ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
मालिकाविश्वात अभिजितच्या लेखणीचे राज्य
एका रंगकर्मी मित्राच्या वडिलांचं निधन झालं म्हणून अभिजित मुंबईहून आपल्या गावी, नागपूरला आला होता. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. इतर स्थानिक रंगकर्मीही तिथं होते. अभिजित त्या घोळक्यात गेला. “काय अभिजित, काय सुरू आहे मुंबईत?” वगैरे विचारणा सुरू झाली.
“सुरूय स्ट्रगल’… अभिजितनं सांगितलं. “अरे, आपल्यासारख्यांना काही मिळत नसतं रे मुंबईत. काही फायदा नसतो स्ट्रगल वगैरे करून. आपलं नागपूरच बरं”, असे सल्ले येऊ लागले. अभिजित काहीसा हताश झाला. बाजूलाच कोराडीचे जोशी काका उभे होते. त्यांनी अभिजितच्या मनातील अस्वस्थता हेरली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते त्याला बाजूला घेऊन गेले. म्हणाले, “अरे, तू छान लिहायचास. का सोडलंस रे लिखाण?” अभिजितचे डोळे चमकले. तिथं स्वत:चा त्याला आणखी नव्यानं शोध लागला होता. नव्या उत्साहानं तो मुंबईकडे झेपावला.
अभिजित गुरू… मालिकाविश्वातला खऱ्या अर्थानं गुरू. आज विविध मराठी वाहिन्यांवर ज्या मालिका गाजल्या, गाजताहेत त्यातील बहुतांश अभिजितनं लिहिल्या आहेत. सर्व मिळून बारा हजारांवर एपिसोड्स म्हणजे गंमत नव्हे. रंगभूमीवरून आलेल्या या नागपूरच्या पोरानं मालिका, चित्रपट हे विश्व स्वत:च्या कठोर मेहनतीनं व्यापलं आहे. मात्र, त्याचा हा संघर्ष सोपा नव्हताच. (Inspirational story of Abhijit Guru)
वडील सुरेश आणि आई अनुपमा दोघेही शिक्षकी पेशात. अभिजितला लहानपणापासूनच नाटकांचं प्रचंड वेड. नागपुरात हिस्लॉप, मॉरिस कॉलेजमध्ये शिकत असताना कित्येक एकांकिका लिहिल्या, बक्षिसं मिळविली. राज्य नाट्य स्पर्धाही गाजविल्या. याच क्षेत्रात करिअर करायचं, असं त्यानं मनाशी पक्कं ठरविलं होतं.
त्याचं ‘एक और द्रोणाचार्य’ हे नाटक त्यावेळी गाजलं होतं. नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे तेव्हाचे प्रमुख डॉ. विनोद इंदूरकर यांनी हे नाटक पाहिलं. ते प्रभावित झाले. त्यांनी अभिजितला ललित कला विभागात बोलवून घेतलं. हे नाटक दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला. डॉ. इंदूरकर यांनी अभिजितमधील स्पार्क ओळखला होता. त्यांनी तेव्हाच सांगितलं, “मोठं व्हायचं असेल, तर तलावात राहू नको. तुला समुद्रात जावं लागेल. मुंबई गाठ.” (Inspirational story of Abhijit Guru)
त्यांनी दिलेल्या या प्रोत्साहनामुळे अभिजितला बळ मिळालं. त्याचदरम्यान त्याच्या ‘अर्जुन डॉट कॉम’ या एकांकिकेनं धमाल केली होती, अल्फा करंडक जिंकला होता. आता मात्र मुंबईत गेलंच पाहिजे, अशी महत्त्वाकांक्षा प्रबळ झाली होती. मात्र, अभिजितनं एखादी नोकरी करावी, हौस म्हणून नाटक वगैरे करावं, असं आई-बाबांना वाटत होतं. अभिजितनं त्यांना समजावलं. शेवटी बाबांनी त्याला सहा महिन्यांचा वेळ दिला. “मुंबईत काही नाहीच जमलं तर नागपुरात परत ये”, अशी अट घातली. जिद्दी अभिजितनं हे आव्हान स्वीकारलं.
साधारण २००२चा तो काळ होता. मुंबईच्या गर्दीत तो सामील झाला. इकडे विदर्भातील बोटावर मोजण्याइतकेच कलावंत स्थायिक झाले होते. त्यामुळे आपला कितपत टिकाव लागणार, ही धाकधूक होतीच. मात्र, इरादे बुलंद होते. त्याकाळी दोनच वाहिन्या होत्या. काळ ‘रिस्की’ होता. खोलीचं भाडं परवडत नव्हतं म्हणून दादरमध्ये चहा विकणाऱ्यांच्या संगतीनं राहिला. त्याच परिसरात दहा रुपयांत राइस प्लेट मिळायची. त्यावर गुजराण सुरू होती.
कामासाठी कित्येक किलोमीटर पायी भटकंती सुरू झाली. पदवी घ्यायलाही आपल्याला तीन वर्षे द्यावीच लागतात. हेच गणित इथंही लागू पडतं. काही मिळवायचं असेल तर संघर्ष आणि संयम या बाबी महत्त्वाच्या आहेतच, हे त्याला उमगलं होतं. (Inspirational story of Abhijit Guru)
अभिनयासाठी एक पर्सनलिटी लागते. आपल्याला फक्त नाटक माहिती आहे, टेलिमीडियाची जाण नाही. अशावेळी काय करावं काही कळत नव्हतं. त्यादरम्यान विवेक देशपांडे यांच्याशी ओळख झाली. ते व कांचन नायक एक मालिका करत होते. अभिजित त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून दाखल झाला. जवळपास सगळीच कामं त्यानं विनामोबदला केली. कारण, शिकायचं होतं. ते शिकून बऱ्यापैकी ज्ञान मिळालं होतं.
अभिजित बालाजी टेलिफिल्म्सला गेला. तिथं संतोष कोल्हे यांच्यासोबत प्रॉडक्शनची कामं करू लागला. पैसे बरे मिळू लागले होते. मात्र, काम ३६ तासांचं होत होतं. त्याचदरम्यान, चंद्रकांत लोकरे (जे नंतर अभिजितचे साडू बनले) ‘हम तो तेरे आशिक हैं’ नाटक करीत होते. तिथं संजय मोने यांना असिस्ट केलं. नाटक झालं, मालिका शिकून झाली. आता फिल्म शिकायची होती. या उद्देशानंच तो चंद्रकांत कुळकर्णी यांच्या नाट्यजाणीव शिबिरात गेला. (Inspirational story of Abhijit Guru)
“सध्या काय करतोय?” त्यांनी विचारलं. अभिजितनं आपला प्रवास सांगितला. “मी एक फिल्म करतोय, ये.” चंद्रकांत कुळकर्णींनी प्रस्ताव ठेवला. अभिजितनं त्यांना ‘कायद्याचं बोला’ चित्रपटासाठी असिस्ट केलं. त्यानंतर ‘कदाचित’, ‘मीराबाई नॉटआउट’साठीही असिस्ट केलं. त्याचदरम्यान चित्रा पालेकर ‘मातीमाय’ चित्रपटाची तयारी करीत होत्या. त्याचे चित्रीकरण विदर्भात अमरावती जिल्ह्यातील नांदगावखंडेश्वर तालुक्यातील जळू येथे होणार होते. त्यासाठी पालेकरांना विदर्भातील असिस्टंट डायरेक्टर हवा होता.
अभिजित आणि नरेंद्र मुधोळकर हे तिथं गेले व काम सुरू केलं. त्यादरम्यान नरेंद्रला नोकरी लागली, तो परतला. यादरम्यान अभिजितला ऑस्करविजेत्या वेशभूषाकार भानू अथैय्या, सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर देबू देवधर, सुप्रसिद्ध संगीतकार भास्कर चंदावरकर, ‘गदर’चे आर्ट डायरेक्टर संजय धाबडे अशा बड्या कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाली. (Inspirational story of Abhijit Guru)
असा सुरू झाला लेखनप्रवास
समिधानं (Samidha guru) सुरुवातीपासूनच साथ दिली होती. आयुष्यभर सोबत राहण्याचा निश्चय आधीच केला होता. “आता लग्न करून टाका”, घरच्यांनी सांगितलं. लग्न झालं. साहजिकच, आता जबाबदारी वाढली होती. मुंबईतील खोली सोडून घर भाड्यानं घेतलं होतं. हातात पैसा नव्हता. एका कामाचा चेक आठवडाभरानंतर मिळणार होता. त्यामुळे अभिजित व समिधा सात दिवस घरातच बसून होते. खिशात फक्त शंभर रुपये होते. खाली उतरलो, तर तेही खर्च होतील, ही भीती होती. घरात डाळ-तांदूळ शिल्लक होते. त्यावरच आठवडा काढला, अशी हळवी आठवण अभिजितनं सांगितली. (Inspirational story of Abhijit Guru)
यादरम्यान समिधाला एक छोटं काम मिळालं. त्यासाठी तिला पंधरा दिवस हैदराबादला जावं लागणार होतं. त्याचदरम्यान रंगकर्मी मित्राच्या वडिलांच्या निधनानिमित्तानं तो नागपुरात आला होता. तिथंच जोशीकाकांनी त्याला त्याच्यातील लेखकाची आठवण करून दिली होती. त्याला आता स्क्रीनप्ले, डायलॉग्जचं तंत्र कळलं होतं.
मुंबईत परतल्यावर लिखाण सुरू केलं. एका स्क्रिप्टचे ३०० रुपये मिळायचे. कुणीतरी सांगितलं, चिन्मय मांडलेकर एक मालिका लिहितोय, त्याच्याशी बोलून बघ. अभिजितनं फोन केल्यानंतर चिन्मयनं त्याला भेटायला बोलवलं. “मी ‘अवघाची संसार’ लिहितोय. त्याचे डायलॉग लिहिशील का?” त्यानं विचारल्यावर अभिजितनं होकार दिला.
चिन्मय चहा बनवून आणेपर्यंत अभिजितनं एक सीन लिहून ठेवला होता. चिन्मयनं लगेच प्रोड्युसरला फोन लावला अन् सांगून टाकलं, “आपल्याला डायलॉग रायटर मिळालाय.” नंतर अभिजित मंदार देवस्थळी यांना भेटला. चार-साडेचार वर्षे ही सीरियल लिहिली. नंतर लिखाणाचा सिलसिला सुरू झाला. (Inspirational story of Abhijit Guru)
‘कशाला उद्याची बात’, ‘लज्जा’, ‘आभास हा’, ‘पुढचं पाऊल’, ‘देवयानी’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘रंग माझा वेगळा’ आदी तुफान चालणाऱ्या मालिका अभिजितच्या लेखणीतून उतरल्या आहेत. यातील कित्येक मालिकांनी हजार एपिसोड्स पूर्ण केले आहेत. २०११पासून नंबर वनवर असलेल्या मालिका त्याच्याच आहेत. शिवाय, ‘लेक माझी दुर्गा’ मालिकेचा तो प्रोड्युसरही आहे.
यादरम्यान नंदिता दासनं ‘फिराक’साठी तसंच पल्लवी जोशीनं सध्या गाजत असलेल्या ‘कश्मीर फाइल्स’साठी बोलवलं होतं. मात्र, व्यस्ततेमुळे ते शक्य झालं नाही, याची काहीशी खंतही त्याला आहे. आता स्थिती सुधारली आहे. समिधाही अभिनयक्षेत्रात स्थिरावली आहे. कधीकाळी चहावाल्यांसोबत खोली शेअर करणाऱ्या अभिजितची मुंबईत आता दोन घरं आहेत. अभिजित, समिधाच्या संसारवेलीवर फूल उमललंय, दुर्वा. ती आता बारा वर्षांची आहे.
समिधाची साथ अन् हळवे क्षण…
“खूप संघर्षाचे दिवस पाहिलेत आम्ही. यादरम्यान समिधानं दिलेली साथ खूप मोलाची आहे. कठीण परिस्थितीतही तिनं कधी साधी तक्रार केली नाही, वाद घातले नाहीत. पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. कालांतरानं बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालो होतो. एकदा समिधाला घेऊन खरेदीला गेलो. तिच्या हाती डेबिट कार्ड दिलं. म्हटलं, ‘तुला जे वाटते ते खरेदी कर’. समिधा प्राइझ टॅग न पाहता खरेदी करीत सुटली. नंतर माझ्याकडे आली अन् मला पकडून रडली. वाईट दिवस काढले होते, त्यांच्या आठवणींचा हा निचरा होता”, अभिजित हळवेपणानं सांगत होता. (Inspirational story of Abhijit Guru)
यशाचा ‘गुरू’मंत्र…
आज लिखाणाच्या भरवशावरच जीवनात यशस्वी होता आलं. मात्र, वाट सोपी निश्चितच नव्हती. तुम्हाला मुंबईत स्थिरस्थावर व्हायचं असेल, तर इथलंच बनून राहता आलं पाहिजे. इथल्या सवयी अंगिकारता आल्या पाहिजेत. याशिवाय, कठोर मेहनतीला पर्याय नाही. सातत्य हवंच. प्रत्येकाचे गुण वेगळे आणि प्रत्येकाचा कॅन्व्हास वेगळा. त्यामुळे आपल्यातील बलस्थाने ओळखून काम केलं पाहिजे. संघर्षानंतर यश नक्कीच मिळतं. (Inspirational story of Abhijit Guru)
=====
हे देखील वाचा – मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्यावर आधारित टॉप ५ बायोपिक
=====
यशासाठी कुणाला हजार पावलं चालावं लागतं तर कुणाला ते दोनंच पावलांत मिळतं. हा नशिबाचा भाग झाला. मात्र, मेहनत महत्त्वाचीच आहे, असा मंत्र अभिजित देतो. आज मालिकाविश्वातला तो चमकता हिरा आहे. त्याची चमक पुढचा कित्येक काळ आपले डोळे दिपवत राहील, यात शंकाच नसावी.