‘या’ चित्रपटातील या गाण्याचा इंटरेस्टिंग किस्सा
सत्तरच्या दशकाच्या मध्यावर जेव्हा राजेश खन्नाचा सुपरस्टार पदाचा सूर्य थोडासा अस्ताला जाऊ लागला होता त्यावेळी त्याने एका चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळवला होता. हा चित्रपट फारसा चालला नाही. पण बौद्धिक वर्गाला हा चित्रपट खूप आवडला होता. या चित्रपटातील एका गाण्याचा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. त्याकाळी चित्रपटाच्या सर्व बाबींचा विचार किती बारकाईने आणि काळजीपूर्वक रीत्या केला जात होता हे यातून कळते. हा चित्रपट होता १९७४ साली आलेला बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘अविष्कार’. या चित्रपटात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर हे नायक नायिकेच्या भूमिकेत होते. चित्रपट चांगला असून देखील त्याला म्हणावं तितकं व्यावसायिक यश मिळाले नाही. परंतु आज देखील एक cult classic म्हणून या चित्रपटाचा उल्लेख होतो. या चित्रपटातील एका गाण्याचा हा किस्सा गझल गायक जगजीत सिंह यांनी रेडिओवरील एका मुलाखतीत सांगितला होता. दिग्दर्शक चित्रपटातील प्रत्येक घटनेचा किती गांभीर्याने आणि जबाबदारीने विचार करतात हे यातून आपल्याला दिसतं. या चित्रपटात बासू भट्टाचार्य यांनी एक जुनी ठुमरी वापरायचे ठरवले. हीच ठुमरी कुंदनलाल सहगल यांच्या १९३७ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्ट्रीट सिंगर’ या चित्रपटात देखील होते. वाजिद अली शहा यांची अतिशय गाजलेली ही ठुमरी आहे. ‘बाबुल मोरा नैहर छूटो भी जाये…’ अतिशय काळीज पिळवटून टाकणारी ही रचना होती. (Recording)
जेव्हा बासू भट्टाचार्य यांनी ही रचना आपल्या चित्रपटात घ्यायची ठरवले त्यावेळी त्यांनी या ठुमरीला युगल स्वरूपात घ्यायचे ठरवले. त्यामुळे ही ठुमरी गाण्यासाठी त्यांनी गायक गायिकेचा शोध सुरु केला. सत्तरच्या दशकामध्ये जगजीत सिंह आणि चित्रा सिंह हे त्यांच्या प्रायव्हेट अल्बम मधून प्रेक्षकांना भेटत होते. त्यांच्या गझल गायकीने एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला होता. बासू भट्टाचार्य यांनी ही रचना या पती-पत्नीच्या स्वरात गाऊन घ्यायचे ठरवले. त्या पद्धतीने त्यांनी त्या दोघांना पाचारण केले. या चित्रपटाला संगीत कनू रॉय या बंगाली संगीतकाराचे होते. या ठुमरीला वेगळी ट्रीटमेंट देताना सहगल यांच्या अप्रतिम कलाकृतीला अजिबात ठेच न पोहोचता एक नवीन ओळख करून द्यायची असे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे त्यांनी ही रचना युगल स्वरूपात घ्यायचे ठरवले. भरपूर झाल्यानंतर रेकॉर्डिंगसाठी बासू भट्टाचार्य यांनी त्या दोघांना बोलावले. संध्याकाळी पुन्हा एकदा रिहर्सलचा दौर सुरू झाला रात्री दहा वाजता त्यांनी रिहर्सल थांबवली आणि सांगितले,”याचे रेकॉर्डिंग आपण उद्या सकाळी करू परंतु तुम्ही दोघे आज रात्री इथेच झोपा!” जगजीत सिंह आणि चित्रा सिंह यांना थोडंसं विचित्र वाटलं. परंतु बासू भट्टाचार्य यांनी त्यांची झोपण्याची व्यवस्था तिथेच केली. (Recording)
पहाटे दोन वाजता बासू भट्टाचार्य यांनी त्यांच्या दारावर टकटक केलं दोघांना उठवलं ! आणि त्यांना सांगितलं,” आपल्याला आता या ठुमरीचे रेकॉर्डिंग करायचे आहे!” जगजीत सिंह यांनी घड्याळात पाहिले आणि विचारले,” आता ? पहाटे तीन वाजता ? “ बासुदा म्हणाले,” हो मला तुमच्या आवाजामध्ये एक भारी पण पाहिजे आहे आणि हे आवाजातील भारीपण पहाटेच्या वेळेलाच येऊ शकते. तेव्हा आता लगेच रेकोर्डिंग करूयात!” नाईलाज होता. डोळ्यावर झोप होती. पण काय करणार? जगजीत आणि चित्रा दोघे फ्रेश होऊन रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पोहोचले आणि पहाटे तीन वाजता या ठुमरीचे रेकॉर्डिंग झाले. बासू भट्टाचार्यांना हवा असलेला आवाजातील इफेक्ट येथे परफेक्ट मिळाला. अशा पद्धतीने पहाटे तीन वाजता सुरू झालेले रेकॉर्डिंग सकाळी पाच वाजता संपली. चित्रपटात जेव्हा हे गीत येते त्यावेळेला जगजीत – चित्राच्या आवाजातील हा भारीपणा आपल्याला दिसून येतो. सैगलच्या स्वराला एक नैसर्गिक बेस होता. सैगलने गायलेल्या या ठुमरीला रसिक विसरले नव्हते. पण बासुदा यांनी मूळ कलाकृतीला धक्का न लावता युगल स्वरुपात ही रचना साकार केली.(Recording)
==========
हे देखील वाचा : हिरो विश्वजित यांचा फिल्मी आणि सुरेल प्रवास
==========
या चित्रपटांमध्ये मन्नाडे यांच्या स्वरात ‘हंसने की चाह ने इतना मुझे रुलाया है..’ हे अतिशय अप्रतिम असं गाणं होतं. त्याचप्रमाणे किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात ‘नैना है प्यासे मेरे… हे एक सुंदर युगलगीत देखील होते. राजेश शर्मिला दोघेही खूपच सुंदर या चित्रपटात दिसले होते. पती-पत्नीची लग्नानंतरची कथा या चित्रपटात बासू भट्टाचार्य यांनी मांडली होती. वस्तुतः बासू भट्टाचार्य यांच्या ट्रायोलॉजी मधील हा दुसरा चित्रपट होता. पहिला चित्रपट ‘अनुभव’ १९७१ साली आला होता. ज्यामध्ये संजीव कुमार आणि तनुजा यांच्या भूमिका होत्या. दुसरा चित्रपट हा ‘अविष्कार’ १९७४ साली आला. यात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर होते आणि या त्रयीतील तिसरा चित्रपट ‘गृहप्रवेश’ हा १९७८ साली आला होता. ज्यामध्ये संजीव कुमारच्या सोबत पुन्हा शर्मिला टागोर होती. या तीनही चित्रपटातून बासू भट्टाचार्य यांनी पती-पत्नीच्या नात्याचा अतिशय खोलवर जाऊन शोध घेतला होता. त्या अर्थाने हे तीनही चित्रपट मास्टरपीस आहेत. या तीनही चित्रपटातील गाणी कपिलकुमार यांनी लिहिली तर संगीत कनू रॉय यांच्या आहे.(Recording) जगजीत – चित्राचे हे गीत बासू भट्टाचार्य यांना इतके आवडले की, त्यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटात देखील जगजीत सिंहच्या आवाजातील एक गीत वापरले. वस्तुतः हे त्यांचे प्रायव्हेट सॉंग होते. हे गीत होते ‘बात निकली तो फिर दूर तलक जायेगी…’