सौदीमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली, हॉलिवूडसाठी मात्र पायघड्या
तीन दशकांहून जास्त काळ सौदी अरेबियामध्ये असलेली सिनेमा बंदी २०१७ साली उठवण्यात आली आणि मग मल्टीप्लेक्स आले, प्रादेशिक चित्रपटनिर्मितीला सुरुवात झाली. अगदी बॉलीवूड ते हॉलिवूड सिताऱ्यांचे ‘लाईव्ह शोज’ व्हायला लागले. पुरस्कार सोहळेही सुरु झाले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तर पहिल्यांदाच ‘रेड सी’ या नावाने इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलही आयोजित करण्यात आला होता.
जॉन ट्रॅवोल्टा आणि सलमान खान यांना जागतिक पुरस्कार देऊन गौरवणं, पॉप गायकांची भव्य कॉन्सर्ट आयोजित करणं, फॉर्मुला वन रेस भरवणं असे अनेक उपक्रम सुरूच असतात. त्यापुढे जाऊन सौदी अरेबिया हे एक महत्त्वाचं ‘शूटिंग डेस्टिनेशन’ बनावं यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. (Saudi Arabia & Hollywood).
जागतिक वारसास्थळांच्या यादीतलं अल-उला (AL-ULA) हे शहर जागतिक पर्यटनस्थळ बनावं यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती सुरु झाली. हेच अल-उला शहर आता हॉलिवूड स्टुडिओज साठी आवडीचं चित्रीकरण स्थळ बनत आहे. ‘अल-उला’सारख्या शहरातील प्राचीन दगडी अवशेष, डोंगराळ आणि निर्मनुष्य प्रदेश यामुळे जगभरातील चित्रकर्त्यांना भुरळ घालत राहणार आहे.
संपूर्णपणे सौदी अरेबियामध्ये चित्रित झालेला पहिला चित्रपट म्हणजे, रिक रोमन वॉ दिग्दर्शित ‘कंदाहार’. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. गेरार्ड बटलर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. (Saudi Arabia & Hollywood)
‘डेजर्ट वॉरिअर’ या आणखी एका भव्य हॉलिवूडपटाचं चित्रीकरण सौदीमध्ये गेल्यावर्षी पासून सुरु आहे. (यात बेन किंग्जले महत्त्वाच्या भूमिकेत आहे) या ‘डेजर्ट वॉरिअर’चं बजेट आहे १३० मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल ९८५ कोटी रुपये.
‘कंदाहार’चं चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांना सौदीमध्ये एक तात्पुरता स्टुडिओ उभारावा लागला होता, पण भविष्यात इथे चित्रित होणाऱ्या चित्रपटांसाठी द रॉयल कमिशनतर्फे अत्याधुनिक स्टुडिओ उभारणीचं काम सुरु आहे. (Saudi Arabia & Hollywood)
याचवर्षी जुलैपर्यंत २३००० स्क्वे.फूट आकाराचे दोन शूटिंग स्टेज ‘अल-उला’मध्ये उभे राहतील. याच आवारात कलाकार-तंत्रज्ञान राहण्यासाठी ३०० रूम्स असलेलं पंचतारांकित हॉटेलही सज्ज असेल. इतकंच नाही तर, सौदीमध्ये चित्रीकरणासाठी ४० टक्के सब्सिडीही देण्यात येतेय, म्हणजे निर्मितीखर्चात ४० टक्क्यांची बचत होणार आहे. सौदीमधील बलाढ्य मीडिया कंपनी MBC कडून कंदाहार आणि डेजर्ट वॉरिअर सारख्या चित्रपटांना अर्थसहाय्य्यही करण्यात आलं आहे.
सौदीचे अभिषिक्त राजपुत्र (क्राऊन प्रिन्स) यांच्या स्वप्नातील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे अत्याधुनिक ‘नेओम’ मेगासिटीची निर्मिती. २०२५ पर्यंत हे शहर म्हणजे एक जागतिक मीडिया हब बनावं, असा सत्ताधाऱ्यांचा इरादा आहे. ‘अल-उला’प्रमाणे ‘नेओम’मध्येही भव्य स्टुडिओ उभे राहतायत. २२२ एकर एवढ्या भव्य जागेत निर्मात्यांची कार्यालयं, स्टुडिओ, पोस्ट-प्रॉडक्शन स्टुडिओज, व्हीएफएक्स स्टुडीओज, हॉटेल्स, कॉर्पोरेट पार्क अशा सर्व सोयी-सुविधांची उभारणी जोरात सुरु आहे.
अम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या जगभरातील मानवी हक्क संघटना मात्र सौदीमधील न्यायव्यवस्था, सामान्य नागरिकांच्या हक्कांची मुस्कटदाबी आणि सत्ताधारी क्राऊन प्रिन्सचा मनमानी कारभार याविरोधात सतत आवाज उठवत असतात.
सौदीमध्ये राजेशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आंदोलकांना जेरबंद करण्यात आलं, तुरुंगात त्यांचा छळ करण्यात आला. अनेकांना मृत्युदंड देण्यात आला. अशा पाशवी वृत्तीच्या राज्यकर्त्यांबरोबर हॉलिवूडने सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित करावेत, हे या संघटनांना मान्य नाही. म्हणूनच डिसेंबरमध्ये जस्टिन बिबरच्या सौदीमधील कॉन्सर्टला विरोध झाला होता.
जस्टिनने सौदीमधील कॉन्सर्ट रद्द करावी यासाठी अनेक प्रकारांनी त्याच्यावर दबाव आणला जात होता. अशाच प्रकारे विरोध झाला म्हणून पॉप गायिका निकी मिरज आणि WWE स्टार आणि अभिनेता जॉन सेना यांनी सौदीमधील इव्हेन्ट रद्द केले होते. (Saudi Arabia & Hollywood)
जस्टिनसारख्या सेलिब्रिटींना पुढे करून कट्टरवादी अशी आपल्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न सौदीकडून केला जातोय, महिलांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देऊन आपण आता कसे पुढारलेले आहोत, असं जगाला भासवलं जातंय, पण आजही मोठ्या प्रमाणावर तेथील नागरिकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे सौदीच्या देखाव्याला हॉलिवूडने बळी पडू नये असा एक मतप्रवाह आहे.
ऑक्टोबर २०१८ मध्ये ‘वॉशिग्टन पोस्ट’चे पत्रकार आणि वरिष्ठ राजकीय विश्लेषक जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे सौदीचे क्राऊन प्रिन्स आहेत, असा ठपकाही ठेवण्यात आला, पण पुढे काहीही कारवाई झाली नाही. (याच प्रकरणाचा मागोवा घेणारा, आवर्जून बघण्यासारखा माहितीपट ‘द क्राऊन प्रिन्स (The Crown Prince)’ युट्यूबवर उपलब्ध आहे).
जगभरातून याप्रकरणी टीका व्हायला लागली त्यानंतरच सौदीमध्ये भव्य कार्यक्रमांचं आयोजन व्हायला लागलं. जगाचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा सौदी राजेशाहीच्या प्रयत्न असला तरी त्यामुळे आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम राहणार असा आक्रमक पवित्रा मानवी हक्क संघटनानी घेतलेला आहे. (Saudi Arabia & Hollywood)
=====
हे देखील वाचा: हॉलिवूडच्या चित्रपटांना बसतोय चीनमधील सेन्सॉरशिपचा विळखा
=====
२०१८ मध्ये मल्टिप्लेक्स आगमनानंतर सौदीमधील तरुणाई मोठ्या प्रमाणावर हॉलिवूडकडे आकृष्ट झाली आहे. सौदीमधील वेगवेगळ्या शहरात २०२५ पर्यंत १५०० स्क्रीन्स असतील असा अंदाज आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या स्पायडरमॅनने सौदीमध्ये ३८ कोटी रुपयांचं विक्रमी ओपनिंग मिळवलं होतं. म्हणजेच हॉलिवूडसाठी सौदीची बाजारपेठ मोठी आहे आणि ती वाढतच राहणार आहे.
चित्रपट निर्मितीसाठी सौदीचे राजे पायघड्या घालून बसलेले आहेतच. असं असताना मानवी हक्क संघटनांकडून होणारा विरोध फारसा गृहीत धरला जाणार नाही, असंच सध्या चित्र आहे. हॉलिवूड आणि सौदी प्रशासनाकडून जगभरातील मीडियामध्ये पद्धतशीरपणे सौदीबद्दलचं गुणगान पसरवलं जातंय. (Saudi Arabia & Hollywood)
हॉलिवूडने ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेत काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं असावं. त्यामुळे येणाऱ्या काळात क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आणि सौदीमध्ये हॉलिवूड पताका उंचच उंच फडकत राहणार, असंच सध्यातरी वाटतंय.