जॉनी डेप पंचवीस वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत
काही महिन्यांपूर्वी पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्ड हिच्या विरोधातील मानहानीच्या खटल्यामुळे ‘जॉनी डेप’ (Johnny Depp) जगभर चर्चेत होता. तो खटला जॉनी डेपने जिंकला, पण आता अंबर हर्डने त्या निकालाविरोधात पुन्हा अपील केलं आहे. वैयक्तिक आयुष्यात हा गदारोळ सुरु असतानाच जॉनी डेपने आणखी एक घोषणा केली आहे. तो पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसणार आहे. पंचवीस वर्षांपूर्वी जॉनी डेपने ‘द ब्रेव्ह’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, ज्यात तो स्वतः आणि ‘मार्लन ब्रँडो’ प्रमुख भूमिकेत होते.
आता जॉनी एका अवलिया कलाकाराच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची जुळणी करतोय. पॅरिसमध्ये १९१० च्या दशकात गाजलेला आणि आज आख्यायिका बनलेला चित्रकार आणि शिल्पकार आमेदिओ मोदील्यानीची (Amedeo Modigliani) गोष्ट जॉनी डेप सांगणार आहे. या चित्रपटाची पटकथा डेनिस मॅकिंटॉयर (Dennis McIntyre) यांच्या नाटकावर आधारित आहे.
मोदील्यानी केवळ ३६ वर्षं जगला. तो पाब्लो पिकासोचा मित्र होता पण कलाजगतातला प्रतिस्पर्धी होता. त्याची चित्रं आणि शिल्पं यावर समीक्षकांकडून टीका होत होती, त्याला व्यावसायिक यशही मिळत नव्हतं. अपयशाने खचून गेलेल्या या महान कलाकाराच्या आयुष्यात असे दोन दिवस आले जेव्हा तो झपाटून कामाला लागला, तेच दोन दिवस त्याच्या कारकिर्दीला नवं आणि यशस्वी वळण देणारे ठरले.
जॉनी डेपचा चित्रपट याच दोन दिवसांत घडलेल्या घटनांवर आधारित आहे. दुर्दैवाने ‘मोदील्यानी’च्या मृत्यूनंतर म्हणजे १९२० नंतर त्याच्या कार्याचं महत्त्व लोकांना कळलं आणि त्याची गणना महान कलाकाराच्या झाली. अशा मनस्वी कलाकाराचं कष्टप्रद आयुष्य चित्रपटातून लोकांसमोर आणणं हा माझ्यासाठीही गौरव आहे आणि तितकंच मोठं आव्हानही आहे, अशा शब्दात जॉनी डेपने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जॉनी (Johnny Depp) दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचा निर्माताही आहे आणि या चित्रपटाचा सह-निर्माता आहे महान अभिनेता ॲल-पचिनो! ॲल-पचिनो यांनी काही वर्षांपूर्वी डेनिस मॅकिंटॉयरचं ‘मोदील्यानी’ हे नाटक पाहिलं आणि ते भारावून गेले. त्यांनी जॉनी डेपबरोबर अनेकदा या विषयावर चर्चा केली आणि अखेर चित्रपटाचा योग जुळून आला. ‘मोदिग्लियानी’चं चित्रीकरण २०२३ मध्ये सुरु होणार आहे.
====
हे देखील वाचा – बॉलिवूडचे हे १० लोकप्रिय चित्रपट आहेत हॉलिवूड चित्रपटांचे ‘अनऑफिशिअल रिमेक’
अँबर हर्ड विरोधातील खटल्यानंतर जॉनी डेपने अभिनेता म्हणून पहिला चित्रपटही साईन केलाय. जांन दयु बॅरी (Jeanne du Barry) या फ्रेंच चित्रपटात तो पंधराव्या किंग लुईची भूमिका साकारतोय. २६ जुलै पासून त्याचं चित्रीकरणही सुरु झालंय. २०२० साली आलेल्या ‘मीनामाटा’ नंतर ही त्याची पहिलीच फिल्म आहे.
यापूर्वी २००४ साली ‘मोदील्यानी’ याच नावाने चित्रपट येऊन गेलेला आहे, ज्यात ‘मोदील्यानी’ची भूमिका अँडी गार्सिया यांनी साकारली होती. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी होऊ शकला नाही. स्टीफन होल्डिंग सारख्या समीक्षकांनी तर ‘हा चित्रपट म्हणजे महान कलाकाराच्या आयुष्यावर किती वाईट चित्रपट बनू शकतो याचं उत्तम उदाहरण’ असा शेरा मारला होता.
याच कारणांमुळे जॉनी डेपवर (Johnny Depp) मोठी जबाबदारी आहे. कलाकाराचं आयुष्य पडद्यावर साकारणं नेहमीच दिग्दर्शकांसाठी मोठं आव्हान राहिलेलं आहे. ‘लस्ट फॉर लाईफ’ ते ‘फ्रीडा’ आणि ‘पोलॉक’ ते ‘बिग आईज’ अशी हॉलिवूड चित्रपटांची यादी मोठी आहे. परिणामांची, टीकेची किंवा अगदी पराभवाची पर्वा न करता मनस्वी आणि बेधुंद आयुष्य जगणाऱ्या या कलाकारांचं हॉलिवूडला नेहमीच आकर्षण वाटत आलेलं आहे. दिग्दर्शक म्हणून पहिल्या प्रयत्नात जॉनी डेप पंचवीस वर्षांपूर्वी अपयशी ठरला होता, पण आता तो प्रगल्भ झालाय आणि म्हणूनच महान कलाकारावरील तितक्याच महान चित्रपटाची अपेक्षा त्याच्याकडून ठेवायला हरकत नाही.
– अमोल परचुरे