ग्रेसी सिंग: ‘लगान’ चित्रपटाची ‘ही’ नायिका सध्या जगतेय एक ‘वेगळेच’ जीवन…
बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री ग्रेसी सिंगचा (Gracy Singh) आज वाढदिवस. ग्रेसी २००१ मध्ये आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटात तिने साकारलेली ग्रामीण भागातील गौरीची भूमिका खूपच गाजली होती. या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले होते. मात्र त्यानंतर तिने जास्त चित्रपट केले नाहीत. लवकरच तिने सिनेसृष्टीला राम राम ठोकला. अशा या अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया…
अभिनेत्री ग्रेसी सिंगचा (Gracy Singh) जन्म २० जुलै १९८० मध्ये दिल्लीत झाला. आज ती ४२ वर्षांची आहे. तिच्या वडिलांचे नाव स्वर्ण सिंग आणि आईचे नाव वीरजिंद कौर; त्यांचे २०१७ मध्ये निधन झाले. तिला एका छोटी बहिण लीसा सिंग आणि भाऊ रुबल सिंग आहेत. ग्रेसीने दिल्लीच्या मानव स्थळी या शाळेतून शिक्षण पूर्ण केले आणि कलेची पदवी घेतली.
मॉडलिंगमधून केली सुरुवात
ग्रेसीला नृत्याची लहानपणापासून खूपच आवड होती ती चांगली ओडिसी आणि भरतनाट्यम नर्तकी आहे. तिने सुरुवातीला आपला ‘द प्लॅनेट्स’ हा डान्स ग्रुप सुरू केला होता. यात तिला यशही मिळाले होते. मात्र नंतर अचानक ती मॉडेलिंगकडे वळली. मॉडेलिंगच्या जगात यशस्वी पदार्पण केल्यानंतर ग्रेसीला १९९७ मध्ये ‘अमानत’ या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिने जवळपास ५ वर्षे टीव्ही इंडस्ट्रीत काम केले. त्यानंतर तिने गुलजारचा चित्रपट ‘हुतूतू’मधून आपल्या सिने करिअरची सुरूवात केली.
‘लगान’नंतर आल्या होत्या बऱ्याच ऑफर
अभिनेता आमिर खानने लगानच्या ऑडिशनमधून तिला निवडले. खरंतर ही भूमिका प्रीती झिंटाला ऑफर करण्यात आली होती. पण तिने नाकारल्यामुळे ग्रेसीला (Gracy Singh) आमिरसोबत या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आणि तिला एक चांगला ब्रेक मिळाला.
२००१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि ग्रेसी प्रकाशझोतात आली. यानंतर ग्रेसीला बऱ्याच चित्रपटाच्या ऑफर आल्या मात्र तिने निवडक चित्रपटच केले. यात अजय देवगणसोबत ‘गंगाजल’, अनिल कपूर सोबत ‘अरमान’ आणि संजय दत्तसोबत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटांमध्ये ती झळकली. हे चित्रपटदेखील सुपरहिट ठरले आणि ग्रेसी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.
चित्रपट पडल्यामुळे खिन्न झाली होती अभिनेत्री
ग्रेसी बॉलीवूडमध्ये जितक्या लवकर लाेकप्रिय झाली तितक्याच लवकर ती प्रसिद्धीपासून दूर गेली. मुन्ना भाई एमबीबीएस नंतर ग्रेसी सिंगने (Gracy Singh) काही चित्रपटात काम केले मात्र ते यशस्वी झाले नाहीत. यामध्ये ‘मुस्कान’, ‘यही है जिंदगी’, ‘चंचल’, ‘देशद्रोही’, ‘देख भाई देख’ आणि ‘ब्लू माउंटेन’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र या चित्रपटांना हवे तसे यश न मिळाल्याने ग्रेसी खिन्न झाली.
पुन्हा मालिकांकडे
सिनेसृष्टित मन खिन्न झाल्यानंतर तिने लवकरच छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ग्रेसी २०१५ मध्ये टीव्ही शो ‘संतोषी माँ’ मध्ये दिसली. तिने २ वर्षें या मालिकेत काम केेले. या मालिकेतून ग्रेसी सिंग घराघरात पोहोचली आणि लोकप्रिय झाली. ग्रेसी अधूनमधून सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
एका नायिकेमध्ये असायला हवी ती सर्व प्रतिभा ग्रेसी सिंगमध्ये होती. मात्र तरीही ती बॉलीवूडमध्ये जास्त काळ टिकू शकली नाही. याचे कारण तिने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते. ती म्हणाली होती की, बॉलीवूडमध्ये दीर्घकाळ टिकून राहायचे असेल, तर एखाद्या गटात सहभागी व्हावे लागते. शिवाय काम मिळवण्यासाठी निर्मात्यांच्या पार्टीत सहभागी व्हावे लागते.
मॅनेजरच्या निधनानंतर मिळाला नाही एकही प्रोजेक्ट
ग्रेसी सिंगचे (Gracy Singh) मॅनेजर मिस्टर जोशी यांच्या निधनानंतर तिचे करिअर बदलून गेले. तिने निर्मात्यांना प्रोजेक्टसाठी फोन करणे बंद केले होते. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, माझे मॅनेजर मिस्टर जोशी मला फोन करुन नवीन प्रोजेक्टविषयी सांगत असत. मात्र २००८ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर मी कोणालाच कामासाठी फोन केले नाहीत. कारण माझा जास्त लोकांशी संपर्क नव्हता. त्यानंतर मी हळू-हळू सर्वांपासून दूर होत गेले. सध्या ही नायिका अनेकांच्या विस्मृतीत गेली असेल.
आता ब्रह्मकुमारीचे जीवन जगतेय ग्रेसी सिंह
मनोरंजन क्षेत्रापासून दूर गेलेल्या ग्रेसीने धार्मिकतेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ती ब्रह्मकुमारी संस्थेची सदस्य झाली आहे. त्यामुळे तिने लग्न केले नाही आणि सध्यातरी तसे करण्याचा तिचा विचारही नाही. ग्रेसी ब्रह्माकुमारी संघटनेत खूप सक्रिय असल्याचे सांगितले जाते. तिने तिथे अध्यात्माचे प्रशिक्षण घेतले आहे. लोक ग्रेसीला ‘दीदी’ म्हणत तिचा आशीर्वादही घेतात. एवढेच नव्हे तर, ती इस्कॉनशी संबंधित धार्मिक कार्यक्रमातही सहभागी होते.
========
हे देखील वाचा – एका गॉगलमुळे बिग बींचा चित्रपट आला होता आयटीच्या रडारवर; काय होता हा किस्सा?
========
मनोरंजनसृष्टीला रामराम करून ग्रेसीने हा वेगळाच मार्ग निवडला असला तरी अपयशाने खचून व्यसनाधीन अथवा नैराश्याची शिकार होऊन आयुष्य व्यथित करण्यापेक्षा तिने निवडलेला मार्ग नक्कीच चांगला आहे.
– राजेश्वरी बोर्डे