जुनी नाती नव्याने उलगडणारा ‘झिम्मा २’
बाईपण म्हणजे काय याच्या सगळ्या व्याख्या मोडून काढते ती खरी बाई या वाक्यावर आधारित दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची फिल्म झिम्मा 2 !
कलाकृती मीडियाच्या आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, झिम्मा फिल्मला मिळालेल्या भरघोस यशानंतर जुन्या नव्या संचासह तयार केलेली ही फिल्म झिम्मा 2 (Jhimma 2 Review) अपेक्षेवर खरी उतरली आहे का ?
असं म्हणतात एका घरात एकापेक्षा जास्त बायका एकत्र असल्या की, भांड्याला भांडं आपटतच आणि या गोष्टीत ७ बायका पुन्हा एकदा एकत्र नव्या ट्रीपसाठी निघतात. ७ मैत्रिणींच्या ७ वेगवेगळ्या तऱ्हा आणि या सात बायकांच्या सात वेगवेगळ्या कहाण्या; पण हा समूह एका ट्रीपसाठी एकत्र येतो, तेव्हा काय काय घडतं यात गंमत आहे, आणि एकत्र येऊन आपल्या दुःखांना फाट्यावर मारून त्या खेळतात झिम्मा आयुष्याचा !!
या फिल्मची कथा थोडक्यात सांगायची झाली तर अशी की, आधी प्रमाणेच पुन्हा एकदा या सख्या नव्या ट्रीपसाठी सज्ज होतात, फरक एवढाच की यावेळी गोष्टीत असतो एक नवा सस्पेन्स आणि काही नवी पात्र, प्रत्येक पात्राचा स्वतःच्या परिस्थितीसोबत आणि भावनांसोबत एका नवा संघर्ष सुरू असतो. पण यांना एकमेकांशी जोडणारा धागा आणि आधार देणारा धागा हा की आधीच्या अनोळखी बायका यावेळी एकमेकांच्या जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या आहेत आणि प्रत्येकीला प्रत्येकीबद्दल प्रचंड आत्मीयता आहे. मुख्य पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर आणि क्षिती जोग यांची केमिस्ट्री तर अफलातून आहेच मागील गोष्टीप्रमाणे यांची यारी तुम्हाला यंदा ही भावेलच. मनातलं डोळ्यातून सांगण्याची खुबी प्रत्येक नटाला जमतेच असं नाही पण या चौघींच्या अभिनयातून एकमेकांच्याबद्दल वाटणारी काळजी, प्रेम, अस्वस्थता तुम्हाला शब्दावाचून कळले एवढं नक्की. (Jhimma 2 Review)
या बारकाव्यातून तुम्हाला या कसलेल्या आणि अनुभवी कलाकारांच कौशल्य दिसतं. सायली संजीव हिने साकारलेल्या कृतिका या पात्रातून गोष्टीत हॅपनिंग असं बरंच काही घडतं यावेळी थोड्या चुका आणि गडबडी करणारी कृतिका आपल्या मैत्रिणी आणि जवळच्या माणसांकडून बरच काही नवं शिकताना दिसते. पण अर्थात ७ बायका एकत्र म्हंटल तर खटके तर उडणारच, पण यामुळे त्यांना एकत्र आणणारा आणि जोडून ठेवणाऱ्या दुव्याच काम केलंय सिद्धार्थ चांदेकरने साकारलेल्या कबीर या पात्राने. गोष्टीत नेमकं वेगळं काय घडणार या सोबत प्रेक्षकांना उत्सुकता होती झिम्मामध्ये अॅडऑन झालेल्या नव्या चेहऱ्यांबद्दल म्हणजेच रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे यांची गोष्ट काय असणार याबद्दल ! (Jhimma 2 Review)
पण सस्पेन्स गुपित ठेऊन त्यांच्या पात्राबद्दल एवढंच सांगू शकतो की, रिंकू राजगुरूने साकारलंय निर्मिती सावंत यांच्या सुनेचं म्हणजेच तानियाच पात्र आणि शिवानी सुर्वे आहे सुचित्रा बांदेकर यांची भाची मनाली. तानिया ही हाऊस वाइफ असून करीयर किंवा वेगळं पॅशन शोधण्यापेक्षा आपल्या माणसांची काळजी घेणं कुल समजते, तर थोडी दुःखद पार्श्वभूमी असणारी मनाली स्वतः च्या प्रश्नांची उत्तर शोधणारी, आणि आत्मसन्मान जिवापेक्षा जास्त जपणारी मुलगी आहे. आणि या दोन नव्या पात्रांचा संगम जेव्हा जुन्या पात्रांशी होतो तेव्हा घडते खरी गंमत. मित्रांनो ती गंमत तर तुम्हाला थिएटरमध्ये ही फिल्म प्रत्यक्ष पाहायला गेल्यावरच कळेल.
आता थोडं तांत्रिक बाबींकडे वळूया, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी केलेला पात्रांचा वापर हा अफलातून आहे. त्यासोबतच काही बारकावे ज्यातून दिग्दर्शकाचं स्किल हे दिसल्या वाचून राहत नाही. उदा. एका सिनमध्ये गमती जमतीमध्ये एक कुक ऑफ ची कॉम्पिटिशन होते पण त्यात जुनी पिढी पाश्चात्य बेत बनवण्यावर भर देते तर नवी पिढी परंपरागत जेवण बनवण्यावर भर देते, जुन्या पिढीने केलेला नव्या गोष्टीचा आणि नव्या पिढीने केलेला जुन्या आणि परंपरागत गोष्टींचा स्वीकार या सिनमधून दिग्दर्शकाने फारच सुंदर रित्या दाखवला आहे आणि या एका सिन मधून आपल्याला संपूर्ण फिल्ममधल्या संघर्षाची छोटीशी झलक मिळते. (Jhimma 2 Review)
सत्यजित श्रीराम यांनी आपल्या cinematography मधून ही फिल्म आणि त्यातली पात्र फारच सुंदररित्या टिपली आहे. आणि याला उत्तम जोड दिलीये एडिटर फैसल महाडिक यांनी, सत्यजित यांनी टिपलेली आणि फैसल यांनी एडिट केलेली प्रत्येक फ्रेम आणि पात्रांचे भाव आपलं लक्ष वेधून घेतात. भन्नाट कलाकार आणि उत्तम तांत्रिकबाबी पेलणारी टीम यांना अमितराज यांच्यासारख्या संगीतकाराची जोड मिळाली तर ती फिल्म उत्कृष्ट दर्जाची होणार नाही का ? अमितराज यांनी तयार केलेली मराठी पोरी आणि पुन्हा झिम्मा ही गाणी अक्षरशः कानांना गाण्यांची आस लावतात. निर्माते ज्योती देशपांडे, आनंद राय आणि क्षिती जोग यांनी या फिल्मसाठी घेतलेले कष्ट तुम्हालाही फिल्म पाहताना जाणवतील एवढं नक्की ! एवढ्या उत्तम बाजू पाहिल्यावर आता वळूयात काही कमतरताबद्दल… (Jhimma 2 Review)
============
हे देखील वाचा : ‘या’ कपूरने आर के फिल्म्स मध्ये काम करायला दिला नकार
============
स्पेशली रिंकू राजगुरूने साकारलेलं पात्र जरी इंटरेस्टिंग असलं तरी तिची गोष्ट बाकींच्या मानाने तेवढी पाहायला मिळत नाही. थोडं सेम कबीरच्या पात्रासोबत घडतानाही आपल्याला दिसतं. अभिनेत्री निर्मिती सावंत या थोड्या फार आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये आपल्याला दिसतात. या गोष्टीत ७ बायकांच्या ७ वेगवेगळ्या गोष्टी जरी असल्या तरी प्रत्येक गोष्टीला न्याय किंवा स्पष्टता देता आली नाहीये. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांची कमतरताही थोड्या प्रमाणात जाणवते. त्यांचं काय झालं किंवा त्याही असायला हव्या होत्या अशी प्रतिक्रिया आल्यावाचून राहत नाही. पण प्रेक्षकहो या थोड्या बहुत कमतरता जरी असल्या तरी ही फिल्म प्रेक्षकांच्या मनात घर करेल एवढं नक्की !!
कलाकृती मीडिया झिम्मा २ ला ५ पैकी ४ स्टार देतंय..