Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य

नीना कुलकर्णी: डॉक्टर आई वडिलांच्या मुलीने जेव्हा कलाक्षेत्रात यायचा निर्णय घेतला तेव्हा…
ज्येष्ठ दिग्दर्शिका विजयाबाई मेहता यांनी अनेक हिरे मराठी रंगभूमीला दिले आहेत. विजयाबाईंची ओळख म्हणजे अभिनय, नाटक, दिग्दर्शनातलं चालतं बोलतं विद्यापिठ. त्यांच्या हाताखालून गेलेल्या अनेक कलाकारांनी रंगभूमी गाजवली. त्याच कलाकारांच्या रांगेत पहिलं नाव येतं ते नीना कुलकर्णी या बहुरंगी व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्रीचे. 15 ऑगस्ट रोजी नीनाताई वयाच्या 68 व्या वर्षात पदापर्ण करत आहेत. पण त्यांच्याबाबतीत वय हा फक्त ‘नंबर गेम’ मानावा लागेल. कारण नीनाताईंचा अभिनय हा अधिकाधित बहरत असल्याचा अनुभव येतो. (Neena Kulkarni)
अगदी नाटक मराठी असो वा इंग्रजी, नीनाताई त्यात सहजतेनं वावरतात. तीच सहजता चित्रपट, वेबसिरीज, मालिका आणि इंग्रजी चित्रपटातही वावरतांना असते. नीनाताईंचा उल्लेख प्रगल्भ अभिनेत्री असा केला जातो. सतत वाचन करणे हा त्यांचा सर्वात आवडता छंद. एका डॉक्टर कुटुंबात जन्मलेल्या नीनाताई डॉक्टर न होता रंगभूमीकडे वळल्या. त्यांचा हा निर्णय कुटुंबियांसाठी धक्कादायक असला तरी त्यांना विरोध झाला नाही. वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमीच्या प्रेमात पडलेल्या नीनाताईंचा हा सगळा प्रवास नवोदितांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
15 ऑगस्ट 1955 रोजी नीनाताईंचा जन्म पुण्यात झाला. पण त्या मूळ मुंबईकर. त्यांचे आई वडील दोघंही डॉक्टर. आई जनरल प्रॅक्टीस करायची तर वडील जेजे मध्ये मानसोपचारतज्ज्ञ. नीनाताईंचा जन्म झाल्यावर हे कुटुंब काही वर्षासाठी लंडनला गेले. त्यानंतर चार वर्षांनी, 1961 साली भारतात परत आले आणि मुंबईच्या मकरंद सहनिवासामध्ये रहायला लागले. तिथे अनेक मराठी साहित्यिक राहायचे.

नीनाताईंवर लहानपणांपासून त्यांच्या वडिलांचा खूप प्रभाव होता. ते मानसोपचारतज्ज्ञ आणि आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी नीना आणि त्यांच्या धाकट्या बहिणीला ‘कनोसा कॉन्व्हेंट’मध्ये दाखल केले. इंग्रजी माध्यामातून झालेल्या शिक्षणामुळे आपला दृष्टीकोन व्यापक झाल्याचे त्या सांगतात. मकरंद निवासमध्ये त्यांच्या शेजारी विमलताई राऊत रहायच्या. त्या नाटकात काम करायच्या कॉलनीमध्ये वार्षिक महोत्सवात त्या नाटकं बसवायच्या. त्यात वयाच्या नवव्या वर्षी नीनाताईंनी भाग घेतला. तेव्हापासून त्या नाटकांच्या प्रेमात पडल्या. (Neena Kulkarni)
दरवर्षी हा महोत्सव कधी येईल याची त्या वाट बघायच्या. पुढे विमलताई काम करत असलेल्या ‘चांदणे शिंपीत जा’ या नाटकात एका कलाकाराच्या ऐवजी बदली कलाकाराची गरज होती. तेव्हा विमलाताईंनी ही भूमिका छोट्या नीनाला दिली. त्यांनीही या नाटकाचे 20 प्रयोग केले. काही वर्षानंतर नीनाताईंच्या वडीलांचे मित्र असलेल्या काशिनाथ घाणेकर यांनी त्यांना ‘गुंतता ह्दय हे’ या नाटकात त्यांच्या मुलीची भूमिका दिली.
या नाटकाचे नीनाताईंनी 600 प्रयोग केले. त्यांना हे नाटक मिळालं तेव्हा नीनाताई 10 वीत होत्या आणि त्यांनी नाटक सोडलं तेव्हा त्यांची बीएची पदवी पूर्ण झाली होती. अगदी सहजपणे हा सगळा प्रवास चालू असतानाच नीनाताई कॉलेजमध्ये मॉडलिंगही करत असत. कॉलेजमधील नाटकातही त्या पुढे असत. त्यांना ‘क्लिअरसिल गर्ल’ म्हणूनही ओळख मिळाली.

1975 मध्ये बीए झाल्या. त्याही फ्रेंच या विषयात. या सर्वादरम्यान नीनाताईं, वसंतराव कुलकर्णींकडे तीन वर्ष गाणं शिकल्या. उमाताई दामले यांच्याकडून कथ्थक शिकल्या आणि भरपूर पुस्तक वाचायला त्यांनी सुरुवात केली होती. हे सर्व करत असताना करिअर म्हणून नाटक करायचं असा त्यांचा विचारही नव्हता. आई वडीलांनीही कधीही त्यांना थांबवलं नाही, रोखलं नाही. नीनाताईंच्या मते यामुळेच विविध कला शिकून स्वतःला विकसीत करण्याची संधी मिळाली. (Neena Kulkarni)
त्यांच्यासोबत कॉलेजमध्ये अभिनेत्री रत्ना पाठक याही होत्या. त्यांचाही वावर रंगभूमीवर होता. त्यांनी नीनाताईंची ओळख सत्यदेव दुबेंबरोबर करुन दिली. दुबेंनी त्यांना ‘संभोग से सन्यास तक’ या नाटकात भूमिका दिली. याच नाटकादरम्यान दिलीप कुलकर्णी बरोबर त्यांची ओळख झाली. सत्यदेव दुबे यांच्याकडून त्यांना खूप शिकता आलं, संवादफेक समजली. या सर्वात नीनाताईंना विजया मेहतांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. हा आपल्या आयुष्यातला ‘टर्निंग पॉईंट’ असल्याचे नीनाताई सांगतात.
वय वर्ष 19 असलेली नीना मग हमिदाबाईची कोठीमध्ये हमिदाबाईच्या मुलीच्या, शब्बोच्या भूमिकेत दिसू लागली. यावेळी नाना पाटेकर, दिलिप कोल्हटकर, अशोक सराफ, भारती आचरेकर हे कलाकारही सोबत असायचे. पण नीनाताईंना सर्वात मोठं आकर्षण होतं, ते विजयाबाईंचं. त्यांच्याकडून अनेक बारकावे शिकता आल्याचं नीनाताई सांगतात. पुढे हीच हमिदाबाईंची भूमिका नीनाताईंनीही त्याच ठसक्यात केली. यामागे सर्व श्रेय विजया मेहतांच्या कडक शिस्तीचे असल्याचे त्या प्रामाणिकपणानं सांगतात. या सर्व नाटकांदरम्यान नीनाताईंची ओळख दिलीप कुलकर्णींबरोबर झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर विवाहात झाले.

नीनाताईंचा अभिनयाचा प्रवास कुठेही खंडीत झाला नाही याला कारण नीनाताईंचा स्वभाव. त्यांनी स्वतःला एका विशिष्ट अशा बंधनात ठेवलंच नाही. जे जे नवीन आहे, ते ते शिकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळे साठी ओलांडल्यावरही त्या मालिकांमध्ये जेवढ्या चांगल्या रमल्या तेवढ्याच वेबसिरीजमध्येही….या सर्वांचे मूळ त्या रंगभूमीवर काम करताना झालेल्या संस्काराला देतात. (Neena Kulkarni)
1978 मध्ये हमीदाबाईची कोठीमधील शब्बोपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास विविधांगी झाला. महासागर, आकाशमत, ध्यानी मनी, वटवट सावित्री, देहभान, प्रेम पत्र आणि छापा काटा या त्यांच्या नाटकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘सवत माझी लाडकी’ या त्यांच्या चित्रपटाला राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय आई, उत्तरायण, शेवरी, बायोस्कोप: दिल-ए-नादान, बादल, नायक, पहेली, गुरू, हंगाम, रण, फिर भी दिल है हिंदुस्तानी, मेरे यार की शादी है, हसी तो फसी आणि घायाल: वन्स अगेन, गंध, मोगरा फुलला, मिर्च मसाला, सातच्या आत घरात, पछाडलेला….यासारख्या अनेक हिंदी-मराठी चित्रपटातून त्यांनी काम केलं आहे.
लोकसत्ता वृत्तपत्रात त्यांनी अंतरंग नावाचा स्तंभ वर्षभर लिहिला. पुढे त्याचे पुस्तक प्रकाशित झाले. टिव्हीवर येणाऱ्या ‘ये है मोहब्बते’ सारख्या मालिकेत त्यांनी सहा वर्ष काम केलं. याशिवाय फ्रेंच भाषेतील पदवीधर असलेल्या नीनाताईंनी फ्रेंच भाषेतील चित्रपटही केले आहेत.
========
हे देखील वाचा – वडील गेल्याच्या दुःखात असतानाही केला विनोदी सीन चित्रित… कुठला होता हा सीन?
=======
वयाच्या नवव्या वर्षापासून नाटकामध्ये काम करणाऱ्या नीनाताई आज वयाच्या 68 व्या वळणावर आहेत. मात्र त्यांचा उत्साह तेवढाच आणि तसाच आहे. त्यामुळेच नवीन पिढीबरोबर त्यांचे लवकर जमते. आयुष्यातल्या दुःखांना बाजुला ठेवून अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या आयुष्यात आनंद भरणाऱ्या नीनाताईंना भरपूर शुभेच्छा…(Neena Kulkarni)
– सई बने