‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जोधा अकबर- भव्यदिव्य प्रेमकथा साकारताना..
हिंदी चित्रपटातील प्रेमकथांचे मापदंड ठरलेले असतात. ती आणि तो, एक श्रीमंत एक गरीब, प्रेमाला विरोध आणि शेवटी सगळं गोड. पण यापलीकडे इतिहासाचे संदर्भ घेऊन नव्या दृष्टीने एखादी प्रेमकहाणी मांडली जाते तेव्हा त्या नाविन्याच्या रसिक प्रेमात पडतात. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर’ हा चित्रपट प्रेक्षकांना भावला तो याच सादरीकरणाच्या वेगळेपणाने. या चित्रपटाची ही पडद्यामागची कहाणी.
स्वदेश चित्रपटाच्या जुळवाजुळवीत व्यस्त असताना अभिनेता, लेखक हैदर अलीने के.आसीफच्या मुगल-ए- आझमला समांतर कथा चित्रपटातून मांडण्याची इच्छा आशुतोष गोवारीकर यांच्याकडे व्यक्त केली. यात दोन शक्यता होत्या. मुगल-ए-आझमचा रिमेक किंवा त्या कथानकाच्या पुढची कथा. पण आशुतोष गोवारीकर यांनी प्रिक्वेल अर्थात अकबर जोधाची कथा सांगण्याचा विचार मांडला जो हैदर अली याला पटला.आणि स्वदेश नंतर लगेच आशुतोष यांनी ‘जोधा अकबर’ची घोषणा केली. अर्थातच हे शिवधनुष्य होतं. ऐतिहासिक त्यातही मुघलकालीन प्रेमकथा मांडताना थोडीशीही चूक महागात पडू शकत होती. आशुतोष यांनी त्यांच्या कार्यपद्धतीनुसार इतिहासकारांशी दीर्घ चर्चा करुन खूप सारा अभ्यास करुन पटकथा तयार केली.
हे वाचलंत का: चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…
चित्रपटाच्या सुरुवातीपासून अकबर म्हणून ऋतिक रोशन आणि जोधाबाई ऐश्वर्या राय ही नावं आशुतोष यांच्या डोक्यात पक्की होती. ही निवडही इतकी सहज झाली. एकेदिवशी आशुतोष यांनी ऐश्वर्या राय हिला मेसेज केला. “विल यु बी माय जोधा?” आणि ऐश्वर्यानेही स्माईलीसह तत्काल उत्तर दिलं. “येस आय विल”. आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शकीय कौशल्यावर ठेवलेला तो विश्वास होता.
‘लगान’ आणि ‘स्वदेश’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, गीतकार जावेद अख्तर, संगीतकार ए.आर.रहमान आणि कलादिग्दर्शक नितीन देसाई हे समीकरण इतकं मस्त जुळलं होतं की तेच ‘जोधाअकबर’ मध्ये कायम ठेवलं गेलं.
सध्या ऐतिहासिक चित्रपटातील ब-याचशा गोष्टी व्हिएफएक्स तंत्राने सुलभपणे दाखवता येतात पण २००८ मध्ये प्रदर्शित या चित्रपटात गोवारीकर यांनी वास्तव चित्रीकरणावर भर दिला. चित्रपटाची कथा ज्या महालांमध्ये घडली तिथे प्रत्यक्ष चित्रीकरण अशक्य होतं कारण हे सगळे महाल आज पर्यटनकेंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत. थेट परदेशातून हे वास्तूवैभव पहायला येणा-या पर्यटकांना रोखणं शक्य नव्हतं. त्यामुळे चित्रपटात दाखवला गेलेला महालांचा बाह्यभाग खरोखरच्या महालाचा आहे तर अंतर्भाग नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कौशल्याने कर्जतमधील एनडी स्टुडीयोत उभारलेला आहे. आमेर आणि आग्रा किल्ल्याचे जवळपास लाखांहून अधिक फोटोग्राफी क्लीक करून ते समोर ठेवून देसाई यांनी हा सेट उभारला असल्यानं तो अत्यंत वास्तवदर्शी वाटतो.
चित्रपटाच्या शुटींगमध्ये ८० हत्ती, १०० घोडे,५५ उंट वापरले गेले होते. शिवाय ‘अझीमो शाह शहनशहा’ गाण्याच्या तसंच युद्धप्रसंगाच्या चित्रीकरणात हजारो स्थानिक नागरिकांना सामावून घेण्यात आलं होतं. अर्थात दिवसदिवसभर चालणा-या शुटींग ची सवय नसल्याने ही लोकं कंटाळून जात. युद्धप्रसंगी कंटाळलेली लोकं दिसू नयेत म्हणून या स्थानिकांना कव्हर करणारे एक्स्ट्राज दर्शनी भागात पेरलेले असायचे.
हे देखील वाचा: शान सिनेमाची झाली ४० वर्षे पूर्ण
जोधाअकबर गाजण्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे या चित्रपटातील पेहराव आणि दागिने. नीता लुल्ला यांनी या गोष्टींवर प्रचंड मेहनत घेतली होती. हे काम कठीण होतं कारण केवळ मुख्य पात्रच नव्हे तर अगदी किरकोळ पात्रं,एक्स्ट्राज यांचे कपडेही डिझाईन करणं अत्यावश्यक होतं. याचा जवळपास दीड वर्षं नीता यांनी अभ्यास केला. त्याकाळी कोणतं कापड वापरलं जाई यावर प्रत्यक्ष जयपूरमध्ये राहून संशोधन केलं. चित्रपटात राजपूत मंडळींना लाल,पिवळं, केशरी आणि मुघलांना ब्राऊन,लाल,बेज रंगाचे कपडे दिलेले आपण पहातो. मुघलकाळाचा विचार करुन अकबर आणि जोधाबाई यांना जरदोसी तसंच कुंदनकाम केलेले पेहराव दिलेले आलेले दिसतात.
जोधाअकबर चित्रपटातील दागिने ‘तनिष्क’ या ब्रॅण्डकडून खरेदी करण्यात आले. २०० कारागीरांनी जवळपास ६०० दिवस काम करून ३०० किलोच्या जवाहिरापासून हे दागिने घडवले होते. त्या दागिन्यांच्या डिझाईनचाही मुघलकाळानुसार खास विचार करण्यात आला होता. चित्रपटानंतर या दागिन्यांची फॅशन रुढ झाली.
चित्रपटाच्या आवश्यकतेनुसार तलवारबाजी, घोडेस्वारी यांचं खास प्रशिक्षण प्रमुख पात्रांना दिलं गेलं शिवाय अकबराच्या भूमिकेसाठी ऋतिकनं उर्दूचं विशेष प्रशिक्षण घेतलं. राजघराण्यातील काही व्यक्तिमत्वांकडून उठणे बसणे,नमस्कार तसंच अन्य रितीरिवाजांचं आकलन दोन्ही प्रमुख पात्रांना करुन देण्यात आलं होतं.
या भव्यदिव्य साकारण्यापलिकडे, महाग पेहराव दागिन्यांपलिकडे जोधा अकबर लक्षात रहातो तो शाही, हळुवार प्रेमाच्या तरलतेनं. चित्रपटाला मिळालेल्या विविध पुरस्कारांच्या पलिकडे धर्मनिरपेक्ष प्रेम, विवाहोत्तर प्रेम याचा जो सुरेख आलेख हा चित्रपट मांडतो, त्यामुळे पुन्हा पुन्हा अनुभवायच्या वर्गात हा चित्रपट जाऊन बसतो. सर्वसामान्यांच्या मनातही एक शाही, दिमाखदार प्रेमकथा असतेच. तिचं मूर्तरुप म्हणजे जोधा अकबर.