Sikandar : सलमानच्या सिकंदरने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली बक्कळ कमाई!

‘शिव’धनुष्य समर्थपणे पेलणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर
कॉलेजचे ते दिवस होते. दिग्पाल आपल्या मित्रांसोबत ‘थ्री हंड्रेड (३००)’ हा हॉलिवूडपट पाहायला गेला होता. पडद्यावर चित्रपट सुरू होता. मात्र, दिग्पालच्या मनात वेगळीच वादळं घोंघावत होती. आपलं अस्तित्व जपण्यासाठी अवघे तीनशे सैनिक लाखो शत्रूंशी भिडताहेत, ही कथा त्याच्या मनात खोलवर पोहोचली होती. आपले बाजीप्रभू अन् कित्येक वीरांचीही गोष्ट तर अशीच आहे. आपल्या इतिहासात असे कित्येक प्रसंग आहेत. मग ते पडद्यावर का येऊ नयेत, असा प्रश्न त्याला छळू लागला. इथूनच कदाचित ‘दिग्पाल लांजेकर’चा नव्यानं जन्म झाला होता. (Journey of Digpal Lanjekar)
दिग्पाल लांजेकर… मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला ध्येयवादी, गुणी दिग्दर्शक. मराठी चित्रपटसृष्टीला त्यानं जे काही दिलंय, त्याची मोजदाद कशातच शक्य नाही. छत्रपती शिवराय अन् त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास त्यानं जागतिक पातळीवर नेऊन ठेवलाय. छत्रपतींच्या इतिहासातील अष्टक तो पूर्ण करतोय, ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. यामागे त्याचा संघर्ष, मेहनत मोठी आहे.
‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ इथपर्यंतची मजल त्यानं मारलेय. पुढच्या चौकारासाठी तो सज्ज आहे. बालपणापासून मनात फुटलेल्या शिवभक्तीच्या अंकुराचा सिनेमारूपाने वटवृक्ष होत आहे. (Journey of Digpal Lanjekar)

दिग्पाल मूळचा रत्नागिरीचा. वडील सुनील लांजेकर यांचा तिथं व्यवसाय होता. कालांतरानं व्यवसाय बुडाला. त्यानंतर आणखी एक दु:खाचा डोंगर लांजेकर कुटुंबीयांवर कोसळला तो सुनील यांच्या अपघाती निधनामुळे. दिग्पाल व त्याचा भाऊ निखिल दोघेही तेव्हा लहान होते. आई स्मिता यांनी कुटुंब सांभाळलं.
काही दिवसांनंतर दिग्पालला शिक्षणासाठी आजोबांकडे पुण्याला पाठविण्यात आलं. दिग्पालची खऱ्या अर्थानं जडणघडण पुण्यातच झाली. शाळकरी वयातच त्याला नाटकांचं वेड लागलं. छत्रपती शिवरायांवर आधीपासूनच भक्ती. पुण्यातील पेठा, वाडे मनात इतिहासाची रुजवण करीत होते.
आजोबांसोबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जयसिंगराव पवार आदींच्या व्याख्यानांना जाता आलं. त्यातून प्रेरणा मिळत गेली. छत्रपती शिवराय व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कथा भव्य माध्यमातून समाजासमोर याव्यात, असं तिथंच वाटू लागलं होतं. (Journey of Digpal Lanjekar)
विद्यार्थीदशेत असतानाच त्यानं अनेक एकांकिका गाजवल्या, पुरस्कारही मिळवले. अकरावी-बारावीत असताना विनय आपटेंना एका मालिकेसाठी असिस्ट करण्याची संधी मिळाली. संजय सूरकर, राजदत्त यांच्याकडेही त्यानं काम केलं. त्यामुळे अनुभव येत गेला. आपला मराठी इतिहास समाजासमोर यावा, हा ध्यास मात्र कायम होता.

यादरम्यान, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘तू माझा सांगाती’ या मालिकांसाठी कामं केली. ‘सखी’ मालिकेत तो नायकाच्या भूमिकेत होता. काही काळ गेला. संदीप जाधव तेव्हा एक मालिका करीत होते. त्यांचा एक कलाकार आजारी पडला होता. त्यांनी दिग्पालला त्या भूमिकेसाठी विचारलं. मात्र, याच वाहिनीवरील एका मालिकेत त्यानं नायक साकारला होता. जाधव यांच्या मालिकेत नायिकेचा भाऊ साकारायचा होता. (Journey of Digpal Lanjekar)
“दीड महिन्याचंच काम आहे”, जाधव यांनी सांगितलं. त्यांचा शब्द टाळायचा नव्हता म्हणून दिग्पालनं ही भूमिका स्वीकारली. त्यावेळी संदीप जाधव यांनाही निर्माता म्हणून पुढं यायचं होतं. “तुझ्याकडे काही आहे का”, असं त्यांनी विचारलं तेव्हा दिग्पालनं ‘फर्जंद’विषयी सांगितलं. ‘तू काळजी करू नकोस, काम सुरू करू’, असा विश्वास त्यांनी दिला. दिग्पालला बळ मिळालं होतं.
असा घडला फर्जंद…
शिवचरित्रात लपलेले खरेखुरे ‘हिरोज’ पुढं आणण्याचा ध्यास दिग्पालनं घेतलाच होता. पहिली कथा डोक्यात आली ती ‘कोंडाजी फर्जंद’ यांची. ६० मावळ्यांना घेऊन अडीच हजार शत्रूंचा नि:पात करणं, ही साधी गोष्ट नव्हती. ती आधी लिहून काढायचं दिग्पालनं ठरवलं. त्यासाठी आधी खूप वाचन केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीचा इतिहास साक्षात जगलेले निनाद बेडेकर यांच्याकडे जाऊन सात वर्षे गिरवलेले धडेही इथं कामी आले.
मालिका, नाटकं करत असताना पाच महिन्यांचा ब्रेक मिळाला होता. दिग्पाल आपल्या दोन मित्रांना घेऊन रायगडातील टकमक टोकावर गेला. लॅपटॉप काढला. मात्र, काही विचार करून तो बाजूला ठेवला. बाजूच्या दुकानातून फुलस्केप कागद विकत आणले. टळटळीत उन्हात लिखाणाला सुरुवात केली. पाच तास झाले होते, तो सतत लिहित होता. शेवटचं वाक्य ‘जय भवानी जय शिवराय’ लिहूनच तो उठला. (Journey of Digpal Lanjekar)

दोन मित्रांनी सांगितलं, “अरे पाच तास तू नुसता लिहित होतास, डोकं वर करूनही पाहिलं नाहीस…” तेव्हा त्याला कळलं. ‘फर्जंद’ कागदावर उतरला होता. डायलॉग व्हर्जनही लिहून झाले होते. हा दैवी चमत्कारच होता, पुढंही असे चमत्कार घडत गेले, असं दिग्पाल सांगतो. नंतर साहजिकच निर्मात्यांचा शोध सुरू झाला.
दीडशे-दोनशे जणांची भेट झाली होती. मात्र, हाती काही लागत नव्हतं. त्यामुळे काहीशी निराशाही येत होती. शेवटी संदीप जाधव पुढं आले. त्यांच्यासह अनिर्बण सरकार, उत्कर्ष जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार यांनी निर्मितीची धुरा सांभाळली. शिवमालिकेत पाच चित्रपट करायचं आधी ठरलं होतं. मात्र, नंतर अष्टक पुढं आलं. (Journey of Digpal Lanjekar)
मेहनत अन् प्रशिक्षण
कुठलीही कलाकृती साकारायची, तर जीवतोड मेहनत आलीच. ‘फर्जंद’साठी सात वर्षे लागली. दिग्पाल एवढ्यावरच थांबला नाही तर, इतिहासातील बऱ्याच गोष्टी तो शिकला. कित्येक शस्त्रांचं प्रशिक्षण त्यानं घेतलंय. त्याचा उपयोग दिग्दर्शनादरम्यान होतो. कलावंतांना तो स्वत: शस्त्रांचं प्रशिक्षण देतो. एवढंच नाही तर १२ प्रकारचे फेटे त्याला बांधता येतात. इतर ऐतिहासिक वेशभूषाही करता येते.
“चित्रपट बनवायला कोट्यवधी लागतात. मात्र, चित्रपटाची तयारी करायला कागद अन् पेन पुरेसा असतो”, असं त्याचं म्हणणं आहे. मात्र, त्यातही मेहनत आलीच. मराठी चित्रपट म्हटलं की बजेटअभावी खूप मर्यादा येतात. शंभर घोड्यांऐवजी वीसच घोडे दौडवावे लागतात. कमीतकमी बजेटमध्ये जास्तीत जास्त चांगला सिनेमा बनवण्याचं आव्हान असतं. कारण, निर्माता जगला पाहिजे, असं त्याचं मत आहे. (Journey of Digpal Lanjekar)

मराठीत बजेट योग्य हवं, अशी त्याची अपेक्षा आहे. मराठीत ‘वेल कोरिओग्राफ्ड ॲक्शन’ आणल्याचं एक लेखक-दिग्दर्शक म्हणून त्याला समाधान आहे. आज जागतिक तोडीचे ऐतिहासिक चित्रपट तो देतोय, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे.
विजयेंद्र प्रसाद यांच्याकडून कौतुक
प्रसिद्ध पटकथालेखक, ‘बाहुबली’चे लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी केलेलं कौतुक दिग्पालसाठी बळ ठरलंय. नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी दिग्पाल चेन्नईला जाऊन एक कोर्स करतोय. दाक्षिणात्य चित्रपट एवढे प्रगत कसे, याचे बारकावे तो टिपतोय.
याचदरम्यान त्याची व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्याशी भेट झाली. त्यांनी दिग्पालचे ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ बघितले होते. त्याबाबत त्यांनी दिग्पालची स्तुतीही केली. एवढ्या कमी बजेटमध्ये हे चित्रपट बनले, यावर त्यांचा विश्वासच बसला नव्हता. इमोशन्स, कंटेंट या भरवशावर आपण आपली नौका पार करतोय, हे इथं सिद्ध झालं होतं. (Journey of Digpal Lanjekar)
यश टिकवण्यासाठी तिप्पट मेहनत लागते…
गो. नी. दांडेकर यांच्या कादंबऱ्यांचा दिग्पालवर प्रभाव आहे. दिग्दर्शकांमध्ये मणिरत्नम, भालजी पेंढारकर, राजा परांजपे हे त्याच्या विशेष आवडीचे. त्यातल्या त्यात मणिरत्नम यांची फोटोग्राफी, गोष्ट सांगण्याची त्यांची पद्धत, गुंतागुंतीचा स्क्रीनप्ले निर्माण करण्याची त्यांची हातोटी दिग्पालला विशेष भावते.

“इतर विषय, प्रेमकथा वगैरे हाताळाव्याशा वाटत नाहीत का”, असं विचारताच तो म्हणतो, “शिवराय व त्यांच्या सहकाऱ्यांवर आधारित प्रसंगांचे अष्टक हे माझे ‘कमिटेड मिशन’ आहे. ते आधी पूर्ण होऊदेत. मग तिकडे वळेन कदाचित.” (Journey of Digpal Lanjekar)
करिअरपलीकडे जाऊन त्याला आपला इतिहास त्याला समाजासमोर आणायचा आहे. त्यात तो यशस्वीही ठरतोय. या क्षेत्रात येणाऱ्यांना काय मार्गदर्शन करशील, या प्रश्नावर तो म्हणतो, “इथं फक्त मेहनतच तुम्हाला तारते. स्मिता तळवलकर एकदा मला म्हणाल्या होत्या, ‘हे क्षेत्र असं आहे जिथं ना आरक्षण लागत ना आपण कधी निवृत्त होत. बस्स फक्त जिद्द हवी.’ तेच मीही मानतो. मेहनतच तुम्हाला पुढं नेईल. मी आजही १६ ते १८ तास रोज काम करतो. यश मिळवल्यानंतर ते टिकविण्यासाठी तिप्पट मेहनत करावी लागते.”
======
हे देखील वाचा – छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेणारा गुणी कलावंत: निशांत रॉय बोम्बार्डे
======
दिग्पालचं हे समर्पण, सतत नवं काही शिकण्याची वृत्ती, कलेच्या माध्यमातून समाजाला काही देणं लागतं ही भावना अन् सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातली नम्रता या अशा कित्येक गुणांच्या भरवशावर कलाक्षेत्रातला हा ‘फर्जंद’ चित्रपटसृष्टी ‘फत्ते’ करून रसिकांच्या मनावर राज्य करेल, यात शंकाच नसावी.