करवट (१९४८)
‘बी. आर. फिल्म्स’ – पाच दशकांचा सुरेल प्रवास
निर्मिती : श्री गोपाल पिक्चर्स
निर्देशक : प्रकाश
संगीतकार : हंसराज बहल
गीतकार : सैफ डी. एन. मधोक, एस. दीपक, चरणदास, बालम
कलाकार : गीता निझामी, सतीश, जीवन, पारो देवी व लीला मिश्रा
बी. आर. चोप्रा यांनी निर्मिती केलेला हा प्रथम चित्रपट! फाळणीपूर्वी लाहोरमध्ये पत्रकारिता करीत असताना भागीदारीत श्री गोपाल पिक्चर्सच्या बॅनरखाली त्यांनी ‘करवट’ चित्रपटाची निर्मिती केली. भागीदाराच्या अवास्तव आग्रहामुळे फिल्मी मालमसाला घालून त्यांना धंदेवाईक चित्रपट बनवावा लागला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर साफ कोसळला. चोप्रा आपले सर्वस्व गमावून अक्षरशः रस्त्यावर आले. त्यांच्या भागीदारांनी आपले हक्क विकून थोडीफार वसूली केली.
‘करवट’ च्या अपयशामुळे चोप्रांचा आत्मविश्वास कमी होण्याऐवजी उलट अधिकच बळावला. यापुढे आयुष्यात कधीही धंदेवाईक मसाला पिक्चर बनवणार नाही, असा त्यांनी मनोमन निग्रह केला. त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग जोपासला. त्यातून घडलेल्या पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.
गेली पंचवीस वर्षे सातत्याने प्रयत्न करूनही करवटची लॉबी कार्ड्स, पोस्टर, बुकलेट, बानर उपलब्ध झाली नाहीत, फक्त त्या चित्रपटातील गाणी मिळाली.
- अरुण पुराणिक