Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !
सगळेच ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या बहुचर्चित कांताराचा दुसरा पार्ट दसऱ्याच्या निमित्ताने रिलीज झाला. खरं तर कांताराचा पहिला पार्ट लो बजेट आणि बिग इम्पॅक्ट वाला होता. पण हा Kantara Chapter 1 बिग बिजेट आणि बिग Impact वाला ठरला आहे. खरं तर इतक्या मोठ्या चित्रपटाचं लिखाण, दिग्दर्शन, त्यासोबतच त्यात अभिनय आणि मायथॉलॉजीकल अॅक्शन ड्रामा चित्रपट तयार करणं हे जोखिमेचं काम ! पण स्टार ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा हे धनुष्य पेललं आणि आपल्या समोर पुन्हा एकदा भव्य-दिव्य ग्रँड स्केल चित्रपट उभा केला आहे. लोकपरंपरेची सांगड या चित्रपटाला आहेच, पण यासोबतच आणखी काही ट्विस्ट आहेत, जे तुम्ही थिएटरमध्येच अनुभवू शकता ! तर जाणून घेऊया कसा आहे पौराणिक आणि रहस्यमय जगाचा नवा अध्याय Kantara Chapter 1! (Kantara : A legend Chapter 1 movie review)

पहिल्या भागात आपण कर्नाटकमधल्या ‘भूता कोला’ या लोकपरंपरेबदल जाणून घेतलं. यासोबतच पंजुर्ली आणि गुलिगा या स्थानिक देवतांचं चित्रण यात आहे. पण हा भाग तुम्हाला १ हजार वर्ष मागे नेतो, जिथे या परंपरेची सुरुवात झाली होती. कदंब साम्राज्यातील बांगरा हे राजघराणे, त्याच्या बाजूला असलेलं घनदाट जंगल आणि त्या जंगलात राहणारे कांतारा भूमीचे लोकं, त्यांचं श्रद्धास्थान आणि त्याच जंगलात राहणाऱ्या कडपा या आदिवासी जमातीचे लोकं या सर्वांभोवती ही कथा फिरते. प्रत्येक साम्राज्यात एक दुष्ट राजा घडलेलाच असतो. तसाच या बांगरा घराण्यातही असतो. दुसरीकडे कांतारा भूमीचा नायक आहे बेर्मे… म्हणजेच ऋषभ शेट्टी ! त्याचा रहस्यमयी जन्म, तो कशाप्रकारे कांतारा भूमीच्या लोकांना वाचवतो, हे सगळं यात दाखवलं आहे. (Tollywood Movies)

चित्रपटाचा स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे ऋषभ शेट्टीचा (Rishabh Shetty) दमदार अभिनय ! कांताराच्या पहिल्या भागात ज्याप्रमाणे त्याने गुलिगाचं रौद्र रूप साकारलं होतं. यामध्ये मात्र त्याची विविध अक्षरशः अंगावर काटा आणणारी रूपं पहायला मिळतात. विशेष म्हणजे सेकंड हाफमध्ये ऋषभ शेट्टी तुमच्या डोळ्यासमोरून जातच नाही. ऋषभसोबतच जयराम (विजयेंद्र), गुलशन देवय्या (कुलशेखर) आणि रुक्मिणी वसंथ (कनकावती) यांनीही आपलं पात्र उत्तमरित्या साकारलं आहे. विशेष म्हणजे गुलशन देवय्याचा निगेटिव्ह रोल तुम्हाला चांगलाच गुंतवून ठेवतो. त्यात आपल्या रूपाने सर्वांना प्रेमात पाडणाऱ्या रुक्मिणी वसंथने सेकंड हाफमध्ये कसा तख्तापलट केलाय, हे बघाच. यामध्ये प्राचीन कदंब साम्राज्याचे सेट्ससुद्धा अगदी खरेखुरे वाटतात. त्यात वेशभूषेबाबत बोलायचं झालं तर तेसुद्धा अगदीच जमून आलं आहे. खासकरून आदिवासी लोकांची वेशभूषा उत्तमरित्या साकारलेली आहे.
================================
हे देखील वाचा : Kantara : The Legend Chapter 1 चित्रपटातून समोर येणार पंजुर्ली देवाचा इतिहास!
================================
स्क्रीनप्ले तुम्हाला खिळवून ठेवतो. प्लॉट आणखी गूढ होत जातो आणि तुम्हाला नवनवीन रहस्य कळत जातात. कांताराच्या पहिल्या पार्टप्रमाणेच दुसऱ्या पार्टचीही सुरुवातीची आणि अखेरची १५ मिनिटे मिस करू नका. संगीताच्या बाबतीत सांगायचं झालं तर अजनीश लोकनाथ यांचं चित्रपटातील संगीत जितका मनाला भावतं, तितक्या गुजबम्प्स मुमेंट तयार करतं. ‘वराह रूपम’ हे आयकॉनिक गाणं यातही पुन्हा एकदा वापरण्यात आलं आहे. दिग्दर्शनाच्या बाबतीत पुन्हा एकदा ऋषभ शेट्टीने सरस कामगिरी करून दाखवली आहे. पहिल्या चित्रपटाच्या अनुभवाचा वापर ऋषभने पुरेपूर केला आहे. व्हीएफएक्सवर चित्रपटाची टेक्निकल टीम योग्यरीत्या खेळली आहे. चित्रपटात साकारलेले प्राणी अगदी हुबेहूब खरे वाटतात. विशेष म्हणजे वाघाचा सिक्वंन्स जबरदस्त आहे. (Entertainment News)

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र एका कमर्शिअल चित्रपटाच्या प्रीक्वलला थेट इतिहासाची जोड दिली, हे ऋषभ शेट्टी आणि होम्बाळे फिल्म्सलाच जमू शकतं. एकंदरीत ‘कांतारा १’ एक परफेक्ट एन्टरटेनर आहे. आपली परंपरा आणि लोककला ऋषभ शेट्टीने अभिमानाने जगासमोर सादर केली आहे. कलाकृती मिडिया Kantara Chapter 1 ला देत आहे पाच पैकी चार स्टार्स !
-सागर जाधव