दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘वंदनीय’ स्वभावाचे माणिक मोती / साधेपणा जपणाऱ्या वंदना गुप्ते
वंदना गुप्ते म्हणजे मराठी रंगभूमीला मिळालेली दैवी देणगी म्हणावी लागेल. ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांची कन्या. अभिनयाच्या माध्यमातून वंदना गुप्ते यांनी आपला ठसा मराठी मनावर उमटवला आहे. कायम उत्साही झ-यासारख्या असणा-या वंदनताईंचा आज वाढदिवस. ज्येष्ठ अभिनेत्री असा शिक्का त्यांना लागला असला तरी आपल्या उत्साही स्वभावामुळे वंदनाताईंना त्याचं वय काय हा प्रश्न कधी विचारावासा वाटला नाही.
माणिक वर्मा या दैवी गाण्याची देणगी लाभलेल्या आईच्या पोटी वंदनाताईंचा जन्म झाला. माणिक वर्मांबद्दल काय बोलावे. अमृताहूनी गोड नाम तुझे देवा…हे गाणं कानी पडलं की माणिकबाईंचा स्वर्गीय आवाज आणि सोज्वळ चेहरा समोर येतो. माणिक वर्मा आणि अमर वर्मा यांना चार मुली. राणी, वंदना, अरुणा आणि भारती. माणिक वर्मा या प्रख्यात गायिका तर वडील अमर वर्मा हे त्याकाळच्या प्रभात कंपनीमध्ये कामाला होते. माणिक वर्मा यांची लहान बहिण सुनीता खाडिलकर ही सुद्धा गायिका. त्यामुळे माणिकबाईंच्या घरात गाण्याबाबत एक वेगळी शिस्त होती. रियाज सर्वांना आवश्यक होता. त्यातही राणी या रियाजाला बसत. पण वंदना यांना हे चार-चार तास एका जागी बसणे कधी जमलं नाही. त्यामुळे गाण्याचा रियाज चालू असला तरी हे आपल्याला जमणार नाही ही गोष्ट जणू त्यांनी मनात ठेवली होती. यापेक्षा सोप्पे काय म्हणून त्यांनी नाटकात भाग घ्यायला सुरुवात केली. शाळेच्या कार्यक्रमात त्या गाण्यात भाग घ्यायच्या. घरी गाण्याची पक्की बैठक असूनही मुलींवर मात्र बंधन नव्हते. पण जे कराल ते पूर्ण मेहनतीने करा हा नियम मात्र होता.
हे कुटुंब पुण्याहून मुंबईला आलं आणि वंदना या रुईया कॉलेजमध्ये दाखल झाल्या. या कॉलेजच्या पहिल्याच वर्षी त्यांना नाटकात भाग घेण्याची संधी मिळाली. मुंबईत आल्यावर सुलभा देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभलं होतं. गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्या निमित्त नाटक करायचं होते. पद्मश्री धुंडीराज हे ते नाटक….या नाटकात मनोरमा वागळे होत्या. मनोरमा वागळे आणि माणिक वर्मा या मैत्रिणी. त्यामुळे मनोरमा वागळे या वंदनाताईंनाही ओळखत होत्या. पद्मश्री धुंजीराजमध्ये त्यांना गाणं गाणारी अभिनेत्री हवी होती. मनोरमा वागळे या स्वतः गायिका आणि अभिनेत्रीही. त्यांनी आपल्यासोबत वंदना यांना या नाटकात काम करण्यासाठी विचारलं. सहज जमतंय का म्हणून बघण्यासाठी वंदनाताईही रंगभूमीवर यायला तयार झाल्या. या नाटकाची तीन महिने तालीम चालू होती. त्यात वंदना यांनी गाणीही गायली. 25 डिसेंबर 1970 या दिवशी हे नाटक रंगभूमीवर आलं….या नाटकांनं मराठी रंगभूमीला एक दर्जैदार अभिनेत्री मिळाली.
या नाटकामुळं वंदनाताईंकडे नाटकातील भूमिकांचा ओघ चालू झाला. दरम्यान त्यांची बहिण भारती आचरेकरही अभिनयाकडे वळल्या होत्या. पण या बहिणींवर घरचा, वडीलांचा धाक खूप होता. हिंदीतही त्यांनी भूमिका मिळत होत्या. पण वडीलांच्या सल्यानुसार या भूमिका स्विकारल्या नाहीत. दरम्यान वंदना वर्मा या वंदना गुप्ते झाल्या. शिरिष गुप्ते यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. गुप्ते वकील होते. त्यांच्या एकत्र कुटुंबाने वंदना यांना नाटकाच्या प्रवाहात खूप साथ दिली. या प्रवाहात वंदनाताईंनी साठहून अधिक दर्जैदार नाटकं केली.
वंदनाताईंचं पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे, गाठ आहे माझ्याशी…चंद्रलेखाचं नाटक. मोहन वाघ यांच्यासारख्या दिग्गजाचे नेतृत्व. यात विजया मेहता, मधुकर तोरडमल, दत्ता भट, अरुण जोगळेकर हे कलाकार होते. वसंत कानेटकरांनी हे नाटक लिहीलं होतं. तर दामू केंकरे यांनी नाटक बसवलं…ही दिग्गज नावं वाचली की समजतं वंदनाताईंनी किती मेहनत घेतली असेल…यात त्यांची भूमिका तरुण वकीलाची होती. तर मधुकर तोरडमल वरिष्ठ वकीलाच्या भूमिकेत होते. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. या नाटकात तोरडमल हे वंदनाताईंपेक्षा पंचवीस वर्षांनी मोठे होते. शिवाय मधुकर तोरडमल यांचा दरारा आणि नाव इतकं होतं की मान्यवर अभिनेतेही त्यांच्यासमोर उभं राहायचं म्हटलं की घाबराचये. पण वंदनाताई यांना हा प्रश्नच आला नाही. त्या मधुकर तोरडमल यांच्यासमोर उभ्या राहील्या. त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं. आपण त्या भूमिकेची गरज काय आहे, हे जाणून घ्यायचे…आणि त्या भूमिकेचे होऊन जायचे…इथे वयाचा प्रश्नच कुठे येत नाही, असा वंदनाताईंचा विश्वास होता. हाच त्यांचा विश्वास पुढे काही वर्षांनी कामी आला. त्यांनी मन उधाण वा-याचे हे नाटक केले. तेव्हा त्यांच्यासोबत उमेश कामत हा अभिनेता होता. विशेष म्हणजे तेव्हा वंदनाताई उमेश पेक्षा 25 वर्षांनी मोठ्या होत्या. हे व्यावसायिक नाटकही य़शस्वी झाले.
गाठ आहे माझ्याशी, या नाटकाच्या यशानंतर वंदना गुप्ते यांच्याकडे नाटकांची रिघ लागली. पण प्रत्येकवेळी वेगळी भूमिका करायची म्हणून त्यांनी अनेक नाटकांना नकारही दिला. चंद्रलेखाबरोबर त्यांचा मेळ चांगला जमला. जवळपास बारा नाटकं वंदनाताईंनी चंद्रलेखाबरोबर केली. आपल्या पहिल्या नाटकापासून त्यांनी एक पद्धत सुरु केली. प्रत्येक नाटकाची संहिता त्यास्वतः लिहीतात. त्यामुळे नाटकातील बारकावे, चढ उतार हे समजतात, असं वंदनाताई सांगतात. त्यांचा नाटकातील वावर, आवजातील बारकावे पाहिले तर त्यांचा हा अभ्यास किती खरा आहे, याची प्रचिती येते.
आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी वंदना गुप्ते यांनी मेहनत घेतली आहे. झुंज या नाटकासाठी तर त्या एक रात्र कामगारांच्या वस्तीमध्ये जाऊन राहील्या आहेत. झुंज हे नाटक मधुकर तोरडमल यांनी लिहिलेलं नाटक. द मॅन या कादंबरीवर आधारीत या नाटकात तोरडमल हे वंदना गुप्ते यांना घेण्यास टाळाटाळ करीत होते. रखमा या बाईची ही भूमिका होती. तोपर्यंत वंदना गुप्ते यांनी शहरी वातावरणातल्या भूमिका केल्या होत्या. त्यांना रखमाची भूमिका झेपणार नाही, अशी तोरडमल यांची अटकळ होती. पण मोहन वाघ यांनी एकदा वंदनाला संधी देऊन बघूया म्हणून सांगितले. त्यावर तोरडमल यांनी वंदनाताईंना एका आठवड्याची मुदत दिली. ही भूमिका करण्यासाठी वंदनाताई माटुंग्यातील कामगाराच्या वस्तीमध्ये जाऊन राहिल्या. एका महिलेच्या घरात त्या राहिल्या. ती महिला चुलीवर कसं जेवण करते. बोलते कशी, तिचा वावर कसा आहे, याचा त्यांनी अभ्यास केला. अगदी ती महिला मशिरी कशी लावते, याचा सुद्धा अभ्यास केला. मग हा सर्व अभ्यास रखमामध्ये उतरला. इतका की या नटकाबद्दल जेव्हा लिहिले गेले, तेव्हा वंदना गुप्ते यांच्या रखमाची विशेष दखल घेण्यात आली. वंदना या नेहमी शिव्या देतात की काय इतक्या त्यांच्या शिव्या अस्सल वाटतात, असा शेराही तेव्हा मारण्यात आला होता. अर्थात ही वंदना गुप्ते यांच्या अभिनयाची ताकद होती.
वंदना गुप्ते यांच्या प्रत्येक नाटकाची काहीतरी ख्यासियत आहे. चारचौघी हे त्यापैकीच एक नाटक. प्रशांत दळवींच्या या नाटकात महिलांच्या मनातील विचारांना मुक्त वाव देण्यात आला आहे. पतीला सोडून विद्या आपल्या आईकडे रहायला येते. तेव्हा त्यामागील भूमिका, घुसमट, आगतीकता ती आपल्या नव-याला सांगते. फोनद्वारे…हे वीस मिनीटाचे मनोगत प्रेक्षकांना खिळवून ठेवतं…आणि समस्त महिलांना आपल्या मनातील भाव व्यक्त झाल्यासारखा वाटतो….
सातव्या मुलीची सातवी मुलगी…हे सुद्धा वेगळ्या पठडीतलं नाटक..अशोक पाटोळेंचे हे नाटक ब्लॅक मॅजिकवर आधारीत आहे. गिरीश ओक, निर्मिती सावंत यांच्या यात भूमिका आहेत. वंदना गुप्ते यांनी केलेला निगेटीव्ह रोल पाहून अंगावर काटा येतो.
सुंदर मी होणार या पु. ल. देशपांडेंलिखीत नाटकाचीही अशीच गोष्ट…एका जागी बसून केलेलं हे नाटक…यात वंदनाताईंना सूरांचा केलेला अभ्यास कामी आला. एक पांगळी मुलगी एका खिडकीतून जग बघते अशी साधारण कथा. स्वतः पुल देशपांडे यांनी हे नाटक पाहिल्यावर वंदनाताईंचे तोंडभरुन कौतुक केलं होतं.
वाडा चिरेबंदी करतांना वंदनाताईंनी नागपूरी भाषा आत्मसात केली. एवढी की नागपूरमध्ये जेव्हा या नाटकाचा प्रयोग झाला तेव्हा नागपूरच्या लोकांनी आम्हालाही एवढी अस्सल नागपूरी भाषा बोलता येत नाही म्हणून त्यांना दाद दिली.
मानसशास्त्राच्या पदवीधर असलेल्या वंदना गुप्ते यांनी आपल्या प्रत्येक नाटकांतून वेगळी भूमिका केली. आणि त्यांचा ठसा रसिकांच्या मनावर ठेवला आहे. अखेरचा सवाल, आणि काही ओली पाने, गगनभेदी, चारचौघी, चार दिवस प्रेमाचे, चार दिन प्यार के, प्रेमा तुझ्या गावा जावे, मदनबाधा, रंग उमलले मनाचे, रमले मी, वाडा चिरेबंदी, शूऽऽ कुठं बोलायचं नाही, श्री तशी सौ, संध्याछाया, सुंदर मी होणार, सेलेब्रेशन, सोनचाफा या प्रत्येक नाटकामधून प्रेक्षकांना वेगळी वंदा गुप्ते भेटली आहे. रंगभूमीसाठी वंदना गुप्ते यांचे योगदान मोठे आहे. जेव्हा फोन, मोबाईल अशा सोयी नव्हत्या तेव्हा ही मंडळी नाटकांचे दौरे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात करायची. अनेकवेळा घरापासून दूर रहावे लागे. मुलं लहान असतांना मात्र कसोटी लागायची. मुलांच्या, घराच्या आठवणीनं जीव कासावीस व्हायचा. पण अशावेळी घरच्यांनी दिलेली योग्य साथ यामुळेच हे सर्व साध्य झाल्याचं वंदनाताई सांगतात.
वंदना गुप्ते यांचे मराठी चित्रपटातही मोठं योगदान आहे. पछाडलेला, आंधळी कोशिंबीर, 66 सदाशिव, डबल सिट, र्र मेस्ती बारायण, बकेट लिस्ट, फोटोकॉपी, टाईम प्लीज, पछाडलेला, मातीच्या चुली, मीराबाई नॉट आऊट, समांतर, लंपडाव, वॉटंसअप लग्न, बाप रेबाप डोक्याला ताप, ददी ऑर्डर ॲण्ड – लाईन, द ब्रेकींग न्यूज. दिवसेंन दिवस, बे दुणे साडेचार, भेट, नॉट ओन्ली मिसेस राऊत, दिवसेंदिवस, मणी मंगळसूत्र या प्रत्येक चित्रपटात वंदना गुप्ते यांची छाप पडलेली आहे. या गुणी अभिनेत्रीने अभिनयापुरत आपल्याला मर्यादीत न ठेवता निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. आपल्या बहिणींसोबत वंदनाताईंनी सिस्टर कन्टर्ट या निर्मिती संस्थेची स्थापना केली. त्यातून पहिली निर्मीती झाली ती फॅमिली कट्टा या चित्रपटाची. त्यात वंदनाताईंनी मालती सबनीस यांची भूमिका साकारली आहे. प्रत्येकाला वाटावं अशी आई, आजी आपल्याला हवी इतकी जिवंत भूमिका. वंदनाताईंच्या प्रत्येक भूमिकेबाबत असं वाटतं. ही भूमिका फक्त त्याच करु शकतात इतका त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटतो.
नाटक आणि चित्रपटांमध्ये रमलेल्या वंदनाताई छोट्या पडद्यावरही आल्या. आंबट गोड, करीना करीना, पांडे और पांडे, बंधन सात जन्मोंका, सजन रे झूट मत बोलो, ह्या गोजीरवाण्या घरात यासारख्या मालिकांमधन वंदनाताई घराघरात पोहचल्या. पण वंदनाताईंमधील अभिनेत्रीला मात्र मालिकांचे बिझी शेड्युल पटले नाही. रंगभूमी आणि मालिका ही ओढाताण खूप झाल्यावर त्यांनी मालिकांना सोडचिढ्ढी दिली. रंगभूमीला कायम प्रथम प्राधान्य देणा-या या अभिनेत्रीला अनेक मान्यवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. बेळगावमध्ये झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात त्यांच्या जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे.
माणिक वर्मा यांचा गाण्याचा वारसा आपण जपला नाही याचे दुःख वंदनाताईंना आहे. मात्र असे असते तर एका गुणी अभिनेत्रीला मराठी रंगभूमी मुकली असती हे ही तितकच खरं. आज आई आणि आजीच्या भूमिकांमध्ये वावरणा-या वंदना गुप्ते आपल्या कुटुंबातून आलेल्या मुल्यांना जपतात. माणिक वर्मा यांनी महाराष्ट्राला सुरेल गाण्यांचा खजिना दिला आहे. आणि त्यासोबत वंदना गुप्ते यांच्यासारखा अमुल्य मोती दिला आहे. अभिनयाच्या माध्यमातून रसिकांना एक करणा-या या गुणी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा….