२०२२ मध्येही प्रतीक्षा आहे १९९७ सालातल्या तरुण तडफदार ‘दामिनी’ची!
मराठीमधील पहिली दैनंदिन मालिका म्हणजे दामिनी! ही मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळच्या वेळी प्रसारित होत असे. दामिनीच्या भूमिकेने प्रतीक्षा लोणकरला सक्षम अभिनेत्री म्हणून ओळख तर मिळवून दिलीच, शिवाय यामुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
तो जमाना होता साप्ताहिक मालिकांचा. त्यामुळे दररोज प्रसारित होणारी मराठी मालिका म्हणून दामिनीबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले. एकीकडे झी ने सुरु केलेली पहिली वाहिली मराठी वाहिनी अल्फा टीव्ही (आत्ता झी मराठी) प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत असताना, या मालिकेने प्रेक्षकांना दुरदर्शनकडे थांबायला भाग पाडले होते.
त्या काळात स्त्री स्वातंत्र्याचे वारे जोरदार वाहत होते. मुळमुळीत, सोशिक रडणाऱ्या नायिकांपेक्षा अन्यायाविरोधात लढणारी स्वाभिमानी, आत्मविश्वास आणि नैतिकता जपणारी ‘दामिनी’ लोकांच्या मनाला भावली. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आणि मालिकेने एक हजारपेक्षा जास्त भाग पूर्ण केले.
प्रिया तेंडुलकर, आनंद अभ्यंकर, अविनाश खर्शीकर, प्रतिक्षा लोणकर, किरण करमरकर, रमेश भाटकर, लालन सारंग, आसावरी जोशी अशा मराठी मनोरंजन विश्वातील जवळपास सर्वच नावाजलेल्या कलाकारांनी या मालिकेत काम केले होते. या मालिकेतून हर्षदा खानविलकर, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी असे गुणी कलाकारही मराठी इंडस्ट्रीला मिळाले.
दामिनी नंतर अल्फा टीव्ही मराठीवर (आत्ता झी मराठी) सुरु झाली दैनंदिन मालिका ‘आभाळमाया’! यामध्ये सुकन्या कुलकर्णी, संजय मोने, मनोज जोशी, हर्षदा खानविलकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. यामधली कुटुंबवत्सल परंतु, स्वाभिमानी आणि करारी नायिका प्रेक्षकांना भावली. या मालिकेनेही एक हजारपेक्षा जास्त भाग पूर्ण केले. याचबरोबर श्रेयस तळपदे, अंकुश चौधरी, ऋजुता देशमुख, संज्योत हर्डीकर, मनवा नाईक, राहुल मेहंदळे अशा गुणी कलाकारांचे मनोरंजन विश्वात आगमन झाले. श्रेयस तळपदे या कलाकाराने तर चक्क बॉलिवूडपर्यंत मजल मारली.
त्यावेळी हिंदी चॅनेलवरील बहुतांश मालिका नायिकाप्रधान असल्या तरी, ठराविक कोशातच अडकलेल्या होत्या. यामधील नायिका समर्थ, स्वाभिमानी नव्हत्या तर, सोशिक, कुटुंबवत्सल आणि सहनशील अशा गांधीवादी विचारसरणीच्या होत्या.
सुशील आणि सोशिक नायिका, श्रीमंत कुटुंब, डिझायनर साड्या, दागिने, लेडी व्हिलन हा या मालिकांचा कच्चा माल होता. त्यामध्ये मग गुजराती, मारवाडी किंवा पंजाबी श्रीमंत कुटुंब, नायकाचे दुसऱ्या मुलीवर प्रेम किंवा लग्नाला कुटुंबाचा विरोध, नाईलाजाने नायिकेशी केलेलं लग्न, कुटुंबातच एखादी नायिकेचा तिरस्कार करणारी नातेवाईक, हा मालमसाला टाकून थोड्याफार फरकाने अशाच मालिका तयार होत असत. त्यामानाने मराठी चॅनेल मात्र प्रेक्षकांना ‘क्वालिटी कन्टेन्ट’ देत होत्या.
आभाळमायानंतर आलेली ‘वादळवाट’ ही मालिका तर प्रचंड लोकप्रिय झाली. तडफदार रमा चौधरीच्या भूमिकेत अदिती सारंगधारने जीव ओतला होता. या मालिकेत अरुण नलावडे, शरद पोंक्षे, सुबोध भावे यांच्यासारखे दिग्गज कलाकार असतानाही अदिती सारंगधर, नीलम शिर्के, क्षिती जोग आदी नायिकांच्या भूमिकेचेही कौतुक झाले. शिवाय उमेश कामत, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर अशा गुणी कलाकारांच्या कारकिर्दीला एक नवे वळण मिळाले.
=====
हे देखील वाचा: सुख म्हणजे नक्की हेच असतं… कपिल होनराव सांगतोय आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी.
=====
याचदरम्यान मराठीमध्ये अजून एका मराठी चॅनेलची सुरुवात झाली होती, ते म्हणजे ‘इ टीव्ही मराठी’ (आत्ता कलर्स मराठी). या चॅनेलवर टिपिकल सास -बहू टाईप मालिका ‘चार दिवस सासूचे’ सुरु झाली. श्रीमंत कुटुंब, भव्यदिव्य सेट्स, प्रेमकहाणी, कौटुंबिक वादविवाद या सर्व गोष्टी तेव्हा प्रेक्षकांसाठी नवीन होत्या. तडफदार नायिकेपेक्षा यामधली कुटुंबवत्सल नायिका प्रेक्षकांना विशेष भावली. त्यामुळे प्रेक्षकांनी ही मालिका अक्षरश: डोक्यावर घेतली.
चार दिवस सासूचे या मालिकेमध्ये कविता लाड, रोहिणी हट्टंगडी आणि पंकज विष्णू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याच दरम्यान स्टार प्लसवर याच आशयाची “क्यों कि सास भी कभी बहू थी” ही हिंदी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती. चार दिवस सासूचे ही मालिका त्याच्याशी काही प्रमाणात साधर्म्य साधणारी होती. इथूनच पुन्हा सुरु झाला नायिकेला सोशिक, मुळमुळीत दाखवण्याचा प्रवास.
कालांतराने मराठी मनोरंजन विश्वात स्टारनेही एंट्री घेतली. स्टार प्रवाह या नावाने स्टारची मराठी वाहिनी चालू झाली. अग्निहोत्रसारख्या मालिकेमुळे या चॅनेलकडून खूप मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. परंतु, हळूहळू इधर का माल उधार टाईप हिंदी मालिकांच्या धर्तीवर मराठी मालिका किंवा मराठी मालिकांच्या धर्तीवर हिंदी मालिका तयार होऊ लागल्या. या बहुतांश मालिका एकाच साच्यातल्या नायिकाप्रधान मालिका आणि नायिका कुटुंबवत्सल, सोशिक, समंजस, मुळमुळीत आणि गांधीवादी.
श्रीयुत गंगाधर टिपरे, मालगुडी डेज, प्रपंच, ४०५ आनंदवन, गहिरे पाणी, कळत -नकळत काही प्रमाणात अवंतिका, अशा अनेक वेगवेगळ्या विषयावरच्या निखळ मनोरंजन करणाऱ्या सरस मालिका झी मराठीने दिल्या. परंतु, नंतर सास-बहू मालिकांच्या लाटेत झी मराठीही वाहून गेली.
साधारणतः १९९७ मध्ये आलेल्या दामिनी मालिकेपासून सुरुवातीची ४/५ वर्ष सोडली तर, नंतर आलेल्या मालिकांमधल्या बहुतांश नायिका मुळमुळीत आणि सोशिकच होत्या.
====
हे देखील वाचा: देवबाभळीतल्या ‘आवली’चा लक्षवेधी प्रवास.
====
एकीकडे नायिकाप्रधान चित्रपट खूप कमी बनतात, पण मालिकांच्या विश्वात मात्र नायिकांचेच राज्य असते. परंतु, ही नायिका मात्र सतत रडतच असते. काळ पुढे सरकला, पण मालिकांमधल्या नायिका मात्र आजही ४० वर्षांपूर्वीचेच आयुष्य जगत आहेत. असो.
जाता जाता एकच प्रश्न आहे की, दामिनी, आभाळमाया, वादळवाटसारख्या मालिकांमधील तडफदार नायिकेचे दर्शन पुन्हा कधी होणार?