दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सरकारनामा: सिस्टीममध्ये टिकून राहायचं असेल, तर सिस्टीम समजून घेणं आवश्यक आहे
राजकारण आणि मनोरंजन ही दोन्ही क्षेत्र अशी आहेत जिथे ‘नेम, फेम आणि दाम’ सर्वकाही भरभरून मिळतं. सध्या राजकारणामध्ये चाललेली ‘नौटंकी’ आपण बघतोच आहोत. तसंच गेल्या काही वर्षात मनोरंजन विश्वातील राजकारणही प्रकर्षाने समोर येत आहे. तसं बघायला गेलं तर, राजकारण प्रत्येक क्षेत्रात असतंच. आजचा विषयही राजकारणाचा आहे. म्हणजे राजकारणावर आधारित चित्रपटाचा.
राजकारणावर आधारित बरेच चित्रपट येऊन गेले. या चित्रपटांमध्ये राजकारण दाखवताना सर्वसामान्यांच्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणामही तितक्याच प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. पण काही चित्रपट असे होते ज्याचं कथानक प्रेक्षकांना प्रचंड वास्तववादी वाटलं. असाच एक मराठी चित्रपट म्हणजे ‘सरकारनामा (Sarkarnama)’.
साधारणतः राजकारणावर आधारित चित्रपटांमध्ये समाजकारणावरही भाष्य केलं जातं. परंतु सरकारनामा (Sarkarnama) चित्रपटामध्ये तसा प्रयत्न न करता दिग्दर्शकाने कथानकावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळेच मूळ कथा सोडून चित्रपट कुठेही भरकटत नाही.
१९९८ साली आलेला ‘सरकारनामा (Sarkarnama)’ हा चित्रपट राजकारण, भ्रष्टाचार आणि त्यामध्ये अडकलेला एक प्रामाणिक सरकारी ऑफिसर या थीमवर आधारित होता. या थीमवर आधारित अनेक चित्रपट आहेत, तरीही सरकारनामा वेगळा ठरतो कारण यामध्ये दाखवण्यात आलेल्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला कुठेही खटकत नाहीत किंवा अनाकलनीय वाटत नाहीत. उलट त्या वास्तववादी वाटतात आणि प्रेक्षक कथेमध्ये गुंतत जातो.
विश्वास साळुंखे (अजिंक्य देव), महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून नोकरी करणारा अत्यंत प्रामाणिक आणि साधा सरळ ऑफिसर. एके दिवशी सकाळी इमारतींची पाहणी करत असताना त्याची नजर ‘सप्ततारा’ नावाच्या एका जुन्या बिल्डिंगकडे जाते.
‘सप्ततारा’ कुठल्याही क्षणी कोसळेल अशा बिकट परिस्थितीत असताना लोकांचं तिथे राहणं विश्वासला पटत नाही. तेथील रहिवाश्यांना तो ही बिल्डिंग धोकादायक असल्याचं पटवून द्यायचा प्रयत्न करतो. पण बिल्डिंग सोडून जायला कोणीही तयार होत नाही. विश्वास बिल्डिंग पाडण्याचा निर्णय घेतो. तिथून निघताना त्याची भेट होते तडफदार आणि निर्भीड पत्रकार वैजयंती पाटीलशी. परंतु तिच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर न देता विश्वास तिथून निघून जातो.
‘सप्ततारा’ पाडण्याचा विश्वासचा प्रवास सोपा नसतो. तरीही तो त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. परंतु त्याने काही करण्याआधीच सप्ततारा कोसळते. आणि यानंतर भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेमध्ये विश्वास अडकत जातो. अतिशय हुशारीने विश्वासला या प्रकारातून हटवून त्याला सस्पेंड करण्यात येतं. कारण या प्रकरणाचे धागेदोरे पार मुख्यमंत्र्यांपर्यंत (यशवंत देव) पोचलेले असतात.
विश्वासच्या प्रामाणिकपणाचा पुरावा असणारी फाईल गायब करण्यात येते. परंतु, तो हार मानत नाही. त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तो फाईलचा शोध घ्यायचा प्रयत्न करत असतो. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश येतं आणि फाईलचा शोध लागतो. पण तिथपर्यंत पोचणं सोपं नसतं. कारण फाईल मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात असते. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नाचीही बातमी येते आणि विश्वास आपली प्रेयसी रेणू (सुकन्या कुलकर्णी) हिच्यासह फाईल मिळविण्याची योजना बनवतो.
दुसरीकडे वैजूला मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नाची बातमी कव्हर करायला सांगण्यात येतं कारण मुख्यमंत्र्यांचा मुलगा कुमार (मिलिंद गुणाजी) हा तिचा आधीचा प्रियकर असतो. पण त्याच्या वागणुकीमुळे वैजू त्याच्यापासून दुरावलेली असते. तिची आणि कुमारची चांगली ओळख असल्यामुळेच इव्हेन्ट कव्हर करायला वैजूची निवड करण्यात येते.
इव्हेन्ट कव्हर करायला मुख्यमंत्र्यांच्या गावी गेलेल्या वैजूला तिचा जुना मित्र सुबोध (आशुतोष गोवरीकर) भेटतो, जो लग्नाचं व्हिडीओ शूटिंग करायला आलेला असतो. विश्वास आणि त्याची प्रेयसी रेणूही फाईलच्या शोधात त्याच गावात पोचतात.
चित्रपटामध्ये मुख्यमंत्र्यांच्या गावात राहणाऱ्या ‘चंदर’ नावाच्या तरुणाचं उपकथानकही जोडण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या लग्नकार्यात पुढे अनेक घटना घडतात ज्या ठराविक माणसं सोडून बाकी कोणापर्यंत कधीच पोचत नाहीत. पण नकळतपणे विश्वास त्याची प्रेयसी रेणू, वैजू आणि सुबोध त्यामध्ये अडकत जातात. परंतु या चौघांनाही याची कल्पना नसते.
चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख बजावली आहे. इन्स्पेक्टरच्या भूमिकेत ‘जगदीश पाटणकर’, मिनिस्टरच्या भूमिकेत ‘दिलीप प्रभावळकर’ यांच्या छोट्याशा भूमिकाही विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत. यांच्यासोबतच चित्रपटामध्ये शर्वरी जमेनीस, मकरंद अनासपुरे, यतीन कार्येकर, उपेंद्र लिमये, इ कलाकारांनीही छोट्या पण लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
जेमतेम अडीच तासांपेक्षाही कमी लांबी असणाऱ्या चित्रपटामध्ये एकामागोमाग एक घडणाऱ्या गोष्टी दाखवताना चित्रपट कुठेही ट्रॅक सोडत नाही की हे प्रसंग बघताना प्रेक्षक गोंधळत नाहीत. राजकारणाच्या दुनियेचा भयाण चेहरा, भष्ट्राचाराने पोखरलेली सिस्टीम, विश्वास आणि रेणूची हळवी प्रेमकहाणी तर, वैजू आणि सुबोधची सुरु होण्याआधीच संपलेली प्रेमकहाणी हे पैलूही यामध्ये दाखविण्यात आले आहेत. पण या गोष्टी कथानकाच्या प्रवाहाचाच एक भाग वाटतात आणि बघताना कुठेही खटकत नाहीत.
विश्वासला फाईल मिळते का? वैजू आणि सुबोधचं पुढे काय होतं? मुळात मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं लग्न पार पडतं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. राजकीय विषयावर चित्रपट काढताना अनेकदा भडक गोष्टी दाखवल्या जातात ज्या यामध्ये दाखवण्यात आल्या नाहीत. ही चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणावी लागेल.
=====
हे देखील वाचा – ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाबद्दलच्या १० अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील
=====
चित्रपटामध्ये हाणामारीची दृश्य अगदी अत्यल्प प्रमाणात आहेत. मुळात राजकारण डोक्याने खेळलं जातं आणि सत्याची लढाई लढायची असेल, तर मनात कितीही धगधगता निखारा असला तरी डोक्यावर बर्फ ठेवावाच लागतो. या गोष्टींचे भान ठेवून चित्रपट बनविल्यामुळे प्रेक्षकांना तो वास्तववादी, खरा वाटतो.
सरकारनामा (Sarkarnama) कहाणी आहे विश्वास सरपोतदारसारख्या प्रत्येक प्रामाणिक सरकारी कर्मचाऱ्याची ज्यांनी आपल्या प्रामाणिकपणाची किंमत मोजली आहे; वैजूसारख्या कणखर मुलीची जिच्यासाठी तिची तत्व आणि तिचं करिअर सर्वस्व आहे. सिस्टीममध्ये प्रामाणिक राहायचं की नाही हे व्यक्तिसापेक्ष असलं, तरी सिस्टीममध्ये राहायचं असेल, तर सिस्टीम समजून घेणं आवश्यक आहे, ही मोठी शिकवण ‘सरकारनामा (Sarkarnama)’ हा चित्रपट देतो.