तालवादक नितीन शंकर यांचा थक्क करणारा प्रवास
आर.डी. बर्मन या अवलिया व्यक्तीला लहानपणापासूनच आपला देव मानून त्यांच्यासोबत काम करायचं असा ध्यास या व्यक्तीने लहानपणापासूनच घेतला आणि पुढे जाऊन इतिहास घडला. आरडीच नाही तर लक्ष्मीकांत प्यारेलाल, जतीन – ललित, अनु मलिकपासून यांच्या संचातील एक भाग ते अगदी आशा भोसले यांच्या वाद्यवृंदाचे संयोजक असा थक्क करणारा प्रवास नितीन शंकर यांनी केला. आजच्या घडीला चित्रपटातील गाण्यांचे तालवाद्य संयोजन, संगीत संयोजन, मैफलीचे वाद्यवृंद संयोजन ते अगदी निर्माता अशा अनेक आघाड्यांवर नितीन दादा काम करत आहेत. कोणत्याही कलाकारासाठी आदर्शवत असाच हा प्रवास आहे.
एकदा आशा भोसले यांच्या मैफलीला जाण्याचा योग आला. आर.डी. बर्मन यांची जुनी व्हिडीओ रेकॉर्डिंग असतील किंवा अनेक दिग्गज कलाकारांची मैफल असेल अगदी अलीकडे इंटरनेटवर व्हायरल झालेला आशा भोसले आणि उस्ताद झाकिर हुसैन यांचा व्हिडीओ असेल या सर्वातील एक नेहमीचा प्रसन्न चेहरा इथेही दिसत होता. आर.डी. यांची काही गाणी आशा भोसले यांनी सादर करत असताना एकरूप होऊन वाजवणारा हा वादक कलाकार म्हणजे सुप्रसिद्ध तालवादक आणि संयोजक नितीन शंकर.
नितीन शंकर यांचा सांगीतिक प्रवास असाच रंजक आहे. घरामध्ये फार पूर्वीपासून संगीताचं वातावरण. नितीन शंकर यांचे आजोबा गायक, वादक होते त्यावेळी मास्टर विनायक यांच्या नाटक कंपनीमध्ये ते काम करायचे. त्यामुळे पुढे हा वारसा नितीन शंकर यांच्या आईकडेही आला. त्यासुद्धा एक उत्तम नर्तक होत्या. तसंच नितीन दादांचे वडील तबलावादक आणि तालवादक. त्यामुळे अगदी जन्मापासूनच कानावर संगीत पडत होतं. त्यामुळे आपोआपच त्याची गोडी नितीन शंकर यांना लागली.
नितीन शंकर यांनी शाळेत असतानाचं ठरवलं होतं की आपल्याला संगीत क्षेत्रामध्येच काहीतरी करायचं आहे. त्यावेळी रेडिओ हे प्रभावी माध्यम होतं. आर.डी. बर्मन आणि त्यांची गाणी रेडिओवर गाजत होती. या गाण्यांच्या तालाने नितीन शंकर यांना मोहित केले. रेडिओवर गाणी ऐकून ऐकून त्या गाण्यांमधील ताल, त्यातील बारकावे नितीन यांनी टिपून घेतले.
पुढे यातूनच वयाच्या १६ व्या वर्षी नितीन शंकर यांनी तालवादक म्हणून आपला प्रवास सुरू केला. मुंबईमध्ये येऊन त्यांच्या या प्रवासाला सुरुवात झाली. आर. डी. बर्मन हे नाव हिंदी चित्रपट आणि संगीतसृष्टीमध्ये गाजत होतं. त्यांचं संगीत काळाच्या ३०-४० वर्षे पुढचं होतं. त्याने नितीन शंकर यांना आकर्षित केलं.
शाळेत असल्यापासूनच कोणाकडेही वाद्य न शिकता ऐकून ऐकून गाण्यातील ताल समजून नितीन शंकर यांनी एक एक वाद्य शिकलं होतं. प्रत्येक वाद्यातील तंत्र त्यांनी आत्मसात केलं होतं. त्यामुळे या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी वेगवेगळी वाद्य हाताळायला सुरुवात केली. वेगवेगळ्या मैफली कार्यक्रम ऐकायला जाऊन ते कलाकारांची वाद्य बघायला, हाताळायलासुद्धा जायचे. सुरुवातीच्या काळामध्ये लोक ओरडायचे, काही वादक तर मारायचेसुद्धा मात्र नितीन शंकर यांनी आपली चिकित्सकवृत्ती काम ठेवली.
काही वेळेला आपली मेहनत खरी असेल तर प्रवासात आपोआपच लोक भेटतात आणि आपल्या मदतीला येतात. असंच नितीन शंकर यांच्या बाबतीत झालं. नितीन शंकर यांची भेट तौफिक कुरेशी यांच्याशी झाली. यामुळे त्यांना तबल्याचे तंत्र, बारकावे आणि अनेक गोष्टी कळल्या. तौफिक कुरेशी यांनी नितीन शंकर यांची तयारी आणि समज बघून त्यांना अब्बाजी अर्थात त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांच्याकडे घरी नेलं. आणि त्यातूनच पुढे अल्लारखा यांच्याकडे नितीन शंकर यांचे शिक्षण सुरू झाले. त्यावेळी अल्लारखा यांच्या घरीच नितीन शंकर यांचे तबल्याचे शिक्षण चालत असे.
अब्बाजी सर्व आपल्या विद्यार्थ्यांना मुलासारखं मानून शिकवत असतं. त्यामुळे वादनाचे बारकावे आणि मूलभूत गोष्टी सहज नितीन शंकर यांना समजल्या. माझ्यासाठी आयुष्यातली ती नक्कीच मोठी गोष्ट होती असं नितीन शंकर सांगतात.
याच दरम्यान आर. डी. बर्मन यांचे अरेंजर मारुतीराव किर यांच्याकडे शिकण्यासाठी नितीन शंकर जाऊ लागले. आर.डी. बर्मन हा त्यांचा संगीतातील आवडीचा विषय. आर. डी. बर्मन यांच्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांच्यासोबत वाजवावं असा ध्यास नितीन शंकर यांनी घेतला होता. आणि ते स्वप्न आता जवळ आलं होतं. आर. डी. बर्मन यांचं रेकॉर्डिंग जवळून बघायला स्टुडिओमध्ये नितीन शंकर जात असतं. एक विद्यार्थी म्हणून रेकॉर्डिंग चालू असताना तिथे वाजणारं सगळं ते लक्षात ठेऊन मनातल्या मनात वाजवत असतं.त्यावेळी त्यांचा कान अधिकच तयार झाला आणि अशातूनच एकदा प्रत्यक्ष रेकॉर्डिंग वाजवायची संधी त्यांना मिळाली. त्यावेळी आपला मिळालेला सगळा अनुभव वापरत त्यांनी या संधीचं सोनं केलं. त्यातूनच त्यांना पुढची रेकॉर्डिंगची डेट पण लगेच मिळाली. त्यावेळी पंचम दा यांचं नितीन यांच्याकडे लक्ष गेलं. त्यावेळी त्यांनी खास त्यांच्या शैलीत विचारलं, ” भाई, ये कौन है, हमेशा बुलाओ इसे.”
हा प्रवास सुरू झाला आणि नितीन शंकर यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माईक प्लेसमेंट, रेकॉर्डिंगमधील बारकावे तर त्यांनी शिकलेच पण याच दरम्यान अरेंजर कोणत्या पद्धतीने विचार करत असेल त्याची थॉट प्रोसेस नितीन शंकर यांनी शिकून घेतली त्याचा फायदा पुढच्या प्रवासात नितीन शंकर यांना झाला.
याच दरम्यान संगीतकार जतीन ललित यांच्याशी नितीन शंकर यांची मैत्री झाली होती. त्यांचाही या क्षेत्रात प्रवास सुरू झाला होता. त्यांच्या ग्रुपमध्ये मित्र म्हणून नितीन शंकर वाजवायला लागले. यातूनच जतीन ललित यांना एक चित्रपट मिळाला. नासिर हुसैन प्रोडक्शनचा हा चित्रपट होता जो जिता वही सिकंदर. त्यावेळी या चित्रपटाच्या गाण्यांचा रिदम तू कर असं जतीन ललित यांनी सांगितलं.ती एक मोठी संधी होती. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचं संगीत संयोजन केलं होतं आर. डी. बर्मन यांचे संयोजक बबलू दा, मनोरी दा यांनी. त्यामुळे सहाजिकच संपूर्ण संच आर.डी यांचा असणार होता. ही जबाबदारी नितीन शंकर यांनी आपला संपूर्ण अनुभव वापरून पार पाडली आणि एक अरेंजर अरेंजर म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला.पुढे खिलाडी आणि आणखी इतर चार पाच चित्रपट त्यांनी केले. त्यांचं काम ऐकून संगीतकार अनु मलिक यांनी थेट फोन करून काम करणार का विचारलं आणि चमत्कार चित्रपटापासून त्यांचं काम सुरू झालं. दिलवाले, बाजीगर अशा कितीतरी चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे.याच दरम्यान त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी प्यारेभाईंच्या बोलवण्यानुसार वादन केलं. वेस्टर्न कोणतंही गाणं असेल तर सगळ्या डेटस नितीन शंकर यांनाच द्या असा आग्रहसुद्धा त्यांच्या वाजवण्यामुळे केला जायचा. या सगळ्यातही आर.डी. बर्मन यांचं रेकॉर्डिंग आलं तर आधी तिथे जाणार असं नितीन शंकर यांनी सांगितलेलं होतं. त्यांच्यासाठी आर.डी. नेहमीच खास होते. आर डी बर्मन यांच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्येसुद्धा त्यांनी तालवादक म्हणून काम केलं. हम दिल दे चुके सनम, ब्लॅक ते अगदी अलीकडच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटापर्यंत त्यांनी संजय लीला भन्साळी सोबत तालवाद्य संयोजक म्हणून काम केलं आहे.
१९७८-७९ पासून सुरू झालेला हा प्रवास आजही सुरू आहे. अनेक मोठ्या बॅनर्ससाठी आणि प्रोजेक्ट्ससाठी आजही नितीन शंकर हे नाव तालवाद्य संयोजक म्हणून हवंच असतं. साजिद वाजिद यांच्यासोबतसुद्धा त्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केलं आहे. दबंग १, २, ३ मधली गाणी असो किंवा रावडी राठोडमधली हटके गाणी, लार्जर दॅन लाईफ रिदमसाठी नितीन शंकर हे नाव नेहमीच ओळखलं जातं. जेष्ठ तालवादक त्रिलोक गुर्टू यांनीही नितीन शंकर यांचे वादन ऐकून आपल्या प्रोजेक्ट्ससाठी त्यांना बोलावून घेतले होते. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलसाठी त्यांनी एकत्र वादन केले आहे.
याच प्रवासामध्ये जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्याशी नितीन शंकर यांचे ऋणानुबंध जुळले. त्यातच लता दीदी आणि मंगेशकर परिवारातील सदस्य नितीन शंकर यांच्या आजोबांबरोबर मास्टर विनायक यांच्या कंपनीमध्ये कामसुद्धा करायचे. त्याचबरोबर पंचम दांसोबत नितीन शंकर यांनी वादन केलं होतं. त्यामुळे आशा भोसले यांना नितीन शंकर यांच्या कामाची ओळख पटली. आणि पहिल्या भेटीतच ते कुटुंबाचा एक कलाकार म्हणून भाग झाले. आजपर्यंत असंख्य गाणी आणि कार्यक्रमांसाठी आशा ताईंसोबत नितीन शंकर यांनी काम केलं आहे. आशा भोसले यांच्या मैफलीच्या वाद्यवृंद संयोजनाची जबाबदारी नितीन शंकर विश्वासाने हाताळत आहेत.
एक वादक, एक तालवाद्य संयोजक याचबरोबर नितीन शंकर यांनी स्वतः संगीतकार म्हणूनही प्रोजेक्ट्स हाताळले आहेत. आशा भोसले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त precious platinum या अल्बमच्या संगीताची जबाबदारी पूर्णपणे त्यांनी हाताळली. आणि स्वतः आशा भोसले यांनी या अल्बममध्ये गाणी गायली आहेत. याचप्रमाणे सुप्रसिध्द गायिका देवकी पंडित यांच्या अल्बमसाठीसुद्धा नितीन शंकर यांनी संगीत दिले आहे.मराठी चित्रपट Whatsup Love साठीही त्यांनी संगीत दिले असून श्रेया घोषाल, आशा भोसले यांनी यासाठी गाणी गायली आहेत.
याचबरोबर एक निर्माता म्हणून एक वेगळा प्रोजेक्ट नितीन शंकर यांनी हाताळला आहे. आशा भोसले यांचा अभिनय असलेला माई या चित्रपटाची निर्मिती नितीन शंकर यांनी केली होती. या प्रत्येक अनुभवातून आणि प्रत्येक कामामधून काहीतरी शिकायला मिळतं असं नितीन शंकर सांगतात.
आजच्या पिढीतील तरुण वादक घडवण्याचा प्रयत्नसुद्धा नितीन शंकर करत आहेत. तुमच्याकडे जर टॅलेंट आणि आत्मविश्वास असेल तर मैदान तुमच्यासाठी मोकळं आहे असं नितीन शंकर सांगतात. या क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर अल्पप्रसिद्धीच्या मागे न जाता आपला पाया भक्कम करा आणि मग सर्वांसमोर या असा सल्ला ते नवीन वादकांना आणि कलाकारांना देतात.
आजच्या पिढीने किशोरकुमार, रफीसाहेब, आशा भोसले, मदन मोहन यांचा आदर्श ठेऊन काम केलं पाहिजे. तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत तुमचं काम लक्षात राहिलं असं काम करा असा सल्ला ते देतात. आजपर्यंत अनेक कलाकार पुढे येऊन बुडताना बघितले आहेत त्यामुळे आपला दर्जा राखण्याबद्दल तरुण पिढीने विचार केला पाहिजे त्याचबरोबर कोणताही दिखावा करण्यापेक्षा आपल्या कामावर फोकस ठेवा असा सल्ला या क्षेत्राकडे वळणाऱ्या कलाकारांना त्यांनी दिला आहे. विकतच प्रमोशन करून ५ मिलियन आणि १० मिलियन यांच्या मागे जाण्यापेक्षा संपूर्ण जनरेशन तुम्हाला लक्षात ठेवेल असं काहीतरी बना त्याने कलाकार म्हणून तुम्ही समृद्ध व्हाल असा सल्ला नितीन शंकर देतात.
एक कलाकार किंवा माणुस म्हणून सर्वांनाच हा प्रवास प्रेरणादायी आहे. भविष्यातही अनेक जण नितीन शंकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करतील. संगीताच्या वेडापायी ध्यास मनात ठेऊन त्यांनी हा संपूर्ण प्रवास केला आहे. नितीन शंकर यांच्या संपूर्ण प्रवासाला कलाकृती मीडिया परिवाराचे अभिवादन !
– आदित्य बिवलकर