प्रतिभावंताची युती
दोन प्रतिभावान कलाकार एकत्र आले की कलाकृती किती अप्रतिम होते, याचा प्रत्यय संगीताच्या दुनियेत वारंवार येत असतो. अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे आणि आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर या दोन मराठी सारस्वतांनी एकत्र केलेल्या गाण्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असली, तरी कौसल्येचा राम बाई कोसल्येचा राम, जा मुली शकुंतले सासरी, कुणी म्हणेल वेडा तुला, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे… ही गाणी विसरता येतील का? हाच प्रत्यय १९५३ साली आलेल्या देवबाप्पा या सिनेमातील गाणी ऐकून रसिकांना आला.
राम गबाळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा ना’ हे बालगीत आज साठ वर्षे उलटून गेली, तरी रसिकांच्या मनात ताजं आहे. साठ वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं गाणं मात्र गदिमांनी काही मिनिटात लिहिलं होतं! या गाण्याचा किस्सा खुद्द पुलंनीच एकदा सांगितला होता. या गाण्याच्या सीटींग करीता दोघे व इतर दोस्त कंपनी बसले. पण गप्पा, नकला, याची खेच त्याची खेच असं करत करत रात्रीचे बारा वाजून गेले. शेवटी पुलं म्हणाले, “माडगूळकर आता आपला पोरकटपणा बास झाला आता काम करुयात,उद्या गाण्याचे रेकॉर्डिंग आहे व अजून तुम्ही गाणं दिलेले नाही!” गाणं बालगीत होतं व आशा भोसले गाणार होत्या. मग सुरू झाली चर्चेची दुसरी फेरी. गाण्याची चाल त्यांना साधारणत: ‘नाच घुमा कशी मी नाचू’ अशी हवी होती. त्यांनी गदिमांना तसे सांगितले. अण्णांनी लगेच ‘द्या कागद’ असे म्हणत आपल्या सुंदर अक्षरात एकटाकी गाणं लिहून काढलं ‘नाच रे मोरा…!’
या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी देखील धमाल झाली. पुण्याच्या अॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये या गाण्याचं शूटींग होतं. बालकलाकार मेधा गुप्ते आपल्या इतर मैत्रीणींसोबत नटून थटून आली होती. दिग्दर्शक राम गबाळेंना मोराचा पिसारा हवा होता. पण काही केल्या पुण्यात मोराची पिसेच मिळेनात, आता झाली पंचाईत, करायचं काय, शुटींगची तर सर्व तयारी झाली होती, शेवटी दिग्दर्शक राम गबाले यांनी यावर उपाय शोधला व शेतकी महाविद्यालयातल्या एका माळ्याला सांगून झाडाच्या मोठ्या पानांचा पिसारा करुन घेतला व या सुप्रसिध्द गाण्याचे शुटिंग मोराच्या पिसार्याशिवाय पार पडलं! या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक केला. महाराष्ट्रातील एकही मराठी शाळा नसेल जिथे या शाळेच्या स्नेहसंमेलनात या गाण्यावर नाच झाला नसेल. अलिकडॆ या गाण्याचं रिमिक्स आलं होतं व ते देखील प्रचंड लोकप्रिय ठरलं.
या सिनेमातील सर्व गाणी आशानेच गायली होती. ’करू देत शृंगार सख्यांनो करू देत शृंगार…’ हे गाणं देखील जाणकारांच्या अजून लक्षात आहे. १९५३ साल पुलं, माडगूळकर, अत्रे या तिघा शब्दप्रभूंचं होतं; कारण याच वर्षी अत्रेंचा ’श्यामची आई’ प्रदर्शित झाला आणि सबकुछ पुलंचा असलेला ’गुळाचा गणपती’ देखील!