’ हा प्रोजेक्ट सोडून दिला आणि ते त्यांच्या आवडत्या वॉर मूवी ‘हकीकत’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या मागे लागले. नंतर नवकेतनचा ‘गाईड’ हा चित्रपट देव आनंदचा दुसरा भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी याने दिग्दर्शित केला.
‘हकीकत’ या चित्रपटाने तमाम भारतीयांना भारतीय लष्कराची मेहनत त्यांची जिद्द त्यांचं कौशल्य याचा खूप जवळून दर्शन घडवलं. भारतीय सिनेमांमध्ये युद्धपट यानंतर यायला सुरुवात झाली. त्या अर्थाने ‘हकीकत’ (Haqeeqat) हा चित्रपट भारतीय ‘वॉर मूवी’ज चा पायोनियर म्हणता येईल. या सिनेमाला संगीत संगीतकार मदन मोहन यांनी दिले होते. मदन मोहन पहिल्यांदाच चेतन आनंदसोबत काम करत होते. या सिनेमातील गाणी गीतकार कैफी आजमी यांनी लिहिली होती. कैफी यांची पत्नी शौकत आजमी हिने ‘कैफी अँड आय’ या पुस्तकात या सिनेमाची गाणी लिहिताना कैफी आजमी यांची मानसिकता कशी होती यावर विस्तृत लिहिलं आहे.
एकदा संध्याकाळी आठ वाजता दिग्दर्शक चेतन आनंद कैफी आजमी यांच्या घरी पोहोचले आणि म्हणाले, ”माझ्या आगामी ‘हकीकत’ (Haqeeqat) या चित्रपटातील गाणी तुम्ही लिहायची आहेत.” त्यावर कैफी आजमी म्हणाले, ”नको नको. मी अपयशी माणूस आहे. माझे मागच्या काही वर्षातील सर्व सिनेमे फ्लॉप झालेले आहेत. लोक मला आता पनवती समजत आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही माझी गाणी घेऊ नका. तुमचा चित्रपट देखील फ्लॉप होईल.” कैफीचे बोल खरे होते. कागज के फूल (१९५९) रजिया सुलतान (१९६१) शमा (१९६१) मै सुहागन हू (१९६३) हे सर्व सिनेमे फ्लॉप झाले होते.
पण कैफीच्या बोलण्यावर चेतन आनंद म्हणाले, ”माझे देखील मागचे तीन-चार सिनेमे फ्लॉप झालेले आहेत. कदाचित दोन अपयशी माणसं एकत्र आली तर कदाचित यश मिळू शकेल. दोन निगेटिव्ह एकत्र आले तर पॉझीटीव्ह घडू शकते! त्यामुळे तुम्हीच माझ्या सिनेमातली गाणी लिहा. बिनधास्त लिहा.” कैफी आजमी यांना हा मुद्दा पटला आणि त्यांनी गाणी लिहायला घेतली. या चित्रपटातील सर्वच गाणी आज देखील तितकीच लोकप्रिय आहेत.
‘कर चले हम फिदा जानो तन साथियो’ या गाण्याने तमाम भारतीयांमध्ये देशभक्तीची लहर पसरवली. आज देखील देशभक्ती पर गीतात या गाण्याचे स्थान अव्वल आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, बलराज सहानी, संजय, प्रिया राजवंश. सुधीर, विजय आनंद शेख मुख्तार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट बनून तयार झाला त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले होते. त्यामुळे चेतन आनंद यांनी हा सिनेमा पंडित नेहरू आणि तमाम भारतीय सैनिकांना अर्पण केला होता.
==========
हे देखील वाचा : किस्सा ‘कयामत से कयामत तक’च्या गाण्याच्या मेकिंगचा!
==========
या चित्रपटातील नायिका प्रिया राजवंश हीचा हा पहिला चित्रपट आहे. खरंतर ‘गाईड’ या चित्रपटातचे दिग्दर्शन जेव्हा चेतन आनंद करणार होते त्यांना प्रिया राजवंश हीच नायिका म्हणून हवी होती. परंतु ती नृत्यांमध्ये कमी असल्यामुळे तिने नकार कळवला होता. प्रिया राजवंश हिने आपल्या कारकीर्दीत जेवढे चित्रपट केले त्या सर्व सिनेमाचे दिग्दर्शन चेतन आनंद यांनीच केले होते. ‘हकीकत’ (Haqeeqat) हा भारतीय सिनेमतील कल्ट क्लासिक सिनेमा आहे. २०१२ मध्ये हा चित्रपट रंगीत करण्यात आला पण तो प्रदर्शित मात्र अद्यापही झालेला नाही. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान प्राप्त झाला होता.