Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

मायानगरीत स्वत:चं अस्तित्व सिद्ध करणारा हरहुन्नरी कलावंत: आशिष नरखेडकर
कुणीतरी एकदा आशिषच्या वडिलांना म्हटलं, “काय हो, काय करतोय पोरगा सध्या? तुम्हाला सांगितलं होतं, हे क्षेत्र बेभरवशाचं आहे. त्याला मुंबईत पाठवू नका. भल्याभल्यांची डाळ शिजत नाही तिथं.” वडिलांनी फक्त स्मित केलं. त्यामागे होता आशिषबद्दलचा कमालीचा विश्वास. आपलं नाणं खणखणीत आहे, याची त्यांना आधीपासूनच पक्की खात्री होती. काहीच दिवस गेले अन् आशिष नामक या ताऱ्याची चमक सगळीकडे पसरू लागली.
आशिष नरखेडकर (Ashish Narkhedkar)… कास्टिंग डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, अभिनेता एवढ्यावरच त्याचं टॅलेंट थांबत नाही, तर कित्येक गुण त्याच्यात ठासून भरले आहेत. बरीच वाद्ये तो वाजवतो. ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजमुळे सध्या तो चर्चेत आहे. बालनाट्यांपासून सुरू झालेला त्याचा प्रवास मालिका, सिनेमा, वेबसीरिजपर्यंत येऊन पोहोचला. मायानगरीत आज त्याचं नाव आहे. त्याची वाटचाल प्रचंड मेहनतीची, रोचक अन् इतरांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. सरस्वतीचा त्याला ‘आशिष’ आहे.
आशिष मूळचा चंद्रपूरच्या ऊर्जानगरचा. कलेचं वातावरण घरातच होतं. आजोबा निळकंठ नरखेडकर प्रसिद्ध फोटोग्राफर. ते तबलाही चांगला वाजवायचे. नागपूरच्या मूनलाइट स्टुडिओत ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यरत होते. वडील व्यंकटेश नरखेडकर एमएसईबीत नोकरीला असले तरी कलासक्त. तेही चांगले फोटोग्राफर. कलेचा प्रकाश नरखेडकर कुटुंबीयांत पसरला. आशिषची आई शुभदा ऊर्जानगरच्या पहिल्या महिला फोटोग्राफर. एवढंच काय तर, बहीण श्वेता शिंगरू आणि भाऊ अभिजित यांचाही नागपुरात फोटोग्राफीचा व्यवसाय आहे.

सर्वप्रथम छायाचित्रण या कलेशी आशिषचा संबंध आला. त्याच्यात अभिनय कौशल्यही बालपणापासूनच विकसित होत होतं. चौथीतच होता तो, दिलीप केतकर यांच्या नाटकात त्यानं पहिल्यांदा काम केलं. कामगार कल्याण मंडळाच्या बालनाट्यांतून तो काम करू लागला, पुरस्कार पटकावले. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जयश्री कापसे यांच्या नाट्यशिबिरांतही त्याचा सहभाग होता.
ज्येष्ठ रंगकर्मी व महाऔष्णिक विद्युत केंद्रातील वरिष्ठ अधिकारी रमेश थोरात यांनी त्याला हेरलं, पथनाट्यांसाठी प्रोत्साहित केलं. खास एमएसईबीसाठी पर्यावरणाचे महत्त्व सांगणारी पथनाट्ये आशिष व त्याच्या सहकाऱ्यांनी सादर केली. याच दरम्यान खाडीलकर गुरुजींकडून त्यानं तबल्याचं शिक्षण घेतलं, मध्यमापर्यंत परीक्षा उत्तीर्ण केली. इतर वाद्येही शिकला.
आशिष तेव्हा नववीला होता. त्याकाळी राज्यशासनाने पहिल्यांदाच राज्य बालनाट्य स्पर्धा सुरू केली होती. बालनाट्यात सहभागी व्हायचं तर विशिष्ट वयोमर्यादा निश्चित होती. आशिषच्या हाती त्यावेळी फक्त एक वर्ष होतं. ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी यांनी आशिषला स्पर्धेतील बालनाट्य करण्यासाठी प्रोत्साहित केलं. श्रीपाद जोशी लिखित व सुनील देशपांडे दिग्दर्शित ‘खेळाला अंतच नाही’ या नाटकातील आशिषनं साकारलेलं झंप्या हे पात्र चांगलंच गाजलं. त्याला अभिनयाचं रौप्यपदक मिळालं. यामुळे आत्मविश्वास वाढला.
आता दहावीचं वर्ष होतं. त्यामुळे साहजिकच घरी काळजी होती. तरी बाबांनी प्रोत्साहन दिलं. दहावी उत्तीर्ण होऊन आता अकरावी प्रवेशाची वेळ आली. त्यावेळी जास्तीत जास्त मित्र सायन्सला प्रवेश घेत होते. मात्र, बाबांनी आर्ट्सचा सल्ला दिला. आशिष थोडा खट्टू झाला. त्याकाळी आर्ट्स हे सायन्सच्या तुलनेत जरा कमी दर्जाचं मानलं जात होतं. मात्र, बाबांनी समजावलं, “तुला कलाक्षेत्रात करिअर करायचं असेल, तर आर्ट्सशिवाय पर्याय नाही.” शेवटी आशिषनं या शाखेला प्रवेश घेतला. त्यावेळी कलाक्षेत्रात काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले बरेचसे लोक मुंबईला जायला निघाले होते. आशिषलाही हे क्षेत्र खुणावत होतं. मात्र, “हे क्षेत्र अस्थिर आहे, मुंबईकडे जाऊन काय करणार”, असं आजूबाजूचे लोक सांगत होते. आशिषच्या मनातील उर्मी पाहून बाबा मात्र ठाम होते.

इकडे आशिष नाटकं गाजवत होता, पारितोषिकं पटकावत होता. त्यावेळी राज्य नाट्यस्पर्धांची परीक्षणं वर्तमानपत्रांत छापून येत. त्यात आशिषच्या कामाचं कौतुक होत होतं. त्याच्याविषयीचे खास लेख प्रकाशित होत होते. तो आनंद वेगळाच होता. बळ मिळत होतं.
आता कलाक्षेत्राला पूर्णत: झोकून द्यायचं होतं. त्यासाठी रीतसर प्रशिक्षण गरजेचं होतं. त्यावेळी साताऱ्याला पीडीए या प्रसिद्ध संस्थेचं नाट्यशिबिर होतं. मूळचे सांगलीकर प्रकाश गडबे एकेकाळी चंद्रपूर आकाशवाणीला उद्घोषक होते. राज्य नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने आशिषची त्यांच्याशी ओळख झाली होती. चंद्रपूरच्या बाहेर, सातारा-सांगलीकडे गडबेच ओळखीचे. त्यांच्या मदतीनं आशिष साताऱ्यात दाखल झाला. बाबाही सोबत होते. साताऱ्यात काही चित्रपटांचे चित्रीकरण होते. यानिमित्तानं ते बघता येईल, ओळखी होतील, हीसुद्धा आशा होती.
पीडीएचं शिबिर संपलं. आशिषच्या हाती हॉटेलचं भाडं आणि काही पैसे देऊन बाबा चंद्रपूरला परतले. इकडे काही दिवसांत आशिषकडचे पैसे संपले. साताऱ्यात चित्रीकरण सुरू असायचे मात्र, एकाच दिवसात कुण्या दिग्दर्शकाची ओळख होईल अन् काम मिळेल, असं नव्हतं. साताऱ्यात विजय लॉजसमोरच्या एका एसटीडी बूथमध्ये आशिषचा काही दिवस मुक्काम होता. नंतर पुण्याच्या एका नाट्यशिबिराला तो गेला. फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घेण्याची इच्छा होती. त्याचवेळी ललित कला केंद्राविषयी कळलं. तिथून नाट्यशास्त्राची पदवी उत्तीर्ण केली. सतीश आळेकर, राजीव नाईक असे अनेक दिग्गज गुरु आशिषला लाभले. पुढे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे त्यानं नाट्यशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
ललित कला केंद्रात असतानाच पुण्यात राजकुमार संतोषी दिग्दर्शित, अजय देवगण नायक असलेल्या ‘हल्लाबोल’चं शूटिंग सुरू होतं. सुधीर उमरे हा मित्र त्या चित्रपटाचं कास्टिंग करत होता. राजकुमार संतोषींना थिएटर आर्टिस्ट हवे होते. संवाद नव्हते, मात्र सीन होते. आशिषसह काहीजण चित्रीकरणाच्या स्थळी गेले. त्याच्यासह पाच-सहा मुलांना निवडलं गेलं. चार-पाच सीन झाले होते. मात्र, एडिटिंगमध्ये काहीच सीनमध्ये दिसता आलं. संतोषी स्वत: सीन समजावून सांगायचे. हा अनुभव समृद्ध करणाराच होता.

आता तो मायानगरी मुंबईत दाखल झाला. सह्याद्री वाहिनीच्या काही मालिकांमधून कामं केली. अनेक प्रायोगिक नाटकांमधून अभिनय करण्याचीही संधी मिळाली. त्याचदरम्यान राही बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ची घोषणा झाली. त्याचं कास्टिंग सुरू करायचं होतं. एका मैत्रिणीचा फोन आला, “सिनेमात मराठी पात्रे भरपूर आहेत. तू कास्टिंग करशील का”, असं विचारलं. आशिषनं होकार दिला अन् हॅरी परमार यांना भेटला. कास्टिंग असोसिएट म्हणून त्याचा हा पहिला चित्रपट.
पहिलाच प्रोजेक्ट असा मिळाला, ज्यात स्टॅंडर्ड पद्धतीनं कास्टिंग करता आलं. नंतर ‘हंटर’ चित्रपट, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेसाठीही त्यानं कास्टिंग केलं. दोन वर्षे ‘एस्सेल व्हिजन’ या निर्मितीसंस्थेसाठी त्यानं कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. कामं वाढू लागली होती. आता ‘प्लॅनेट मराठी’वर गाजत असलेल्या ‘मी पुन्हा येईन’ सीरिजचा तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे. लेखक-दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्या आग्रहावरून त्यानं या सीरिजमध्ये भूमिकाही केलेली आहे.
कास्टिंग सोपं नाही…
आधीच्या काळात स्वत: दिग्दर्शक व त्याची टीम पात्रनिवड अर्थात कास्टिंग करायचे. अलीकडे कास्टिंग डायरेक्टर हे पद निर्माण झालंय. स्टार्सच्या व्यतिरिक्त इतर कलावंत निवडीची जबाबदारी त्यांच्याकडे असते. मात्र, हे काम सोपं नाही.
‘तुंबाड’चा अनुभव सांगताना आशिष म्हणाला, “कलाकार शोधण्यासाठी आम्ही कोकणात गेलो. भूमिकेच्या गरजेनुसार कुठून कुठून कलावंत शोधले. दिग्दर्शकाला शॉर्टलिस्ट दिली. कथेतलं नेमकं पात्र काय, हे लक्षात घेऊन एका भूमिकेसाठी अनेक कलावंत शोधावे लागतात. मग, त्यातून निवड होते. एखाद्या सीनमध्ये पाच मित्रांची गँग दिसत असली तरी ते वेगवेगळे, वेगळ्या उंचीचे, स्वभावाचे असावेत, अशा बाबींची काळजी घ्यावी लागते. मराठीत अजून तरी कास्टिंग डायरेक्टर ही पद्धत म्हणावी तशी रुळलेली नाही. तिथं कास्टिंग कोऑर्डिनेटर असतात.”

ओटीटीची स्पर्धा आहेच
मोठ्या पडद्याला ओटीटीचा धोका आहे असं वाटतं का, यावर आशिष म्हणतो, “कोणत्याही माध्यमांना एकमेकांपासून धोका नाही. मात्र, ओटीटीनं मोठ्या पडद्यासमोर समांतर स्पर्धा जरुर निर्माण झाली आहे. करोना लॉकडाउनच्या काळात ओटीटी अधिक भरात आलं. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणायचं असेल, तर सिनेमांत आता वेगळे प्रयोग निर्माण करण्याची गरज आहे. प्रेक्षकांसमोर आता पर्याय बरेच उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना गृहीत धरून चालणार नाही. आधी सिनेमा म्हटला तर सॅटेलाइटचे हक्क, थिएटर इथपर्यंतच विचार मर्यादित होता. आता कुठल्या ओटीटीला सिनेमा विकला जाईल, हेही आधी पाहिलं जातं. बदलत्या माध्यमांचा हा महिमा आहे.”
बाबा सेफ्टी झोन…
“आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्ती भेटत जातात. त्यांच्याकडून आपण शिकत जातो, त्यांचा प्रभाव पडत जातो. मात्र, माझ्या बाबांचा माझ्यावर अमिट असा प्रभाव आहे. त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती आहे. इतरांना वाटतं, आपल्या मुलानं नोकरी करावी. बाबांनी तसा आग्रह कधीच धरला नाही. त्यांचा आधीपासूनच व्यवसायावर भर होता. वेळोवेळी बळ दिलं त्यांनी. आजही मी वेळोवेळी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधतो. त्यांच्याशी सर्व गोष्टी शेअर करतो, मतंही मागतो. ते माझा सेफ्टी झोन आहेत”, असं आशिष गहिवरून सांगतो. माध्यम क्षेत्रात कार्यरत पत्नी सुप्रिया यांचीही साथ आहे. आशिष-सुप्रिया यांच्या संसारवेलीवर पाच वर्षांचं ‘पर्णिका’ नावाचं फूल उमललं आहे.
========
हे देखील वाचा – सामाजिक जाण असलेली संवेदनशील कलावंत ‘घाडगे अँड सून’ फेम रिचा अग्निहोत्री
========
‘प्लॅनेट मराठी’वरील एक सीरिज आणि काही चित्रपटांचं काम सध्या सुरू आहे. आता त्याला लिखाण करायचं आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. आपल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारा आशिष मुळातला साधेपणा मात्र विसरलेला नाही. तो कमालीचा नम्र आहे, जमिनीवर आहे. अंगी गुण आणि सोबतीला नम्रता असली की कुठलीही वाट सुकर होत जाते. आशिषची नुसती वाटचाल सुरू नाहीय, तर तो यशस्वीपणे झेपावतो आहे.